शिवाजी महाराजांची राजमुद्रा

छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा(शिवमुद्रा)

छत्रपती शिवाजी महाराज हे १६३६ वर्षी शहाजी राजांसोबत बेंगळुरूमध्ये राहत होते. वयाच्या बाराव्या वर्षी म्हणजेच १६४२ वर्षी शहाजी महाराजांनी शिवाजी राजांना पुणे जहांगिरी सांभाळण्यासाठी पाठविले. त्यावेळी शहाजी राजेंनी शिवाजी राजांना स्वतंत्र राजमुद्रा, ध्वज, प्रधान आणि शिक्षक यांच्यासोबत पुणे जहांगिरीकडे प्रस्थान केले होते. शिवाजी महाराजांवरील शिवभारत या संस्कृत चरित्र ग्रंथात याचा उल्लेख आढळतो. शहाजी राजे, जिजामाता यांच्या मुद्रा फारसी भाषेत आहेत. शहाजी राजे, जिजामाता यांच्या मुद्रेवर यावनी भाषेचा प्रभाव होता. मात्र, शिवाजी महाराजांची मुद्रा ही संस्कृत भाषेतील आहे. आपल्या भाषेला चालना मिळावी, आपली भाषा-संस्कृती टिकावी हा यामागचा उद्दिष्ट्य होता. १६४६ मध्ये राजमुद्रा उमटविलेले पत्र हे पहिलं पत्र असावे, यावर संशोधकांचे एकमत आहे. १६४६ पासून ते १६८० वर्षांपर्यंतची राजमुद्रा उमटवलेली २५० पत्रे इतिहास संशोधकांकडे उपलभ्य आहेत.[१][२]

शिवाजी महाराजांची राजमुद्रा आणि मर्यादा
  • राजमुद्रेवरील संस्कृत मजकूर:
प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववन्दिता।

शाहसुनो शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते॥

  • अन्वय:
प्रतिपत् चंद्र लेख इव वर्धिष्णुः विश्ववन्दिता।

शाहसुनो शिवस्य एषा मुद्रा भद्राय राजते॥

  • मराठी अर्थ:
  1. प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे प्रतिदिवस वृद्धिंगत होणारी, जगाला वंदनीय असणारी शाहपुत्र शिवाजीची ही मुद्रा मांगल्यासाठी शोभत आहे.
  2. प्रतिपदेचा चंद्र जसा कले कलेने वाढत जातो व अवघ्या विश्वात वंदनीय होतो, त्याप्रकारे शहाजींचा पुत्र शिवाजी महाराजांच्या मुद्रेचा लौकिक वाढत जाईल व ही राजमुद्रा केवळ लोकांच्या कल्याणासाठी चमकेल.
  • इंग्रजी भाषांतर: Ever-increasing like the crescent-moon, the kingdom of Shivaji, son of Shahaji, will always seek the welfare of the people.[३]

मर्यादा मुद्रा

शिवाजी महाराजांच्या काळात कागदपत्रांवर दोन प्रकारच्या मुद्रा उमटवल्या जायच्या. त्यात पत्राच्या सुरुवातीला राजमुद्रा असायची. तर पत्राच्या शेवटी मर्यादा मुद्रा असायची. मर्यादा मुद्रेवरचा मजकूर होता, "मर्यादेय विराजते". याचा अर्थ इथे लेखनाची मर्यादा म्हणजे शेवट झाला. मर्यादा मुद्रेच्या पुढे कुणीही कोणता मजकूर लिहू नये यासाठी मर्यादा मुद्रेचा वापर केला जायचा.

शिवमुद्रेचे वैशिष्ट्य

संस्कृत मध्ये श्लोकबद्ध असलेली शिवाजी महाराजांची राजमुद्रा ही अष्टकोनी आकाराची आहे. अतिशय योग्य मापानुसार या मुद्रेवर १ सेमीचे आठ कोन आहेत.

पत्रावर राजमुद्रा कोणत्या जागी उमटवयाची याबाबतही काही नियम होते. ज्यावेळी एखादं पत्र कार्यालयीन कामकाजाचा भाग म्हणून लिहिले जायचे त्यावेळी राजमुद्रा ही पत्राच्या शीर्षस्थानी उमटवली जायची. पण जेव्हा नातलग, वडिलधारी माणसं किंवा साधू संताना एखादं पत्र पाठवलं जायचं त्यावेळी मात्र शिवमुद्रा ही पत्राच्या मागच्या बाजूस उमटवली जायची. अशी दोन पत्रे उपलब्ध आहेत. त्यापैकी एक कोल्हापूरच्या घाटगे घराण्याला पाठवलेले पत्र तसेच कान्होजी जेधे यांना पाठवलेल्या पत्राच्या पाठीमागे राजमुद्रा उमटवली आहे. याचे कारण म्हणजे शिवरायांपेक्षा ज्येष्ठ असलेल्या व्यक्तींना पाठवलेले पत्र हे आदेश नसायचे. तर त्या व्यक्तीबद्दल असलेला आदर आणि आपुलकी दाखवण्याच्या दृष्टीने शिवमुद्रा ही पत्राच्या मागच्या बाजूस उमटवली जात असे.

महादेव मुद्रा

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर महादेव मुद्रा बनवण्यात आली होती. पण या मुद्रेचा वापर झाल्याची माहिती उपलब्ध नसल्याचं इतिहास संशोधक सांगतात.

शिव‌छत्रपतींची मुद्रा अष्टभूजा असलेली आहे. यात ‘श्री महादेव श्री तुळजाभवानी II शिवनृपरूपेणोर्वीमवतीर्णोय: स्वयं प्रभु र्विष्णू:II एषा तदीय मुद्रा भूबळयस्याभयप्रदा जयतीII’ असा संस्कृत श्लोक कोरलेला आहे. या श्लोकाचा मराठी अनुवाद ‘श्री शिवरायांच्या रुपामध्ये पृथ्वीवरती अवतीर्ण झालेले हे स्वतः श्री विष्णूच होत. त्यांची ही मुद्रा संपूर्ण भूतलाला अभय देणार आहे. तिचा जयजयकार असो,’ असा होतो.

शिवाजी महाराजांची एकमेव मुद्रा असावी असा समज असल्याने ‘महादेव मुद्रा’ असलेल्या कागद्रपत्रांच्या पडताळणीकडे संशोधकांचे दुर्लक्ष झाले आहे. नव्याने शोध लागेलेली ही मुद्रा शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्याभिषेकावेळी बनविली होती. मात्र त्यानंतरही महाराजांनी जुनी राजमुद्रा वापरली आहे. ‘सभासदाच्या बखरी’मध्ये या मुद्रेवरील श्लोक जसाच्या तसा देण्यात आला आहे.[४][५]

वारसा

  • महाराष्ट्र राज्याच्या राज चिन्हावरील ब्रीद वाक्य हे शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेवरून घेण्यात आले आहे. प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्व वंदिता महाराष्ट्रस्य राज्यस्य मुद्रा भद्राय राजते, फरक एवढाच आहे की राजाचे नाव राज्याच्या नावाने बदलले आहे.
  • भारतीय नौदलाचा ध्वज
    शिवाजी महाराजांना आधुनिक भारतीय नौदलाचे जनक मानले जाते, २०२२ साली नवीन तयार केलेल्या भारतीय नौदलाच्या ध्वजावरील बोधचिन्ह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रेपासून प्रेरित आहे.[६]

हे देखील पहा

संदर्भ

🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन