शरद पवार

भारतीय राजकारणी

शरद गोविंदराव पवार (१२ डिसेंबर १९४०)  हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. तसेच पी.व्ही. नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात संरक्षण मंत्री म्हणून आणि मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात कृषी मंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसपासून वेगळे झाल्यानंतर १९९९ मध्ये त्यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. ते भारतीय संसदेच्या वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शिष्टमंडळाचे नेतृत्व करतात. तसेच ते महाविकास आघाडी या प्रादेशिक राजकीय आघाडीचे अध्यक्ष आहेत.

शरद गोविंदराव पवार

कार्यकाळ
इ.स. २००९ – इ.स. २०१४
मागील-
पुढीलविजयसिंह मोहिते-पाटील
मतदारसंघमाढा
कार्यकाळ
इ.स. १९९० – इ.स. २००९
मागीलशरद पवार
पुढीलसुप्रिया सुळे
मतदारसंघबारामती
कार्यकाळ
इ.स. १९९९ – इ.स. २००४
मागीलशरद पवार
पुढीलशरद पवार
मतदारसंघबारामती
कार्यकाळ
इ.स. १९९८ – इ.स. १९९९
मागीलशरद पवार
पुढीलशरद पवार
मतदारसंघबारामती
कार्यकाळ
इ.स. १९९६ – इ.स. १९९८
मागीलशरद पवार
पुढीलशरद पवार
मतदारसंघबारामती
कार्यकाळ
इ.स. १९९१ – इ.स. १९९६
मागीलअजित पवार
पुढीलशरद पवार
मतदारसंघबारामती
कार्यकाळ
इ.स. १९८४ – मार्च, इ.स. १९८५
मागीलवसंतदादा पाटील
पुढीलशंकरराव पाटील
मतदारसंघबारामती

कार्यकाळ
इ.स. १९७८-८०, इ.स. १९८८-९१इ.स. १९९३ – इ.स. १९९५

जन्मडिसेंबर १२, इ.स. १९४०
बारामती, पुणे जिल्हा, महाराष्ट्र
राजकीय पक्षराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
मागील इतर राजकीय पक्षभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पत्नीप्रतिभा पवार
अपत्येसुप्रिया सुळे
निवासबारामती

शरद पवार हे महाराष्ट्रातील बारामतीचे आहेत. महाराष्ट्रातील प्रभावशाली राजकीय कुटुंब असलेल्या पवार कुटुंबातील आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील ते एक प्रमुख चेहरा आहेत. कुटुंबातील इतर राजकारण्यांमध्ये त्यांची मुलगी सुप्रिया सुळे, अजित पवार हे त्यांचे पुतणे, रोहित राजेंद्र पवार हे पुतण्याचे पुत्र आणि त्यांच्या विस्तारित कुटुंबातील इतर सदस्यांचा समावेश आहे. [१] [२] [३] [४] [५]

राजकारणाच्या बाहेर, शरद पवार यांनी २००५ ते २००८ पर्यंत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष आणि २०१० ते २०१२ पर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम केले. [६] ऑक्टोबर २०१३ ते जानेवारी २०१७ या कालावधीत ते मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते. [७]

२०१७ मध्ये, भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण हा भारताचा दुसरा-सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला.

वैयक्तिक जीवन

पवारांचा जन्म डिसेंबर १२, इ.स. १९४० रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती येथे झाला.कोरेगाव तालुक्यातील नांदवळ हे साहेबांचे मुळगाव,शरद पवार यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव पवार आणि आईचे नाव शारदाबाई पवार आहे. गोविंदराव हे निरा कॅनॉल सहकारी सोसायटीचे बराच् काळ सेक्रेटरी होते. पुढे ते बारामती येथे निघालेल्या सहकारी बँकेचे पहिले व्यवस्थापक झाले. शारदाबाई या १९३८ मध्ये पुणे जिल्हा लोकल बोर्डाच्या शिक्षण समितीच्या प्रमुख होत्या. [८] बारामतीच्या लोकसभा मतदार संघाच्या विद्यमान खासदार सौ. सुप्रिया सुळे या त्यांच्या सुकन्या आहेत. तर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, अजित पवार हे त्यांचे पुतणे आहेत.

त्यांचे छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे तीन आदर्श आहेत.[९]

राजकारण

इ.स. १९५६ साली ते शाळेत असताना त्यांनी गोवामुक्ती सत्याग्रहाला पाठिंबा दर्शविण्यासाठी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केला. येथून त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली.त्यानंतर काँलेजमध्ये असताना विद्यार्थी संघटनेचे नेते म्हणूनही त्यांनी काम पाहिले.विद्यार्थी संघटनेच्या एका समारंभासाठी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना आमंत्रित केले.पवारांनी त्याप्रसंगी केलेल्या भाषणामुळे यशवंतराव चव्हाण अतिशय प्रभावीत झाले.त्यानंतर चव्हाणांच्या सांगण्यावरून पवारांनी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला. चव्हाणांनी पवारांच्यातील सुप्त नेता हेरला आणि त्यानंतर पवार त्यांचे शिष्य बनले. त्यानंतर चव्हाणांनी त्यांच्या पुणे शहराला दिलेल्या भेटींदरम्यान पवारांना मुद्दाम भेटायला बोलावून त्यांना अनेकवेळी मार्गदर्शन केले. वयाच्या २४ व्या वर्षी ते महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यानंतर यशवंतराव चव्हाणांचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाऊ लागले.

इ.स. १९६६ साली पवारांना युनेस्को शिष्यवृत्ती मिळाली.त्याअंतर्गत त्यांना पश्चिम जर्मनी, फ्रान्स, इटली, इंग्लंड इत्यादी देशांना भेट देऊन तेथील राजकीय पक्षांचा आणि त्यांच्या पक्षबांधणी करायच्या पद्धतीचा जवळून अभ्यास करता आला.

विधानसभा

सर्वप्रथम इ.स. १९६७ च्या राज्य विधानसभा निवडणुकीत ते बारामती मतदारसंघातून विजयी झाले. श्री. वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात त्यांचा राज्यमंत्री म्हणून समावेश वयाच्या २९व्या वर्षी झाला. इ.स. १९७२ आणि इ.स. १९७८ सालच्या निवडणुकीतही ते विजयी झाले. इ.स. १९७८ सालच्या निवडणुकीनंतर वसंतदादा पाटील मुखमंत्री झाले. यशवंतराव चव्हाणांबरोबरच वसंतदादा पाटील हेसुद्धा पवारांचे मार्गदर्शक होते. पण काँग्रेस पक्षाचे १२ आमदार फोडून पवारांनी विरोधी पक्षाबरोबर हातमिळवणी केली आणि वसंतदादांचे सरकार पाडले. त्यानंतर 'पवारांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला' अशी जळजळीत प्रतिक्रिया वसंतरावांनी दिली.

मुख्यमंत्री

१८ जुलै इ.स. १९७८ रोजी शरद पवारांचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. पवारांबरोबर काँग्रेस (इंदिरा) पक्षातून बाहेर पडलेले १२ आमदार, काँग्रेस (स) पक्ष आणि जनता पक्ष यांची आघाडी पुरोगामी लोकशाही दल या नावाने बनली आणि त्याचे नेते पवार झाले.ते राज्याचे सर्वांत तरुण मुख्यमंत्री होते. इ.स. १९८० साली इंदिरा गांधींचे सत्तेत पुनरागमन झाल्यानंतर त्यांनी विरोधी पक्षांची राज्य सरकारे बरखास्त केली. त्यात पवारांचे सरकारही बरखास्त झाले. जून इ.स. १९८० मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. काँग्रेस(इंदिरा) पक्षाने २८८ पैकी १८६ जागा जिंकल्या आणि बँरिस्टर अब्दुल रहमान अंतुले राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले. शरद पवार विधानसभेतील प्रमुख विरोधी नेते होते.

लोकसभा

इ.स. १९८४ सालची लोकसभा निवडणूक पवारांनी लढवली आणि ते लोकसभेवर निवडून गेले. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या लाटेत विरोधी पक्ष राज्यातील ४८ पैकी केवळ ५ जागा जिंकू शकले. त्यात पवारांच्या बारामती या जागेचा समावेश होता .मात्र त्यांनी राष्ट्रीय राजकारणात न पडता काही काळ राज्याच्या राजकारणातच राहायचे ठरवले. मार्च इ.स. १९८५ची राज्य विधानसभा निवडणूक त्यांनी बारामतीतून जिंकली आणि लोकसभा सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामा दिला. त्या विधानसभा निवडणुकीत पवारांच्या काँग्रेस(स) पक्षाने २८८ पैकी ५४ जागा जिंकल्या आणि पवार राज्यविधानसभेतील विरोधी पक्षनेते झाले.

परत विधानसभा

इ.स. १९८७ साली ९ वर्षांच्या खंडानंतर शरद पवारांनी राजीव गांधींच्या उपस्थितीत औरंगाबाद येथे काँग्रेस(इंदिरा) पक्षात परत प्रवेश केला. जून १९८८ मध्ये पंतप्रधान आणि काँग्रेस अध्यक्ष राजीव गांधींनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचा केन्द्रीय मंत्रिमंडळात अर्थमंत्री म्हणून समावेश केला. त्यांच्या जागी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून राजीव गांधींनी शरद पवारांची निवड केली. २६ जून इ.स. १९८८ रोजी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतली. त्यापूर्वीच्या काळात राज्यात काँग्रेस पक्षाला फारसे आव्हान नव्हते. पण बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना हा पक्ष भारतीय जनता पक्षाशी युती करून काँग्रेस पक्षाच्या अनेक वर्षे अबाधित असलेल्या वर्चस्वाला आव्हान देऊ लागला होता. त्या आव्हानाला तोंड देऊन राज्यात काँग्रेस पक्षाचे वर्चस्व कायम राखण्याची जबाबदारी पवारांवर आली.

नोव्हेंबर इ.स. १९८९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने राज्यातील ४८ पैकी २८ जागा जिंकल्या. पक्षाची राजस्थान,मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश यासारख्या राज्यांत झाली तशी वाताहत महाराष्ट्रात झाली नाही. पण इ.स. १९८४ च्या तुलनेत पक्षाने १५ जागा कमी जिंकल्या. शिवसेनेने ४ जागा जिंकून प्रथमच लोकसभेत प्रवेश केला. भारतीय जनता पक्षाने १० जागा जिंकून जोरदार मुसंडी मारली. लोकसभा निवडणुकीतील चांगल्या कामगिरीमुळे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला. राज्य विधानसभेसाठी फेब्रुवारी इ.स. १९९० मध्ये निवडणुका होणार होत्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राज्याच्या कानाकोपऱ्यात प्रचारसभा घेऊन काँग्रेस पक्षापुढे मोठे आव्हान उभे केले. राज्य विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने २८८ पैकी १४१ तर शिवसेना-भाजप युतीने ९४ जागा जिंकल्या. राज्याची स्थापना झाल्यानंतर प्रथमच काँग्रेस पक्षाने विधानसभेतील बहुमत गमावले. तरीही १२ अपक्ष आमदारांच्या पाठिंब्यावर शरद पवार यांनी ४ मार्च इ.स. १९९० रोजी मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली.

जानेवारी इ.स. १९९१ मध्ये विलासराव देशमुख, सुरूपसिंग नाईक आणि इतर काही मंत्र्यांनी शरद पवारांना मुख्यमंत्रिपदावरून हटवण्याची मागणी पक्षाध्यक्ष राजीव गांधी यांच्याकडे केली. पण त्याला राजीव गांधींनी नकार दिला.

इ.स. १९९१ च्या लोकसभा निवडणुकीत पवारांनी काँग्रेस पक्षाचा राज्यात एकहाती प्रचार केला. पक्षाने राज्यात ४८ पैकी ३८ जागा जिंकल्या आणि इ.स. १९८९ च्या निवडणुकीत झालेल्या पिछेहाटीची काही अंशी भरपाई केली. निवडणुक प्रचारादरम्यान राजीव गांधींची हत्या झाली. श्री.पी.व्ही.नरसिंह राव आणि अर्जुनसिंग यांच्याबरोबर पवारांचे नावही पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहे अशा बातम्या वर्तमानपत्रांत आल्या. मात्र काँग्रेस संसदीय पक्षाने श्री.पी.व्ही.नरसिंह राव यांना नेतेपदी निवडले आणि त्यांचा २१ जून इ.स. १९९१ रोजी भारताचे पंतप्रधान म्हणून शपथविधी झाला.

पुनः दिल्ली

नरसिंह रावांनी पवारांना केन्द्रीय मंत्रिमंडळात संरक्षणमंत्री म्हणून नेमले. २६ जून इ.स. १९९१ रोजी त्यांचा केंद्रीय मंत्री म्हणून प्रथमच शपथविधी झाला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या जागी सुधाकरराव नाईक यांची निवड करण्यात आली. राज्य काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदांमुळे सुधाकरराव नाईक यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर नरसिंह रावांनी शरद पवारांना पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून नेमले. त्यांनी ६ मार्च इ.स. १९९३ रोजी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून चौथ्यांदा सूत्रे हाती घेतली.

विधानसभा, चौथी खेळी

पवारांची मुख्यमंत्रिपदाची चौथी कारकीर्द अत्यंत वादग्रस्त ठरली. ते परत मुख्यमंत्री बनून एक आठवडा व्हायच्या आत, १२ मार्च इ.स. १९९३ रोजी मुंबईत भीषण बाँबस्फोट झाले. त्यांत २५७ लोक ठार तर ६००हून अधिक लोक जखमी झाले. ३० सप्टेंबर इ.स. १९९३ रोजी लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये भूकंप होऊन दहा हजारांपेक्षा जास्त लोक ठार झाले. या संकंटांबरोबरच राज्यात कमालीच्या वाढलेल्या भ्रष्टाचाराबद्दल मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त गो.रा.खैरनार यांनी पवारांना दोषी धरून त्यांच्यावर अनेक आरोप केले. प्रख्यात समाजसेवक अण्णा हजारे यांनी वनखात्यातील वाढत्या भ्रष्टाचाराविरोधात उपोषण केले. तेव्हा पवारांचे सरकार भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहे असा आरोप झाला. जळगाव येथील सेक्स स्कँडलमध्ये अनेक तरुणींवर लैंगिक अत्याचार झाले, त्यात काँग्रेस पक्षाचे स्थानिक नगरसेवक सामील आहेत असा आरोप झाला. २३ नोव्हेंबर इ.स. १९९४ रोजी नागपूर येथे गोवारी समाजातील लोकांचा शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची मागणी करण्यासाठी मोर्चा निघाला, तेव्हा मुख्यमंत्री या नात्याने मोर्चेकऱ्यांची भेट न घेता त्यांच्यावर लाठीमार करण्यात आला. त्यात चेंगराचेंगरी होऊन ११४ लोक मृत्युमुखी पडले. त्यामुळे आदिवासी कल्याण मंत्री मधुकरराव पिचड यांना तेव्हा या घटनेची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा लागला. [१०]

राज्य विधानसभेसाठी फेब्रुवारी-मार्च इ.स. १९९५ मध्ये निवडणुका होणार होत्या. त्या निवडणुकींच्या तिकिटवाटपात काँग्रेस पक्षात मोठया प्रमाणावर बंडखोरी झाली. अनेक ठिकाणी काँग्रेस नेत्यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध अपक्ष म्हणून निवडणुला लढवल्या.

जनतेत सरकारविरुद्ध वाढलेली नाराजी आणि मोठया प्रमाणावर झालेली बंडखोरी यांचे प्रतिबिंब मतपेटीत उमटले. काँग्रेस पक्षाचा राज्यात प्रथमच पराभव झाला.शिवसेना-भाजप युतीस २८८ पैकी १३८ जागा मिळाल्या तर काँग्रेस पक्षास ८० जागांवर समाधान मानावे लागले.राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशी यांचा १४ मार्च इ.स. १९९५ रोजी शपथविधी झाला.

दिल्लीची तिसरी फेरी

इ.स. १९९६ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत पवार राज्य विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते होते. इ.स. १९९६ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी बारामतीतून विजय मिळवला आणि त्यानंतर ते राष्टीय राजकारणात उतरले. जून इ.स. १९९७ मध्ये त्यांनी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सीताराम केसरी यांच्याविरुद्ध निवडणूक लढवली पण तीत त्यांचा पराभव झाला.

इ.स. १९९८ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी राज्यात रिपब्लिकन पक्ष आणि समाजवादी पक्षांबरोबर निवडणुकपूर्व आघाडी करायचा निर्णय घेतला.त्यामुळे शिवसेना-भाजप विरोधी मतांचे विभाजन टळले आणि काँग्रेस-रिपब्लिकन पक्ष आणि समाजवादी पक्ष यांच्या युतीने ४८ पैकी ३७ जागा जिंकून जोरदार यश प्राप्त केले.शिवसेना-भाजप युतीला १० जागांवर समाधान मानावे लागले.त्यानंतर शरद पवार १२ व्या लोकसभेतील विरोधी पक्षनेते झाले.

१२वी लोकसभा बरखास्त झाल्यानंतर मे इ.स. १९९९मध्ये पी.ए.संगमा आणि तारिक अन्वर यांच्या साथीने शरद पवारांनी अशी मागणी केली की, '१३ व्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने इटलीत जन्मलेल्या सोनिया गांधींऐवजी भारतात जन्मलेल्या कोणाही नेत्याला पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित करावे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रात त्या तिघांनी म्हटले,'उच्च शिक्षण, कर्तबगारी आणि पात्रता असलेल्या अनेक व्यक्ती असलेल्या या ९८ कोटी लोकांच्या भारत देशात भारताबाहेर जन्म झालेली कोणत्याही व्यक्तीने सरकारचे नेतृत्व करणे योग्य होणार नाही, कारण हा प्रश्न देशाची सुरक्षा, आर्थिक हितसंबंध आणि जागतिक राजकारणातील भारताच्या प्रतिमेबरोबरच प्रत्येक भारतीयाच्या अस्मितेशी निगडित आहे' या कारणावरून काँग्रेस पक्षाने शरद पवार, पी.ए.संगमा आणि तारिक अन्वर यांना ६ वर्षांसाठी पक्षातून काढून टाकले.

राष्ट्रवादी

त्यानंतर १० जून इ.स. १९९९ रोजी शरद पवारांनी त्यांच्या 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची' स्थापना केली. इ.स. १९९९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकींनंतर कोणत्याही पक्ष अथवा आघाडीस बहुमत मिळाले नाही.त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होऊन विलासराव देशमुख राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले.

इ.स. २००४ मधील लोकसभा निवडणुकीनंतर पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष केंद्रात मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारमध्ये सामील झाला. २२ मे इ.स. २००४ मध्ये शरद पवारांनी देशाचे कृषिमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतली. २९ मे इ.स. २००९ रोजी केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना कृषी, ग्राहकांशी संबंधित बाबी, अन्न आणि सार्वजनिक वितरण ह्या खात्यांची धुरा देण्यात आली. जुलै इ.स. २०१०मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर पक्षकार्याला अधिक वेळ देण्याची इच्छा असल्याचे सांगून पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याकडे त्यांनी आपल्यावरील कार्यभार कमी करण्याची विनंती केली.इ. स्. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादी पक्षाला ५२ जागा मिळाल्या. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांचे मिळून महाआघाडीचे सरकार महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्यात शरद पवार यांचा मोलाचा सहभाग होता.


2023 अजित पवारांचे बंड : जुलै 2023 मध्ये, अजित पवार यांनी शरद पवारांच्या विरोधात बंड केले आणि सत्ताधारी भाजप-शिवसेना सरकारमध्ये सामील झाले आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री [११]म्हणून शपथ घेतली, राष्ट्रवादीच्या बहुसंख्य विद्यमान आमदारांनी पवार यांच्या समर्थनार्थ पक्ष सोडला. त्यांनी निवडणूक आयोगाकडे दावा केला की ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत,[१२]

क्रिकेट

राजकारणाबरोबरच क्रिकेट हे देखील पवारांच्या आवडीचे क्षेत्र आहे. २९ नोव्हेंबर इ.स. २००५ रोजी ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी निवडून आले. १ जुलै इ.स. २०१० रोजी त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. जगमोहन दालमिया यांच्यानंतर हे पद भूषविणारे ते दुसरे भारतीय आहेत.

शिक्षणसंस्थांमधील सहभाग

पवारांचा शिक्षणक्षेत्राशीही सक्रिय संबंध आहे. त्यांनी ज्या शिक्षणसंस्थांच्या कामात सहभाग घेतला आहे, त्यातील महत्त्वाच्या शिक्षणसंस्था खालीलप्रमाणे -


चरित्रे आणि आत्मचरित्र

  • साहेब (शरद पवार चरित्रग्रंथ), लेखक व संपादक - सोपान गाडे
  • लोकनेते शरदराव पवार (लेखक - राम कांडगे)
  • Sharad Pawar - A Mass Leader (लेखक - दीपक बोरगावे)
  • शरद पवार यांचे ’लोक माझे सांगाती’ नावाचे मराठी आत्मचरित्र आहे.

पुरस्कार

संदर्भ

बाह्य दुवे

मागील
वसंतदादा पाटील
{{{शीर्षक}}}
जुलै १८, इ.स. १९७८ - फेब्रुवारी १७, इ.स. १९८०
पुढील
ए.आर. अंतुले
मागील
शंकरराव चव्हाण
{{{शीर्षक}}}
जून २६, इ.स. १९८८ - जून २५, इ.स. १९९१
पुढील
सुधाकरराव नाईक
मागील
सुधाकरराव नाईक
{{{शीर्षक}}}
मार्च ६, इ.स. १९९३ - मार्च १४, इ.स. १९९५
पुढील
मनोहर जोशी