दत्ताराम मारुती मिरासदार

भारतीय लेखक
(द.मा. मिरासदार या पानावरून पुनर्निर्देशित)

दत्ताराम मारुती मिरासदार (१४ एप्रिल, १९२७ - २ ऑक्टोबर २०२१)[१] (रूढ नाव द. मा. मिरासदार) हे मराठीतले साहित्यिक, कथाकथनकार, विनोदी लेखक, पटकथाकार आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष होते. त्यांचे शिक्षण अकलूज, पंढरपूर येथे झाले. पुण्यात आल्यावर ते एम्‌.ए. झाले. काही वर्षे पत्रकारीता केल्यानंतर त्यांनी इ.स. १९५२ साली अध्यापनक्षेत्रात प्रवेश केला. पुण्याच्या कॅंप एज्युकेशनच्या शाळेत ते शिक्षक होते. इ.स. १९६१ मध्ये ते मराठीचे प्राध्यापक झाले.

दत्ताराम मारुती मिरासदार उर्फ द. मा. मिरासदार
Mirasdar candid photo
जन्म१४ एप्रिल, १९२७
अकलूज
मृत्यू२ ऑक्टोबर, २०२१ (वय ९४)
पुणे
राष्ट्रीयत्वभारतीय
कार्यक्षेत्रनाटक, साहित्य
वडीलमारुती मिरासदार
पुरस्कारसाहित्य अकादमी
महाराष्ट्र राज्य वाङमय पुरस्कार
साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद

व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील आणि द. मा. मिरासदार ही त्रयी १९६२ सालापासून महाराष्ट्राच्या निरनिराळ्या भागात कथाकथने करीत असत. त्याद्वारे त्यांनी महाराष्ट्रातील जनतेची उत्तम करमणूक केली होती. कथाकथनाचे तीनहजारांहून अधिक कार्यक्रम केल्याने या त्रयीच्या कार्यक्रमात परिपक्वता जाणवत असे. द. मा. मिरासदार ध्वनीक्षेपकासमोर उभे राहून हातवारे करीत बोलू लागले की, श्रोत्यांना एक अद्भुत नाट्य अनुभवायला मिळे. मिरासदारांच्या कथाकथनाचे कार्यक्रम महाराष्ट्राबाहेरही कलकत्ता, इंदूर, हैदराबादसारख्या शहरांतून कार्यक्रम झाले. त्याचप्रमाणे त्यांनी कॅनडा-अमेरिकेतल्या २३ गावांतून २५ कार्यक्रम करायचा विक्रमही केला होता. कथाकथनाखेरीज त्यांची विनोदी भाषणेही गाजत असत. द. मा. मिरासदार यांच्या कथाकथनाचे कार्यक्रम वाईच्या वसंत व्याख्यानमालेत आणि वाई प्राज्ञपाठशाळेच्या सरस्वती उत्सवामध्ये अनेकदा झाले आहेत.

मराठीतील श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, राम गणेश गडकरी, चिं.वि. जोशी, आचार्य अत्रे, पु.ल. देशपांडे यांनी जोपासलेली विनोदा लेखनाची परंपरा द. मा. मिरासदारानी पुढे सुरू ठेवली. मिरासदारांच्या व्यंकूची शिकवणी, माझ्या बापाची पेंड, शिवाजीचे हस्ताक्षर, भुताचा जन्म, माझी पहिली चोरी, हरवल्याचा शोध इत्यादी कथा उत्कृष्ट लिखाण आणि त्याचे इत्तम सादरीकरण यामुळे वाचकांच्या आणि श्रोत्यांच्या मनात कायमच्या कोरल्या गेल्या आहेत. गप्पागोष्टी, गुदगुल्या, मिरासदारी, गप्पांगण, ताजवा, असे २४ कथासंग्रह, १८ विनोदी चित्रपटांच्या पटकथा त्यांच्या नावावर आहेत. 'एक डाव भुताचा' या चित्रपटात कथा-पटकथा लेखनासह हेडमास्तरची भूमिकाही त्यांनी वढवली होती. मिरासदारांच्या लेखनात अस्सल विनोदी अशी अनेक गावरान पात्रे आढळतात. त्यात नाना चेंगट, गणा मास्तर, रामा खरात, बाबू पैलवान, सुताराची चहाटळ आनशी, ज्ञानू वाघमोडे, अशी एकाहून एक अस्सल इब्लीस, बेरकी, वाह्यात, टारगट आणि क्वचित भोळसट अशी ही सारी पात्रे आहेत. ती श्रोत्यांना खळाळून हसायला लावत.

मिरासदारांच्या कथासंग्रहांतील बहुतेक कथा ग्रामीण जीवनावर आहेत. ग्रामीण जीवनातील विसंगतीचे, विक्षिप्तपणाचे आणि इरसालपणाचे दर्शन घडवून त्यातील विनोद मिरासदारांनी आपल्या कथांतून फुलवला. असे असले, तरी ‘स्पर्श’, ‘विरंगुळा’, ‘कोणे एके काळी’ सारख्या काही गंभीर कथांतून त्यांनी जीवनातील कारुण्यही प्रत्ययकारीपणे टिपले आहे. तथापि त्यांची स्वाभाविक प्रवृत्ती मिस्किल कथा लिहिण्याकडेच आहे.

पुण्यात झालेल्या ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ८३ वर्षांच्या द.मा. मिरासदारांनी 'भुताची गोष्ट' ऐकवली. ही गोष्ट दीड तासाहून अधिक काळ रंगली होती. अवघा मंडप हास्यकल्लोळात बुडून गेला होता. आवाजातला नाट्यमय चढउतार, छोट्या छोट्या प्रसंगांतून आणि संवादातून कथा फुलवत नेण्याची त्यांची करामत, अस्सल गावरान पात्रे श्रोत्यांच्या डोळ्यांसमोर उभी करण्याची त्यांची क्षमता ८३ व्या वर्षीही अबाधित असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले.

एक डाव भुताचा आणि ठकास महाठक ह्या दोन चित्रपटांच्या संवादलेखनाबद्दल त्यांना पारितोषिके मिळाली आहेत. ‘व्यंकूची शिकवणी’ ह्या त्यांच्या गाजलेल्या विनोदी कथेवरून गुरुकृपा हा मराठी चित्रपट काढण्यात आला होता. पुणे शहरात त्यांच्या नावाचे ‘द.मा. मिरासदार प्रतिष्ठान’ आहे.

असे सांगितले जाते की मराठीत विनोदी गद्यकाव्य लिहिणारे वि.रा. भाटकर हे द.मा. मिरासदार होते, किंबहुना वि.रा. भाटकर हे त्यांचेच टोपणनाव होते. (संदर्भ : ठणठणपाळ यांचे ललित मासिकातले 'घटका गेली' हे सदर) जय हिंद

वि.रा. भाटकर यांची एक(मेव?) प्रसिद्ध गद्यकविता -मला दारू चढत नाही!

' मला दारू चढत नाही' ही कविता सन १९९३ च्या 'अपूर्व'- दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली आहे. मूळ कविता अशी :-

मला दारू चढत नाही
दारूबंदी असूनही
मी दारू खूप पितो पण मला दारू
कधी चढत नाही.
याचं एक कारण आहे.
दारू पिण्याची माझी एक
स्पेशल सिस्टीम आहे.
ती अशी-
दारू प्यायची असली म्हणजे
मी ती रात्री झोपण्यापूर्वी पितो.
तेव्हा आधी बायकोच्या खोलीत
हळूच डोकावून पाहतो.
बायको पलंगावर
गाढ झोपलेली असते.

मग मी माझ्या खोलीत येतो.
दारूची बाटली आणि ग्लास
टेबलावर घेऊन बसतो.
प्रथम मी
बाटलीचं बूच काढतो.
मग तिच्यातली भरपूर दारू
ग्लासात ओतून घेतो.
बूच बाटलीला परत लावून टाकतो
आणि बाटली
कपाटात ठेवून देतो.
मग ग्लासातली
सगळी दारू मी पिऊन टाकतो.
मग मोरीत जाऊन
ग्लास धुऊन टाकतो-
आणि फळीवर ठेवून देतो.
मग मी पुन्हा बायकोच्या खोलीत
हळूच डोकावून पाहतो.
बायको पलंगावर
गाढ झोपलेली असते.
बघितलंत?
या कानाचा
त्या कानाला पत्ता नाही
आणि दारू मला
चढलेलीसुद्धा नाही.

मग जरा वेळाने
मी पुन्हा बाटली आणि
ग्लास काढतो.
बाटलीचं बूच काढतो.
भरपूर दारू
ग्लासात ओतून घेतो.
मग बाटलीला बूच लावून
मोरीत ठेवून देतो. मग ग्लासातली
सगळी दारू पिऊन
कपाटात जाऊन
ग्लास धुऊन टाकतो.
आणि फळीवर ठेवून देतो.
मग हळूच बायकोच्या खोलीत
डोकावून पाहतो.
बायको पलंगावर गाढ झोपलेली
असते.
बघितलंत?
या कानाचा त्या कानाला
पत्ता नाही आणि दारू मला
अजून चढलेली नाही.

मग थोड्या वेळाने मी पुन्हा
बाटली आणि ग्लास काढतो
ग्लासाचं बूच काढतो
भरपूर दारू कपाटात ओतून घेतो.
मग बाटलीला बूच लावून
ती बायकोच्या पलंगावर ठेवून देतो.
मग मोरीतली सगळी दारू पिऊन
कपाटात जाऊन
ग्लास धुऊन टाकतो
आणि फळीवर ठेवून देतो.
मग हळूच
बायकोच्या कानात
डोकावून पाहतो.
बायको मोरीत
गाढ झोपलेली असते.बघितलंत?
या कानाचा त्या कानाला
पत्ता नाही आणि दारू मला
अजून चढलेली नाही.

मग थोड्या वेळाने
मी पुन्हा
बाटली आणि ग्लास काढतो.
बाटलीचं बूच काढतो.
भरपूर दारू
मोरीत ओतून देतो.
मग कपाटाला बूच लावून
मोरीत ठेवून देतो.
कपाटातली सगळी दारू पिऊन
ग्लासात जाऊन
मोरी धुऊन टाकतो.
आणि फळीवर ठेवून देतो.
मग बाटलीच्या कानात
हळूच डोकावून पाहतो.
बाटली अजून कपाटावर
गाढ झोपलेली असते.
बघितलंत?
या बाटलीचा त्या बाटलीला
पत्ता नाही आणि दारू मला
अजून चढलेली नाही.

मग थोड्या वेळाने
मग पुन्हा
मोरी आणि कपाट काढतो.
मोरीतली दारू
कपाटात ओतून घेतो.
अगदी भरपूर. बरं का!
मग कपाट
मोरीत ठेवून देतो.
हो, ठेवून देतो
मग मोरीतली सगळी दारू
पिऊन टाकतो.
सगळी पितो बरं का!
मग मी बायकोच्या खोलीत जाऊन
कपाट धुऊन टाकतो.
अगदी साफ धुऊन टाकतो
बरं का!.
आणि फळी
कपाटावर ठेवून देतो.
मग कपाटातल्या मोरीत
हळूच डोकावून बघतो
हळूच, बरं का!
बायको मोरीत
गाढ झोपलेली असते.
हा: हा: हा:!
बघितलंत?
या बायकोचा त्या बायकोला
पट्टा नाही
आणि मी इटकी
दारू प्यायलो
पण अजून मला
च्यढली णाही खर्रना ?

द.मा. मिरासदार यांचे प्रकाशित साहित्य

नावसाहित्यप्रकारप्रकाशनप्रकाशन वर्ष (इ.स.)
अंगतपंगतलेख संग्रहसुयोग प्रकाशन
खडे आणि ओरखडेलेख संग्रहकॉंटिनेन्टल प्रकाशन
गप्पांगणलेख संग्रहकॉंटिनेन्टल प्रकाशन१९८५
गप्पा गोष्टीकथा संग्रहरसिक आंतरभारती
गंमतगोष्टीकथा संग्रहसुपर्ण प्रकाशन
गाणारा मुलुखबाल-नाटिकाकॉंटिनेन्टल प्रकाशन१९६९
गुदगुल्याकथा संग्रहसुपर्ण प्रकाशन
गोष्टीच गोष्टीलेख संग्रहमनोरमा प्रकाशन
चकाट्याकथा संग्रहरसिक आंतरभारती
चुटक्यांच्या गोष्टीकथा संग्रहकॉंटिनेन्टल प्रकाशन
जावईबापूंच्या गोष्टीबालसाहित्यसुपर्ण प्रकाशन१९८०
ताजवाकथा संग्रह
नावेतील तीन प्रवासीभाषांतरित कादंबरीकॉंटिनेन्टल प्रकाशन
फुकटकथा संग्रहदिलिपराज प्रकाशन
बेंडबाजाकथा संग्रहकॉंटिनेन्टल प्रकाशन
भुताचा जन्मविनोदी कथा संग्रहकॉंटिनेन्टल प्रकाशन
भोकरवाडीच्या गोष्टीकथा संग्रह१९८३
भोकरवाडीतील रसवंतीगृहकथा संग्रहमेहता प्रकाशन१९५७
माकडमेवालेख संग्रहसुपर्ण प्रकाशन
माझ्या बापाची पेंडविनोदी कथा संग्रहमौज प्रकाशन
मिरासदारीकथासंग्रहकॉंटिनेन्टल प्रकाशन१९६६
मी लाडाची मैना तुमचीवगनाट्यसुपर्ण प्रकाशन१९७०
विरंगुळा१९६१
सरमिसळललित लेखसंग्रह]कॉंटिनेन्टल प्रकाशन१९८१
सुट्टी आणि इतर पाच एकांकिकाएकांकिका संग्रहकॉंटिनेन्टल प्रकाशन१९६८
स्पर्श१९६२
हसणावळकथा संग्रहसुपर्ण प्रकाशन१९७५
हुबेहूबविनोदी कथा संग्रहकॉंटिनेन्टल प्रकाशन१९६०

गौरव

  • अध्यक्ष, मराठी साहित्य संमेलन, परळी-वैजनाथ, १९९८
  • पुणे महानगरपालिकेचा महर्षी वाल्मीकी पुरस्कार (२०१३)
  • महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचा विंदा जीवनगौरव पुरस्कार (२७-२-२०१५)
  • एक डाव भुताचा आणि ठकास महाठक ह्या दोन चित्रपटांच्या संवादलेखनाबद्दल पारितोषिके.
  • प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृ्ती पुरस्कार (२०१४)
  • पुलोत्सवातील कार्यक्रमात पु.ल.जीवनगौरव सन्मान (१०-११-२०१६)


निधन

वृद्धापकाळाने मिरसदारांचे पुणे येथील त्यांच्या राहत्या घरी वयाच्या ९५व्या वर्षी निधन झाले.[१]

बाह्य दुवे

🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन