चैत्य

बौद्ध धर्मियांचे प्रार्थनास्थळ

चैत्य हा एक शिल्पप्रकार आहे. बौद्ध धर्मीयांच्या प्रार्थनास्थळाला चैत्य किंवा चैत्यगृह म्हणतात. हे बौद्ध सत्पुरुषांचे समाधिस्थळ असते. येथे बौद्ध संतांच्या अवशेष असलेल्या समाध्या असतात. हे स्तूपाप्रमाणे दिसते. चैत्य हा एक शिल्पप्रकार आहे. चैत्यगृहे सुद्धा धनुष्याकार आकाराची असून त्यांच्या गोलाकार भागात अंडाकृती आकाराचा स्तूप कोरलेला असतो. वरती गजपृष्ठाकृती छप्पर कोरलेले असते. चिता किंवा चिती या संस्कृत शब्दापासून चैत्य हा शब्द बनला आहे. अजिंठा येथील चैत्यगृहातील स्तूप प्रतीकात्मक आहेत. यामध्ये कोणत्याही बौद्ध संतांचे किंवा आचार्यांचे अवशेष ठेवलेले नाहीत.

अजिंठा लेणी क्र.२६चा चैत्यगृह

अर्थ

चैत्य या शब्दाचे जीवात्मा, सीमेवरचे झाड, यज्ञवेदी, जैनांचे मंदिर, पार बांधलेला पवित्र वृक्ष असे वेगवेगळे अर्थ होतात.[१]

विहार आणि चैत्य

बौद्ध स्थापत्यात विहार आणि चैत्य हे दोन्ही आढळते. विहार हे प्रामुख्याने भिक्खू सदस्यांची निवासस्थाने असत. चैत्यगृह हे सर्वांसाठी प्रार्थनागृह म्हणून बांधलेले असे.[२]

इतिहास

वैदिक काळात सत्पुरुषांचे दहन केल्यानंतर त्यांच्या अस्थी, रक्षा आदी अवशेष पुरून ठेवीत व त्यावर वेदी किंवा चबुतरा बांधीत. हे स्मारक म्हणजे चैत्य हौय. ही प्रथा कालांतराने बौद्ध आणि जैन संप्रदायांत स्वीकारली गेली. मृताचे स्मारक म्हणून केवळ चबुतरा न बांधता त्यावर घुमटाच्या आकारचे शिल्प तयार केले जाऊ लागले. चैत्य ही धार्मिक संज्ञा आहे तर स्तूप ही शिल्पशास्त्रातील संकल्पना म्हणून ओळखली जाते.[१] जैन साहित्यात ज्या पार बांधलेल्या वृक्षाखाली बसले असता तीर्थकरांना केवळ ज्ञान प्राप्त झाले त्या वृक्षांना चैत्यवृक्ष म्हणतात.[३][४]

चैत्य हे ठरावीक उंचीवर व ठरावीक दिशेवरच असतात. जेव्हा सूर्याचे किरण स्तूपावर पडतात तेव्हा उजाडायला लागते. बोगद्यासारख्या खोदलेल्या चैत्यगृहामध्येही अंधार नसतो.बुद्धमूर्तीसमोर विपश्यनेसाठी बसल्यावर साधनेमध्ये बाधा येऊ नये यासाठी, प्रकाश डोळ्यांवर नव्हे तर पाठीमागून पडावा याची पुरेपूर काळजी घेण्यात आलेली असते.[ संदर्भ हवा ] अनेक उपासकांना एकाच वेळी प्रार्थना, उपासना करण्याची सोय म्हणून चैत्यगृह बांधले जाई.[४] चैत्यगृहात अनेक स्तंभ असतात. विशिष्ट पद्धतीने स्तूपाभोवती फिरणारे एवढे सारे स्तंभ आधारासाठी नसून ते प्रदक्षिणा मार्ग वेगळा करण्यासाठी असतात. बुद्धांना अभिवादन त्यांना प्रदक्षिणा घालूनच पूर्ण व्हायची, तीच परंपरा चैत्यगृहात प्रदक्षिणापथ कायम ठेवून जोपासली गेली आहे.

शिल्पशास्त्रात

हीनयान पंथाच्या उपासकांनी इसवी सन दुसऱ्या शतकात डोंगर खोदून विहार आणि चैत्य निर्माण करण्यास सुरुवात केली. या काळानंतरच भारतात पुण्याजवळ भाजे, कोंडाणे, कार्ले तसेच जुन्नर, बेडसे, अजिंठा (लेणे ९ व १०), नाशिक अशा ठिकाणी चैत्यगृहे निर्माण झाली.[१] कोल्हापूर जिल्ह्यातील मसाई पठार, पोहाळे तर्फ आळते, तालुका पन्हाळा येथेही चैत्यगृहे व विहार आहेत.

चित्रदालन

संदर्भ

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत