कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर


कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर (जन्म : बेळगाव, ३१ ऑक्टोबर १९२६; - पुणे, ३० जुलै २०१३, पुणे) हे संस्कृतचे, संस्कृतविद्येचे आणि मराठी व्याकरणाचे व्यासंगी अभ्यासक, अध्यापक व संशोधक होते.. ते वेदान्त, योग, तत्त्वज्ञान, संस्कृत साहित्यशास्त्र, मराठी व्याकरण अशा अनेक विषयांवर मराठी, इंग्रजी, आणि संस्कृत ह्या भाषांत ग्रंथस्वरूपात आणि स्फुटलेखरूपात विपुल लेखन करणारे मराठी विद्वान होते.

कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर
कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर
जन्म नावकृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर
टोपणनावकण्टकार्जुन, पंतोजी
जन्म३१ ऑक्टोबर १९२६,
बेळगाव
मृत्यू३० जुलै २०१३,
पुणे
राष्ट्रीयत्वभारत भारतीय
कार्यक्षेत्रमराठी, संस्कृत, अर्धमागधी, व्याकरण, योग, वेदान्त, अध्ययन-अध्यापन, छायाचित्रकला, अक्षरजुळणी
भाषामराठी, संस्कृत, इंग्रजी
कार्यकाळसुमारे १९५०-२०१०
विषयमराठी व्याकरण, संस्कृत साहित्यशास्त्र, वेदान्त, योग, तत्त्वज्ञान, छंद:शास्त्र
प्रसिद्ध साहित्यकृतीमम्मटभट्टविरचित काव्यप्रकाश (चिकित्सक आवृत्ती), मोरो केशव दामल्यांचे शास्त्रीय मराठी व्याकरण (चिकित्सक आवृत्ती), व्याकरणकार मोरो केशव दामले : व्यक्ती आणि कार्य, मराठी व्याकरण : वाद आणि प्रवाद, मराठी व्याकरणाचा इतिहास, कण्टकाञ्जलि:, सुबोध भारती, इत्यादि.
वडीलश्रीनिवास कृष्ण अर्जुनवाडकर तथा अण्णाशास्त्री
आईजानकी श्रीनिवास अर्जुनवाडकर
पुरस्कारराष्ट्रपती पुरस्कार (केंद्र शासन, २०१२), गं.ना.जोगळेकर स्मृती पुरस्कार (महाराष्ट्र साहित्य परिषद, २०१०), जयश्री गुणे सन्मानपत्र (ज्ञान प्रबोधिनी, २००५), कालिदास पुरस्कार (महाराष्ट्र शासन, २००४), साहित्यसम्राट न.चिं.केळकर पारितोषिक (केसरी मराठा संस्था, १९९२).

उमेदवारीचा काळ

वडील श्रीनिवास कृष्ण तथा अण्णाशास्त्री यांच्याकडे पारंपरिक पद्धतीने संस्कृताचे अध्ययन केल्यावर कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर यांनी पुण्यात विष्णूशास्त्री वामन बापट यांनी सुरू केलेल्या आचार्यकुलात तीन वर्षे राहून (शांकर)वेदान्ताचा अभ्यास केला. पुण्याच्या वेदशास्त्रोत्तेजकसभेची परीक्षा देऊन अद्वैत-वेदान्त-कोविद ही बी.ए.-समकक्ष पदवी त्यांनी १९४१ साली वयाच्या १५व्या वर्षी मिळवली. बेळगावला परत जाऊन त्यांनी एक वर्ष कारकुनाची नोकरी केली. ती करीत असताना त्यांना पारंपरिक विद्येचा उपजीविकेसाठी थेट उपयोग नाही हे लक्षात आले. त्यामुळे ते विश्वनाथ विनायक तथा अप्पा पेंडसे यांच्या प्रेरणेने पुण्याला परत आले. तिथे आल्यावर अर्जुनवाडकरांनी अनेक अडथळे पार करून आधुनिक शिक्षणव्यवस्थेत शिरकाव करून घेतला. वयाच्या सोळाव्या वर्षी इयत्ता (मराठी) पहिलीत एक वर्ष त्यांनी काढले. पारंपरिक अध्ययनातून झालेल्या तयारीची कल्पना आणि कदर असणारे रड्डी नावाचे शिक्षणाधिकारी (दंडीच्या काव्यादर्शावरचा सटीक ग्रंथ श्रीपाद कृष्ण बेलवलकर यांच्याबरोबर लिहिणारे संस्कृतज्ञ पंडित रंगाचार्य बालकृष्णाचार्य रड्डी यांचे पुत्र) यांच्यामुळे अर्जुनवाडकरांना इंग्रजी पहिलीत थेट प्रवेश मिळाला. शिक्षणाच्या व्यापक उद्दिष्टांबद्दल स्पष्टता आणि शिक्षणाची आच असणाऱ्या विद्यार्थ्यांबद्दल अपार आस्था असणारे पुण्याच्या जिमखाना भावे स्कूलचे द्रष्टे मुख्याध्यापक नी.वा. तथा बापूसाहेब किंकर यांनी परीक्षा घेऊन त्यांना थेट इंग्रजी सहावी अर्थात् प्री-मॅट्रिक वर्गात प्रवेश दिला. ते १९४६मध्ये मॅट्रिक झाले. या परीक्षेतल्या त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना संस्कृतातल्या प्रावीण्यासाठी असलेली जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्ती मिळाली. या शिष्यवृत्तीसाठीची अर्जुनवाडकरांची तयारी त्यांचे गुरू आणि पुढील काळातले सहकारी अरविंद गंगाधर मंगरूळकर यांनी करून घेतली होती.

पुढील काळात सं-म-त अर्थात् संस्कृत-मराठी-तमिळ यांच्या भाषिक नात्यांबद्दल नवीन सिद्धान्त मांडणारे भाषातज्ज्ञ विश्वनाथ आबाजी खैरे, १९६० च्या दशकात काँग्रेस गवतामुळे निर्माण झालेल्या ॲलर्जीचा अभ्यास करणारे त्वचारोगतज्ञ अरविंद लोणकर, कृषि-अर्थशास्त्रज्ञ, महाराष्ट्रातील आर्थिक-सामाजिक चळवळींचे अभ्यासक आणि लेखक सखाराम हरी देशपांडे, संस्कृतज्ञ आणि मराठी कवी वसंत संतू पाटील हे त्यांचे या काळापासूनचे जवळचे मित्र.

पुढचे शिक्षण (बी.ए. १९५१, एम्.ए. १९५६) कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकरांनी स्वतःच्या हिमतीवर, जवळच्या मित्रांच्या मार्गदर्शनाच्या आधारावर, आणि फोटोग्राफीसह अनेक उद्योगांतून अर्थार्जन करून घेतले. फोटोग्राफीचे शिक्षण त्यांना वडील बंधू विनायक श्रीनिवास अर्जुनवाडकर आणि एका पिढीतील प्रख्यात फोटोग्राफर डॉक्टर एम्. (मोरोपंत) कानिटकर यांच्याकडून मिळाले. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे विचारमग्न अवस्थेतील बाजूने काढलेले प्रसिद्ध छायाचित्र (portrait/profile) अर्जुनवाडकरांनी टिपले होते.

संस्कृत कमिशन

संस्कृताच्या भारतातील सद्यःस्थितीचा अभ्यास करण्यासाठी स्वातंत्र्यानंतर केंद्र सरकारने स्थापलेल्या संस्कृत कमिशनमधे कमिशनचे सचिव प्राच्यविद्यातज्‍ज्ञ रामचंद्र नारायण दांडेकर यांच्या प्रेरणेने अर्जुनवाडकरांनी काम केले, आणि कमिशनबरोबर भारतभर प्रवास केला (१९५६-५७). ठिकठिकाणच्या संस्कृतज्ञांशी कमिशनच्या वतीने संस्कृतातून संवाद साधून त्यांचे म्हणणे कमिशनपुढे हिंदी-इंग्रजीतून मांडणे हे त्यांचे काम होते.

अध्यापन

अर्जुनवाडकरांनी पुण्याचे नूतन मराठी विद्यालय (१९५०-५२), नौरोसजी वाडिया महाविद्यालय (१९५५-६०), स.प. महाविद्यालय (१९६१-७९), कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठ (१९७३-७४), आणि मुंबई विद्यापीठ (१९७९-८६) या ठिकाणी संस्कृत, अर्धमागधी, आणि मराठीचे अध्यापन केले. निवृत्तीनंतर त्यांनी पुण्याच्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठातही काही काळ अध्यापन केले. मुंबईच्या एशियाटिक सोसायटीपासून केंब्रिज विद्यापीठापर्यंत अनेक ठिकाणी अर्जुनवाडकरांनी संस्कृत, योग, वेदान्त, उपनिषदे, भगवद्गीता, रससिद्धान्त अशा अनेक विषयांवर व्याख्याने दिली.

संस्था

अर्जुनवाडकरांनी ज्ञान प्रबोधिनीच्या संस्कृत-संस्कृति-संशोधिका अर्थात संत्रिका या विभागाची स्थापना करून या विभागाला वेळोवेळी दिशादर्शन (१९७५-९०) केले. त्यांच्या प्रेरणेतून आणि संत्रिकेच्या माध्यमातून १९७६ च्या सुमारास सुरू झालेले अभिजात संस्कृत आणि इंग्रजी वाङ्मयाचे वर्ग पुढे सुमारे ३० वर्षं संस्कृतज्ञ लीला अर्जुनवाडकर आणि अरविंद गंगाधर मंगरूळकर, तसेच इंग्रजीचे अभ्यासक प्रा. ढवळे आणि प्रा. मंगळवेढेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवातीला ज्ञान प्रबोधिनीत आणि नंतर इतरत्र चालवले गेले.

त्यांनी निवृत्तीनंतर ज्ञानमुद्रा हा संगणक अक्षरजुळणी उद्योग सुमारे १४ वर्षं गौतम घाटे आणि सुरेश फडणीस या तरुण सहकाऱ्यांच्या मदतीने चालवला. योग्य वळणाच्या देवनागरी अक्षरमुद्रा (fonts) सहजी उपलब्ध नसण्याच्या संगणक अक्षरजुळणीच्या सुरुवातीच्या काळात त्याही तयार करून घेतल्या. तसेच रोमन लिपीत संस्कृत मजकूर लिहिताना वापरण्यात येणारी विशेष चिह्ने (diacritical marks) असलेल्या रोमन अक्षरमुद्राही तयार केल्या. ज्ञानमुद्रेत अक्षरजुळणी झालेला विशेष उल्लेखनीय ग्रंथ म्हणजे मंगरूळकर-केळकरांनी संपादित केलेली आणि मुंबई विद्यापीठाने प्रकाशित केलेली ’ज्ञानदेवी’ (तपशील खाली दिले आहेत).

कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर यांनी आनंदाश्रम संस्थेचे विश्वस्त म्हणूनही काही वर्षे काम केले. आनंदाश्रमाचे आधुनिकीकरण आणि आनंदाश्रमातल्या दुर्मीळ हस्तलिखितसंग्रहाचे संगणकीय जतन (digitization) व्हावे म्हणून त्यांनी प्रयत्नही केले. (हे काम आता राष्ट्रीय पाण्डुलिपी मिशन (National Mission for Manuscripts)-च्या कामाचा भाग म्हणून चालू आहे.)

पत्नी

लीला देव यांच्याशी अर्जुनवाडकरांचा १९५४मधे विवाह झाला. लीला अर्जुनवाडकर यांनी पुण्याच्या स. प. महाविद्यालयात संस्कृत आणि पाली भाषांचे आणि वाङ्मयाचे अध्यापन केले; त्या अभिजात संस्कृत वाङ्मयाच्या (विशेषतः महाकवी कालिदासाच्या) अभ्यासक आहेत. आहेत.

कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर यांचे प्रकाशित साहित्य

  • सुबोध भारती, कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर, अरविंद गंगाधर मंगरूळकर, आणि केशव जिवाजी दीक्षित (प्रकाशक : देशमुख आणि कंपनी, पुणे, १९५३-१९७० या दरम्यान अनेक आवृत्त्या आणि पुनर्मुद्रणे). पाठ्यपुस्तकनिर्मिती महाराष्ट्र सरकारने अंगावर घेण्यापूर्वीच्या काळातली संस्कृत भाषेची ८, ९ आणि १० इयत्तांसाठीची पाठ्यपुस्तके (माध्यम: मराठी).[ दुजोरा हवा]
  • अर्धमागधी शालान्त प्रदीपिका, अरविंद गंगाधर मंगरूळकर आणि कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर (प्रकाशक : य.स. देशपांडे, पुणे, १९५४).[ दुजोरा हवा]
  • अर्धमागधी : घटना आणि रचना, अरविंद गंगाधर मंगरूळकर आणि कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर (प्रकाशक : देशमुख आणि कंपनी, पुणे, १९५८).[ दुजोरा हवा]
  • मराठी : घटना, रचना, परंपरा, अरविंद गंगाधर मंगरूळकर आणि कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर (प्रकाशक : देशमुख आणि कंपनी, पुणे, १९५८).[ दुजोरा हवा]
  • प्रीत-गौरी-गिरीशम्, कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर (रचना १९६० च्या सुमारास; स्वप्रकाशित, १९९३). ही कवी कालिदासलिखित कुमारसंभव या काव्याच्या पाचव्या सर्गाच्या कथानकावर आधारलेली व संस्कृतात दुर्मीळ अशा अन्त्य यमकांचा विपुल वापर असलेली आणि गेयता डोळ्यापुढे ठेवून रचलेली संगीतिका आहे. काही ऐतिहासिक तपशील: या संगीतिकेचा एकमेव प्रयोग १९६० च्या सुमारास पुण्याच्या नौरोसजी वाडिया महाविद्यालयात प्राचार्य न. गो. सुरूंच्या प्रेरणेने झाला. संगीतिकेचे संगीत, गायक (आणि पुण्याच्या आर्य संगीत प्रसारक मंडळाचे माजी सचिव) दाजी अर्थात विजय करंदीकर यांचे होते. प्रत्यक्ष गायन राम श्रीनिवास अर्जुनवाडकर (सूत्रधार), लीला अर्जुनवाडकर (उमा), शकुंतला चितळे (सखी) आणि अरविंद गंगाधर मंगरूळकर (बटू/शिव) यांनी केले होते. नंतरच्या काळात या संगीतिकेचे नृत्यनाट्य स्वरूपातले प्रयोग २००६ च्या सुमारास आणि त्यानंतरही, समीक्षक दिवंगत दत्ता मारुलकर यांच्या कन्या नृत्यांगना प्रज्ञा अगस्ती यांनी, आणि इ.स. २००९ च्या सुमारास अनुराधा वैद्य यांनी पुण्यात आणि इतरत्र केले.
  • मम्मटभट्टविरचित काव्यप्रकाश, अरविंद गंगाधर मंगरूळकर आणि कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर (संपादक) (प्रकाशक : देशमुख आणि कंपनी, पुणे, १९६२). "व्यापक उपन्यास, पहिला-दुसरा-तिसरा-दहावा या उल्लासांचा मूलपाठ, मराठी भाषांतर आणि विस्तृत, चिकित्सक विवेचन, अध्ययनोपयोगी विविध सूची, - या सामग्रीने परिपूर्ण" (ग्रंथाच्या शीर्षकपृष्ठावरून उद्धृत).
  • छंदःशास्त्राची चाळीस वर्षे, कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर (नवभारत मासिक, सप्टेंबर १९६२). [१] इथे उपलब्ध.
  • कण्टकाञ्जलि:, कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर (कण्टकार्जुन या टोपण नावाने) (स्वप्रकाशित, १९६५, २००८). खेळकर विनोद, उपरोध आणि खोचकपणा - आणि प्रसंगी टीकात्मकही - अशा अनेक दृष्टिकोनांतून आधुनिक जीवनाकडे बघणाऱ्या संस्कृत मुक्तकांचा संग्रह. संस्कृत रचना-प्रस्तावना-टीपा, आणि मराठी-इंग्रजी भाषांतर. या पुस्तकाला अरविंद गंगाधर मंगरूळकर यांची मराठी तर न.गो. सुरू यांची इंग्रजी प्रस्तावना होती.
  • शास्त्रीय मराठी व्याकरण, मोरो केशव दामले (मूळ लेखक; चिकित्सक आवृत्तीचे संपादक: कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर) (प्रकाशक : देशमुख आणि कंपनी, पुणे, १९७०). मूळ लेखकाच्या हयातीत १९११ साली प्रकाशित झालेल्या या ग्रंथाच्या पहिल्या आवृत्तीची चिकित्सक आवृत्ती कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकरांनी संपादित केली. या चिकित्सक आवृत्तीत 'मोरो केशव दामले: व्यक्ति, वाङ्मय' हा उपन्यास, संपादकीय टिपणे, सविस्तर विषयानुक्रम, आणि विषयसूची अशी अनेकविध अध्ययनसामग्री उपलब्ध आहे. या आवृत्तीचा ’संपादनाचा आदर्श’ अशा शब्दांत अभ्यासकांनी गौरव केला होता.
  • वेंकटमाधवकृत महाराष्ट्रप्रयोगचंद्रिका, संपादक: कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर (प्रकाशक : देशमुख आणि कंपनी, पुणे, १९७०). "मूळ हस्तलिखितावरून संपादित करून प्रथमच छापलेला मराठी व्याकरणावरचा संस्कृत-मराठी जुना लघुग्रंथ" (ग्रंथाच्या शीर्षकपृष्ठावरून उद्धृत).
  • संस्कृत भाषा आणि साहित्य हा पंडित महादेवशास्त्री जोशी यांनी संपादित केलेल्या भारतीय संस्कृतिकोशाच्या नवव्या खंडातील विस्तृत निबंध अर्जुनवाडकरांनी लिहिलेला आहे (१९७६).
  • ग-म-भ-न, कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर (पंतोजी या टोपण नावाने) (ललित मासिक, सप्टेंबर १९८२ ते ऑक्टोबर १९८६; मॅजेस्टिक प्रकाशन, पुणे). मराठी शुद्धलेखनाच्या संदर्भातल्या अनेक प्रश्नांचा ऊहापोह करणारी ३१ लेखांची लेखमाला. हे सर्व लेख [२] इथे लेखक आणि प्रकाशक ह्यांच्या अनुमतीने उपलब्ध आहेत.
  • मराठी व्याकरण : वाद आणि प्रवाद, कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर (प्रकाशक : सुलेखा प्रकाशन, पुणे, १९८७). मराठी व्याकरणातील वादग्रस्त प्रकरणांचा ऊहापोह करणारा, आणि मराठी व्याकरणाची स्वतंत्र - म्हणजे इंग्रजी आणि संस्कृत व्याकरणांच्या जोखडांमधून मुक्त अशी - मांडणी सुचवणारा ग्रंथ.
  • मराठी व्याकरणाचा इतिहास, कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर (प्रकाशक : मुंबई विद्यापीठ, मुंबई + ज्ञानमुद्रा, पुणे, १९९१). मराठी व्याकरणाचा चिकित्सक आणि कालक्रमानुसार आढावा घेणारा ग्रंथ.
  • मम्मटभट्टकृत काव्यप्रकाश उल्लास १-२-३, कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर (संपादन, उपन्यास) (प्रकाशक : ज्ञानमुद्रा, पुणे, १९९२). प्रस्तावना, मूळ संहिता, मराठी भाषांतर, आणि विवेचन पाठ्यपुस्तकरूपात.
  • मुंबई विद्यापीठ मराठी विभाग यांनी ज्ञानदेवी या तीन खंडात प्रकाशित (१९९४) केलेल्या अरविंद गंगाधर मंगरूळकर आणि विनायक मोरेश्वर केळकर यांनी संपादित केलेल्या राजवाडे प्रतीच्या ज्ञानेश्वरीच्या चिकित्सक आवृत्तीमधल्या व्याकरणविषयक नव्या टीपा कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकरांच्या आहेत. संपादकांचे या ग्रंथात समाविष्ट केलेले दुर्मीळ छायाचित्रही त्यांनीच घेतलेले आहे. या ग्रंथाची अक्षरजुळणी कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकरांच्या देखरेखीखाली त्यांनी स्वतः निवृत्तीनंतर सुरू केलेल्या आणि निर्दोष जुळणीसाठी प्रसिद्ध असलेल्या ज्ञानमुद्रा या अक्षरजुळणी उद्योगात झाली आहे.
  • गीतार्थदर्शन, कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर (प्रकाशक : आनंदाश्रम संस्था, पुणे, १९९४). मूळ गीता, मराठी अनुवाद, टीपा, आणि विवरण : वेदान्त तत्त्वज्ञानावरच्या विस्तृत प्रस्तावनेसह.
  • गीतार्थदर्शन, कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर (प्रकाशक : आनंदाश्रम संस्था, पुणे, १९९४). केवळ मूळ गीता आणि मराठी अनुवाद असलेली वरील ग्रंथाची संक्षिप्त आवृत्ती.
  • नैषधीयचरित (पहिला सर्ग). मूळ संहिता : श्रीहर्ष; मराठी अनुवाद: रा.ब. आठवले; संपादन, टीपा, आणि प्रस्तावना: कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर (१९९४).
  • व्याकरणकार मोरो केशव दामले: व्यक्ती आणि कार्य, कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर (प्रकाशक : राज्य मराठी विकास संस्था, मुंबई, १९९७ आणि २००५).
  • Yoga Explained: A New Step-by-step Approach to Understanding and Practising Yoga, मीरा मेहता आणि कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर (प्रकाशक : Kyle Kathie, UK, 2004). या पुस्तकाच्या प्रत्येक प्रकरणातला योग तत्त्वज्ञानाचा भाग, आणि शेवटचा कल्पनाधारित "Dr. Patañjali, the Psychiatrist" हा लेख, हे कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकरांनी लिहिले आहेत.
  • ध्वन्यालोक : एक विहंगमालोक, कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर (प्रकाशक : टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे, २००६). आनंदवर्धनाच्या साहित्यशास्त्रावरच्या प्रसिद्ध ग्रंथाची विद्यार्थ्यांसाठी संक्षिप्त ओळख.
  • पातञ्जल-योगसूत्राणि, (प्रकाशक : भांडारकर प्राच्यविद्या संस्था, पुणे, २००६). पतंजलीची योगसूत्रे, व्यासांचे भाष्य, वाचस्पतिमिश्राची टीका, आणि नागोजीभट्टाची टीका असलेल्या मूळच्या १९१७ साली राजारामशास्त्री बोडस आणि नंतर वासुदेवशास्त्री अभ्यंकर यांनी संपादित केलेल्या ग्रंथाची यथामूल पुनरावृत्ती (photographic reprint) कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकरांच्या विस्तृत प्रस्तावना आणि संस्कृत श्लोकबद्ध योगसारासहित.
  • विविध नियतकालिकांमधून वेळोवेळी प्रसिद्ध झालेले सुमारे ३०० लेख.
  • सप्टेंबर १९८२ ते ऑक्टोबर १९८६ ह्या कालावधीत ललित मासिकात पंतोजी ह्या टोपणनावाने प्रा. कृ. श्री. अर्जुनवाडकर ह्यांनी मराठीचे शुद्धलेखन ह्या विषयावर एक लेखमाला चालवली होती. मराठीच्या शुद्ध लेखनाविषयीच्या अनेक प्रश्नांचा ऊहापोह ह्या लेखमालेत झाला आहे. ह्या लेखमालेतील एकूण ३१ लेख वेचक डॉट ओआरजी या संकेतस्थळावर आहेत.

संस्कृतेन अभिनन्दत, अभिवादयत -- Wishॆes/Greetings in Sanskrit

संस्कृत भाषा आधुनिक जीवनाच्या जवळ नेण्याचा एक प्रयत्न म्हणून आधुनिक पद्धतीची इंग्रजी अभिवादने (greetings) कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकरांनी समर्पक आणि सोप्या संस्कृतातून, आणि प्रसंगी वृत्तबद्ध स्वरूपात, उपलब्ध करून दिली आहेत.

इंग्रजी अभिवादनसंस्कृत रूपांतर
Good morningसुप्रभातम्
Good dayसुदिनम्
Good nightसुरात्रि:/सुनक्तम्
Sleep wellसुषुप्तम्
Good byeस्वस्ति
See you againपुनर्दर्शनाय
I/We take your leaveसाधयामो वयम्
Wish you gloryश्रीरस्तु
Wish you successसिद्धिरस्तु
Wish you best of luckसुभाग्यमस्तु
We reciprocate your good wishesप्रत्याशंसामहे शं व:
Many happy returns of the dayदिनमिदं समुदेतु पुनः पुनः
Happy birthdayभवतु वो जन्मदिनं प्रीतये
Thank youधन्योस्मि(पुं.)/धन्यास्मि(स्त्री.)/धन्या: स्म:(उ.); उपकृतोस्मि(पुं.)/उपकृतास्मि(स्त्री.)/उपकृता: स्म:(उ.)
No mention/Don't mention itयत् किंचित् एतत्
Welcomeस्वागतम्
Pleaseप्रसीदत
I am happy/I am pleasedप्रीतोस्मि(पुं.)/प्रीतास्मि(स्त्री.)/प्रीता: स्म:(उ.)
I am sorryखिन्नोस्मि(पुं.)/खिन्नास्मि(स्त्री.)/खिन्ना: स्म:(उ.)
Happy journeyशुभास्ते पन्थान: सन्तु
Happy flight, happy landingसुखमुत्पतनम्, सुखमवतरणम्
Wish you both a very happy and prosperous married lifeसुखायास्तु शुभायास्तु दाम्पत्यं परमाय वाम्
May Diwali bring you happiness and prosperityअस्तु दीपावली तुष्टये पुष्टये
Happiness, health, and wealth -- May the new year showerप्रवर्षतु नवं वर्षं सुखमारोग्यमृद्धताम्

मराठीतल्या पदान्तीच्या दीर्घ अकाराचे लेखन

कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकरांच्या कुठे फारशा नोंदवल्या न गेलेल्या एका लेखनविषयक प्रयोगाबद्दल ही टीप आहे. संवादलेखनात येणाऱ्या नपुंसकलिंगी मराठी शब्दाच्या शेवटी येणारा {एके काळी अनुस्वारयुक्त लिहिला जाणारा आणि कोकणी लोकांकडून अनुनासिक उच्चारला जाणारा) एकार (उदा० 'गाव' याचे अनेकवचन 'गावें'; ’जसें’; 'कसें') हा संभाषणात पुष्कळदा दीर्घ अकार होऊन येतो. या दीर्घ अकारासाठी अनुस्वाराचेच चिह्न (म्हणजे अक्षराच्या डोक्यावर दिले जाणारे भरीव टिंब) वापरण्याचा प्रघात आहे. (गावें ऐवजी गावं; जसें ऐवजी जसं आणि तसें ऐवजी तसं) .म्हणजेच, एकच चिह्नाचे दोन पूर्णतः अलग उच्चार होतात. दाखल्यादाखल, - 'टिंब', 'संबंध' या शब्दांमधले टिंब हे अनुस्वारदर्शक आहे, तर 'जसं', 'मधलं' यांमधले टिंब हे पदान्तीचा दीर्घ अकार दाखवणारे आहे. मराठी संभाषणात येणारा पदान्तीचा दीर्घ अकार अनुस्वाराहून वेगळा दाखवण्यासाठी कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकरांनी त्यांच्या 'गीतार्थदर्शन' (१९९४) या ग्रंथात टिंबाच्या ऐवजी शून्यसदृश पोकळ आकाराचा वापर केला आहे. या ग्रंथाच्या अनुक्रमणिकेतले स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे: "या ग्रंथातल्या मराठी मजकुरात सर्वत्र पदान्तीच्या दीर्घ अकाराचं चिह्न म्हणून त्या त्या अक्षराच्या डोक्यावर पोकळ टिंब-शून्य-दिलं आहे". (उद्धृत केलेल्या मजकुरात अर्जुनवाडकरांनी 'अकाराचं' आणि 'दिलं' या शब्दांमधे पोकळ टिंबच वापरले आहे; शिरोरेघेच्या वर दिले जाऊ शकेल असे पोकळ टिंब किंवा शून्य देवनागरी युनिकोडात आपातत: नाही, म्हणून इथे वापरता आलेले नाही).


🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन