घुमर नृत्य

राजस्थानी पारंपरिक लोकनृत्य
(घूमर नृत्य या पानावरून पुनर्निर्देशित)

घुमर हे राजस्थानातील एक प्रसिद्ध लोकनृत्य आहे. [१]घुमणे या शब्दाचा अर्थ चकरा मारणे, गिरक्या घेणे असा होतो. यावरून अनेक गिरक्या घेत सादर केल्या जाणाऱ्या या नृत्यप्रकाराला घुमर असे नाव पडले आहे. सार्वजनिक सण आणि उत्सवप्रसंगी महिला हे लोकनृत्य सादर करतात.[२]

घुमर नृत्य

इतिहास

भिल्ल या जमातीमध्ये सरस्वतीच्या उपासनेसाठी हे नृत्य करण्याचा प्रघात होता. पुढे संपूर्ण राजस्थान राज्यात हे नृत्य केले जाऊ लागले. सर्वच उत्सव प्रसंगी हे नृत्य केले जात असले तरीही नवरात्री व गणगौर प्रसंगी हे नृत्य विशेषत्त्वाने केले जाते. हे पारंपारिक नृत्य केवळ स्त्रिया सादर करतात.महाराजा वा संस्थानिक यांच्या दरबारात महिला हे नृत्य सादर करीत असत. शिव आणि पार्वती यांच्या मूर्तींच्यासमोर महिला हे नृत्य राजाच्या महालात व हवेलीत करीत. कालांतराने या नृत्याला सामूहिक व्यासपीठ मिळाले आणि ते लोकप्रिय झाले.[३]

नृत्य पद्धती

पारंपरिक पोशाख परिधान घरून घुमर नृत्य करणा-या महिला

गोलाकार उभे राहून वेगवेगळ्या प्रकारे गिरक्या घेत हे नृत्य केले जाते. खाली वाकून टाळ्या वाजवून तर कधी टिचक्या वाजवत केले जाणारे हे नृत्य अतिशय लोभसवाणे आहे. दोन दोन स्त्रियांच्या समोरासमोर जोड्या करून लांब जाऊन परत जवळ येत तर कधी स्वतःभोवती चक्कर घेत हे नृत्य केले जाते. गाणे जसे पुढे सरकते तशी गाण्याची लयही हळूहळू वाढत जाते. गोलाकार नाचत असताना अतिशय सुंदरतेने एकमेकांमधील अंतर समान राखत हे नृत्य केले जाते. कधी कधी हातात टिपऱ्या किंवा लाकडी तलवारी घेण्याची प्रथा सुद्धा आहे. क्वचित प्रसंगी स्त्रिया व पुरुष मिळून हे नृत्य सादर केले जाते. ढोलक, मंजिरा, झालर, एकतारा वगैरे वाद्यांचा वापर या नृत्यात केला जातो.

  • प्रकार-

घूमर नृत्यामध्ये तीन प्रकार असतात-[४]

  • झुमरियो लहान मुलींनी करावयाचे नृत्य
  • लूर- गरासिया जंजातीचे वैशिष्टयपूर्ण नृत्य
  • घुमर- महिलांनी करावयाचे नृत्य


  • वेशभूषा-

घागरा हे या नृत्यातील प्रमुख आकर्षण असते. घागरा-चोळी किंवा चनिया- चोळी आणि ओढणी अशी वेशभूषा केली जाते. हे घागरे रंगीबेरंगी असतात व त्यावर आरसेकाम केलेले आढळते.[५] विविध प्रकारचे चकचकीत दागिने व बांगड्या परिधान केल्या जातात.

समाज माध्यमांवर स्थान

नृत्य करणारी राजपूत महिला

हा नृत्यप्रकार केवळ राजस्थान प्रांतापुरता मर्यादित राहिला नसून चित्रपट माध्यमाद्वारे तो समाजात प्रसिद्ध पावलेला आहे असेही आधुनिक काळात दिसून येते.[६]

संदर्भ आणि नोंदी