आशा पोतदार

मराठी चित्रपट अभिनेत्री

आशा पोतदार (२१ ऑगस्ट, इ.स. १९३९; बंगलोर - ६ एप्रिल, इ.स. २००६; मुंबई) ह्या मराठी नाट्य-चित्रपट सृष्टीतील एक गुणी अभिनेत्री होत्या. त्यांचे वडील बंगलोरमध्ये एक चित्रपट वितरक होते. आशा पोतदार बंगलोरमध्ये बहुधा आपल्या मावशीच्या घरीच वाढल्या. त्यांच्या मावशीला मूलबाळ नव्हते. इ.स.१९५० मध्ये आशा पोतदार उच्च शिक्षणासाठी मुंबईत आल्या. कॉलेजशिक्षण चालू असतानाच त्या पार्वतीकुमारांकडे नृत्य शिकून त्यात पारंगत झाल्या. आशाताईंना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सोहोळ्यांमध्ये नृत्य करावयाची संधी मिळाली आणि त्या उत्तम नर्तकी म्हणून नावाजल्या गेल्या. पुढील आयुष्यात आशा पोतदार यांनी नृत्यप्रशिक्षणाचे कामही केले.

आशा पोतदार
जन्मआशा पोतदार
२१-८-१९३९
बंगलोर
मृत्यू६-४-२००६
मुंबई
राष्ट्रीयत्वभारतीय
कार्यक्षेत्रअभिनय, नृत्य, गीतगायन
भाषामराठी
प्रमुख नाटकेतो राजहंस एक,माते तुलाकाय हवंय
प्रमुख चित्रपट

देवकीनंदन गोपाळा, वावटळ,

जय संतोषी मॉं
पतीदिनेश गुप्ता

६ एप्रिल २००६ रोजी बॉम्बे सेंट्रल येथील जगजीवनराम हॉस्पिटलमध्ये त्यांचे निधन झाले. त्यापूर्वी आधीची चार वर्षे त्या स्तनाच्या कॅन्सरने आजारी होत्या. शेवटच्या सहा महिन्यांत त्यांचा आजार बळावला होता. मृत्युसमयी त्या ६७ वर्षांच्या होत्या.

आशा पोतदार यांच्या पतीचे नाव दिनेश गुप्‍ता असे होते.

कारकीर्द

इ.स.१९७० च्या दशकात आशा पोतदार यांचे अनेक मराठी चित्रपट गाजले. ’वावटळ’ चित्रपटाच्या त्या नायिका होत्या तर ’देवकीनंदन गोपाळा’मध्ये त्यांनी गाडगेबाबांच्या पत्‍नीचे काम केले होते.

कॉलेजच्या स्नेहसंमेलनात झालेल्या, पु.ल.देशपांडे-लिखित 'अंमलदार' या नाटकांत आशा पोतदार यांनी काम केले होते. नाटकाचे दिग्दर्शन पुलंच्या भावाने, म्हणजे रमाकांत देशपांडे यांनी केले होते.

विश्राम बेडेकर यांनी लिहिलेले व आत्माराम भेंडे यांनी दिग्दर्शित केलेले 'नरो वा कुंजरो वा' हे आशा पोतदार यांचे पहिले व्यावसायिक नाटक. पुढील काळात आशा पोतदार यांनी प्रभाकर पणशीकर, आत्माराम भेंडे, बबन प्रभू यांच्या सोबत अनेक नाटकांतून चमकदार भूमिका केल्या. .'अमृताची वेल', 'तो राजहंस एक' ही त्यांची प्रमुख नाटके. 'तो मी नव्हेच' या नाटकाच्या कानडी प्रयोगातही त्यांनी काम केले होते. 'वावटळ' या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना राज्य पुरस्कार मिळाला होता. 'देवकीनंदन गोपाळा', 'जय संतोषी मॉं' असे अनेक चित्रपट त्यांच्या नावावर आहेत. त्यांनी भोजपुरी आणि राजस्थानी चित्रपटांतूनही कामे केली होती.

इ.स.१९७१मध्ये आशा पोतदार यांना अभिनयसम्राट नानासाहेब फाटक यांच्या बरोबर फिरत्या रंगमंचावर 'माते तुला काय हवंय' या नाटकात काम करायला मिळाले. हे नाटक म्हणजे रविंद्रनाथ टागोरांच्या 'विसर्जन'चे मराठी रूपांतर होते. या नाटकामुळे आशाताईंना अफाट प्रसिद्धी मिळाली.

ग.रा.कामत यांनी निर्मिलेल्या आणि रमेश देव यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'प्रेम आंधळं असतं'(१९६२) या चित्रपटातून आशा पोतदार यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले, आणि त्या वर्षीचा उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळवला. त्यानंतर त्यांना 'स्वप्न तेच लोचनी', 'दोन्ही घरचा पाहुणा', 'देवकीनंदन गोपाळा'आणि 'वावटळ' यांही मराठी चित्रपटांतील भूमिकांबद्दलही पारितोषिके मिळाली.

नाटके आणि त्यांतील (भूमिका)

  • अमृताची वेल
  • एक असतो राजा
  • एखाद्याचं नशीब (ताई)
  • कथा कुणाची व्यथा कुणाला (मुग्धा)
  • कशी वैरिण झाली रात (कांचन)
  • झोपी गेलेला जागा झाला
  • तो मी नव्हेच (कानडी रूपांतर)
  • तो राजहंस एक (द्रौपदी)
  • दिनूच्या सासूबाई राधाबाई
  • नरो वा कुंजरो वा
  • प्रपंच करावा नेटका (ताई)
  • प्रेमा तुझा रंग कसा (सुनील, बब्बड)
  • भारती (वेडी)
  • माते तुला काय हवंय (गौरी)
  • मेघमल्हार (लतिका)
  • राव जगदेव मार्तंड

आशा पोतदार यांनी भूमिका केलेले चित्रपट

  • एजंट विनोद (हिंदी) (१९७७)
  • चुनौती (हिंदी) (१९८०)
  • चोरी मेरा काम (हिंदी) (१९७५)
  • जय संतोषी मॉं (हिंदी)(१९७५)
  • जुगनू (हिंदी) (१९७३)
  • तिथे नांदते लक्ष्मी (१९७१)
  • तुमची खुशी हाच माझा सौदा (१९७७)
  • देवकीनंदन गोपाळा(१९७७)
  • दोन्ही घरचा पाहुणा (१९७१)
  • प्रेम आंधळं असतं (१९६२)
  • प्रीत शिकवा मला (१९६८)
  • बिजली (हिंदी) (१९८६)
  • मनचली (हिंदी)(वर्ष ?)
  • मला देव भेटला (१९७१)
  • मामा भाचे (१९७९)
  • रात्र वादळी काळोखाची (१९६९)
  • वावटळ (१९६५)
  • स्वप्न तेच लोचनी (१९६७)
  • हनुमान विजय (हिंदी) (१९७४)

गाजलेली गाणी

  • ह्यो मेला माज्याकडं कवापास्नं बगतोय (देवकीनंदन गोपाळा)

सत्कार आणि पुरस्कार

  • भगिनी निवेदिता प्रतिष्ठानकडून सन्मानपत्र आणि पुरस्कार
  • महाराष्ट्र सरकारचा अभिनयाचा पुरस्कार
🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन