शारदीय नवरात्र

नऊ दिवस केली जाणारी देवीची पूजा
(नवरात्री या पानावरून पुनर्निर्देशित)

शारदीय नवरात्र [a] हा देवी दुर्गा मातेच्या सन्मानार्थ साजरा केला जाणारा एक वार्षिक हिंदू सण आहे. नवरात्र म्हणजे नऊ रात्रींचा समूह असा शब्दशः अर्थ होत असून हा सण नऊ रात्री (आणि दहा दिवस) साजरा होतो; प्रथम चैत्र महिन्यात (ग्रेगोरियन कॅलेंडरच्या मार्च/एप्रिलमध्ये) आणि पुन्हा शारदा महिन्यात साजरा होतो. नवरात्र ही वेगवेगळ्या कारणांसाठी आणि विविध हिंदू सांस्कृतिक क्षेत्रांच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. [१] [२]

शारदीय नवरात्री, पुणे (२०२०)
घटस्थापना

सैद्धांतिकदृष्ट्या, चार हंगामी नवरात्री आहेत. तथापि, व्यवहारात, पावसाळ्यानंतर शरद ऋतूतील शारदीय नवरात्री नावाचा हा सण प्रमुख आहे. हा सण हिंदू दिनदर्शिकेच्या आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षात साजरा केला जातो, जो विशेषतः सप्टेंबर आणि ऑक्टोबर या ग्रेगोरियन महिन्यांमध्ये येतो. [१] [३]

शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक उत्सव तसेच देवीशी संबंधित व्रत आहे.[४] वासंतिक नवरात्रात चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमीपर्यंत व शारदीय नवरात्रात आश्विन शुद्ध प्रतिपदा ते आश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते.[५] शारदीय नवरात्र हे शाक्तपंथीय मानले जाते. शारदीय म्हणण्याचे कारण इतकेच की हे शरद ऋतूच्या प्रारंभी येते. भारतामध्ये सर्वत्र ह्या नवरात्रामध्ये प्रत्येकाच्या कुलाचाराप्रमाणे कमी-अधिक स्वरूपात पूजा-कृत्य घडते.[६] दुर्गोत्सव हा वर्षातून शरद ऋतूवसंत ऋतूतही साजरा करण्याची प्रथा असल्याचे काही ग्रंथांतून दिसून येते. दुर्गा देवतेचे माहात्म्य भविष्य पुराणात कथन केलेले आढळते.[७]

आश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून, नंदादीप प्रज्वलित करून आदिमायेची नऊ दिवस मनोभावे पूजा करणे, म्हणजेच घटस्थापना किंवा नवरात्रोत्सव.[४][८]

घटस्थापना

नवरात्रोत्सव आणि व्रत

नवरात्री पूजा साहित्य

हा सण नऊ दिवस आदिशक्तीची आराधना करण्याचा आहे.[९]पावसाळा बहुतेक संपलेला असतो, शेतांतील पिके तयार होत आलेली असतात, काही तयार झालेली असतात. अशा नैसर्गिक वातावरणात नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होते. देव्हाऱ्यात अखंड नंदादीप, दररोज झेंडूच्या फुलांची माळ, देवीपुढे सप्तशतीचा पाठ अशा प्रकारे शारदीय नवरात्री व्रत केले जाते.[१०]

कोणतीही नवरात्र हे साधारणपणे नऊ दिवसांचे असते, पण तिथीचा क्षय झाल्याने ते आठ दिवसांचे, किंवा वृद्धी झाल्यास दहा दिवसांचे असू शकते. चंपाषष्ठीचे नवरात्र फक्त सहा दिवसांचे असते.[११]

प्रत्येक दिवसाचे महत्त्व

दुर्गा आणि राक्षस महिषासुर यांच्यात झालेल्या प्रमुख युद्धाशी संबंधित हा सण आहे. यावेळी वाईटावर चांगल्याचा विजय साजरा केला जातो. [१२] हे नऊ दिवस देवी दुर्गा आणि तिच्या नऊ अवतारांना - नवदुर्गाला समर्पित आहेत. [१३] प्रत्येक दिवस देवीच्या अवताराशी संबंधित आहे : [१२] [१४] [१५] [१६]

दिवस १ - शैलपुत्री

प्रतिपदा (पहिला दिवस) म्हणून ओळखला जाणारा हा दिवस शैलपुत्री या पार्वतीच्या अवताराशी संबंधित आहे. या रूपातच दुर्गा शिवाची पत्नी म्हणून पूजली जाते. ही देवी उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळ घेऊन बैल, नंदीवर स्वार होत असल्याचे चित्रित केले आहे. शैलपुत्री हा महाकालीचा प्रत्यक्ष अवतार मानला जातो. या दिवसाचा रंग पिवळा आहे, जो कृती आणि उत्साह दर्शवतो. [१७]

ही देवी सतीचा (शिवाची पहिली पत्नी, जी नंतर पार्वती म्हणून पुनर्जन्म घेते) पुनर्जन्म मानली जाते आणि तिला हेमावती म्हणून देखील ओळखले जाते. [१८]

दिवस २ - ब्रह्मचारिणी

द्वितीयेला (दुसऱ्या दिवशी), पार्वतीचा आणखी एक अवतार असलेल्या ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते. या रूपात पार्वती योगिनी बनली होती. हा तिचा अविवाहित अवतार आहे. ब्रह्मचारिणीची पूजा मुक्ती किंवा मोक्ष तसेच शांती आणि समृद्धीसाठी केली जाते. अनवाणी पायांनी चालणारी आणि हातात जपमाला आणि कमंडला धरणारी ही देवी आनंद आणि शांततेचे प्रतीक आहे. हिरवा हा या दिवसाचा रंग आहे. शांतता दर्शविणारा केशरी रंग कधी कधी वापरला जातो जेणेकरून सर्वत्र मजबूत ऊर्जा वाहते.

दिवस ३ - चंद्रघंटा

तृतीया (तिसरा दिवस) चंद्रघंटाच्या पूजेचे स्मरण करते. शिवाशी लग्न केल्यानंतर, पार्वतीने तिच्या कपाळाला अर्धचंद्राने (अर्धचंद्र) सजवले होते, म्हणून हे नाव आहे. ती सौंदर्याची मूर्ती आहे आणि शौर्याचे प्रतीक आहे. राखाडी हा तिसऱ्या दिवसाचा रंग आहे, जो एक चैतन्यशील रंग आहे.

दिवस ४ - कुष्मांडा

चतुर्थीला (चौथ्या दिवशी) कुष्मांडा देवीची पूजा केली जाते. विश्वाची सर्जनशील शक्ती मानली जाणारी, कुष्मांडा पृथ्वीवरील वनस्पतींच्या संपत्तीशी संबंधित आहे आणि म्हणूनच, दिवसाचा रंग केशरी आहे. तिला आठ हात असून वाघावर बसलेले दाखवले आहे.

दिवस ५ - स्कंदमाता

स्कंदमाता ही पंचमी (पाचव्या दिवशी) पूजली जाणारी देवी, स्कंद (किंवा कार्तिकेय)ची आई आहे. पांढरा रंग आईच्या बदलत्या शक्तीचे प्रतीक आहे जेव्हा तिचे मूल धोक्याचा सामना करते. ती एका भयंकर सिंहावर स्वार होत, चार हात असलेली आणि तिच्या बाळाला धरून दाखवली आहे.

दिवस ६ - कात्यायनी

कात्यायन ऋषींच्या पोटी जन्मलेली, ती दुर्गेचा अवतार आहे आणि ती लाल रंगाने दर्शविलेले धैर्य दाखवते. योद्धा देवी म्हणून ओळखली जाणारी कात्यायनी ही देवीच्या सर्वात हिंसक रूपांपैकी एक मानली जाते. या अवतारात कात्यायनी सिंहावर स्वार होते आणि तिला चार हात आहेत. ती पार्वती, महालक्ष्मी, महासरस्वती यांचे रूप आहे. ती षष्ठमीला (सहाव्या दिवशी) पूजली जाते. पूर्व भारतात या दिवशी महाषष्ठी साजरी केली जाते आणि शारदीय दुर्गा पूजा सुरू होते.

दिवस ७ - कालरात्री

देवी दुर्गेचे सर्वात उग्र रूप मानले जाणारी कालरात्री सप्तमीला पूजनीय आहे. असे मानले जाते की पार्वतीने सुंभ आणि निसुंभ या राक्षसांना मारण्यासाठी तिची फिकट त्वचा काढली होती. दिवसाचा रंग शाही निळा आहे. देवी लाल रंगाच्या पोशाखात किंवा वाघाच्या कातडीत दिसते आणि तिच्या अग्निमय डोळ्यांमध्ये खूप क्रोध आहे आणि तिची त्वचा काळी पडते. लाल रंग प्रार्थनेचे चित्रण करतो आणि भक्तांना आश्वासन देतो की देवी त्यांना हानीपासून वाचवेल. ती सप्तमीला (सातव्या दिवशी) पूजली जाते. पूर्व भारतात या दिवशी महासप्तमी साजरी केली जाते आणि शारदीय दुर्गा पूजेचे बोधोन देखील सुरू होते.

दिवस ८ - महागौरी

महागौरी हे बुद्धिमत्ता आणि शांतीचे प्रतीक आहे. असे मानले जाते, की जेव्हा कालरात्रीने गंगा नदीत स्नान केले तेव्हा तिचा रंग अधिक उबदार झाला. या दिवसाशी संबंधित रंग गुलाबी आहे जो आशावाद दर्शवतो. ती अष्टमीला (आठव्या दिवशी) पूजली जाते. पूर्व भारतात या दिवशी महाअष्टमी साजरी केली जाते आणि त्याची सुरुवात पुष्पांजली, कुमारी पूजा इत्यादी कार्यक्रमांनी होते. ही एक अतिशय महत्वाची तिथी आहे. हा दिवस चंडीच्या महिषासुर मर्दिनी रूपाचा जन्म दिवस मानला जातो.

दिवस ९ - सिद्धिदात्री

नवमी (नववा दिवस) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्सवाच्या शेवटच्या दिवशी लोक सिद्धिधात्रीची प्रार्थना करतात. कमळावर बसलेल्या या देवीकडे सर्व प्रकारच्या सिद्धी आहेत असे मानले जाते. देवीला चार हात आहेत आणि तिला महालक्ष्मी म्हणूनही ओळखले जाते. या दिवसाचा जांभळा रंग निसर्गाच्या सौंदर्याची प्रशंसा करतो. सिद्धिदात्री ही भगवान शिवाची पत्नी पार्वती आहे. सिद्धिधात्रीला शिव आणि शक्तीचे अर्धनारीश्वर रूप म्हणूनही पाहिले जाते. असे मानले जाते की भगवान शिवाच्या शरीराची एक बाजू देवी सिद्धिदात्री आहे. त्यामुळे त्याला अर्धनारीश्वर या नावानेही ओळखले जाते. वैदिक शास्त्रानुसार या देवीची उपासना करून भगवान शिवाने सर्व सिद्धी प्राप्त केल्या.

भारताच्या बहुतेक भागांमध्ये आयुध पूजा नावाच्या विधीमध्ये साधने आणि शस्त्रे यांची पूजा केली जाते. अनेक व्यवसाय या दिवशी त्यांच्या कर्मचाऱ्यांना सुट्टी देखील देतात.[१९][२०]

८/१० दिवसांची नवरात्रे

शारदीय नवरात्र १९६७, २०११, २०१२, या साली ८ दिवसांचे होते, २०३८ सालीही ते आठच दिवसांचे असेल; २००० व २०१६ साली ते दहा दिवसांचे होते.वासंतिक नवरात्र सन २००० (अष्टमी क्षय), २०१५ (तृतीया क्षय), २०१६ (तृतीया क्षय), २०१७ (प्रतिपदा क्षय) या वर्षी आठ दिवसांचे होते आणि २०१८ (नवमी क्षय), २०२५ (तृतीया क्षय), २०२६ (प्रतिपदा क्षय) या सालीही ते ८ दिवसांचे असेल. २०२९ (द्वितीया वृद्धी) या साली ते १० दिवसांचे असेल.

  • व्रत- नवरात्र हे एक काम्य व्रत आहे.पुष्कळ घराण्यांत या व्रताला कुलाचाराचे स्वरूप असते.[२१] आश्विन शुद्ध प्रतिपदेस या व्रताचा प्रारंभ होतो.त्यासाठी घरात पवित्र जागी सोळा हातांचा मंडप उभारतात. तिथे एक वेदी तयार करतात. नंतर स्वस्तिवाचनपूर्वक त्या वेदीवर सिंहारूढ अष्टभुजा देवीची स्थापना करतात. मूर्ती नसल्यास नवार्ण यंत्राची स्थापना करतात. यंत्राशेजारी एक घट स्थापून त्याची व देवीची यथाविधी पूजा करतात. व्रतधारी व्यक्तीने नऊ दिवस उपवास किंवा नक्त भोजन करून व्रतस्थ रहायचे असते. आश्विन शुद्ध नवमीपर्यंत हे व्रत चालते. या व्रतात नऊ दिवस सप्तशतीचा पाठ करतात, अखंड दीप लावतात.[२२] घटावर रोज एक किंवा चढत्या क्रमाने माळा बांधतात. क्वचित होमहवन व बलिदानही करतात.[२३] नऊ दिवस रोज कुमारीची पूजा करून तिला भोजन घालतात. शेवटी स्थापित घट व देवी यांचे उत्थापन करतात.[२४] काही कुटुंबात देवीला कडाकण्या बांधण्याची पद्धतही प्रचलित आहे.

देवीची नऊ रूपे

सर्व देवांच्या ठिकाणी असलेल्या शक्तींचे दैवतीकरण होऊन त्या शक्तिरूप मूर्तीला देवी असे नाव मिळाले आणि शाक्त संप्रदायी लोकांनी तिला सर्वश्रेष्ठ देवता, आदिमाया,किंवा जगदंबा म्हणून गौरविले. देवीची उग्र व सौम्य अशी दोन रूपे पहायला मिळतात. उमा, गौरी, पार्वती, जगदंबा , भवानी ही देवीच्या सौम्य रूपांची नावे असून दुर्गा, काली, चंडी, भैरवी, चामुंडा ही देवीची उग्र रूपे आहेत.[२४]

प्रथमं शैलपुत्रीति, द्वितीयं ब्रह्मचारिणी ।
तृतीयं चन्द्रघण्टेति, कूष्मांडीति चतुर्थकम् ।।

पंचमं स्कंदमातेति षष्ठं कात्यायनीतिच ।
सप्तमं कालरात्रिश्च महागौरीतिचाष्टमम् ।।

नवमं सिद्धिदां प्रोक्ता नवदुर्गाः प्रकीर्तिताः ।
उक्तान्येतानि नामानि, ब्रह्मणैव महात्मना ।।

१. शैलपुत्री, २. ब्रह्मचारिणी ३. चन्द्रघंटा ४. कूष्मांडी (किंवा कुष्मांडी) ५. स्कंदमाता ६. कात्यायनी ७. कालरात्री ८. महागौरी ९. सिद्धिदात्री

अशी ही देवीची नऊ रूपे आहेत.[२५]

मार्कंडेय पुराणातील देवी माहात्म्यात सांगितले आहे- "शरद ऋतूतील वार्षिक महापूजेत देवीमाहात्म्य भक्तिपूर्वक ऐकल्यास सर्व बंधनांपासून व्यक्ती मुक्त होते आणि धनधान्याने परिपूर्ण होते. (८९.११.१२)"

नवरात्र हा ऋतू परिवर्तनाचा काल असतो. यामुळे आपल्या नवीन शक्ती, नवा उत्साह, उमेद निर्माण होत असते. बृहत संहितेनुसार सूर्य तसेच इतर ग्रहांमध्ये होणाऱ्या परिवर्तनाचा प्रभाव मनुष्याच्या आरोग्यावर आणि व्यवहारांवर होत असतो. सृष्टीतील परिवर्तन हा शक्तीचाच खेळ आहे.ब्रह्मचर्य, संयम, उपासना, यज्ञ केल्याने शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते. स्मरणशक्ती चांगली होऊन बौद्धिक विकास होतो. म्हणून नवरात्र हा शारीरिक व आत्मिक शुद्धतेचा काळ आहे असे मानले जाते.[२६]

जोगवा

जोगवा मागणारी महिला

जोगवा मागणे हा एक प्रकारचा देवीची उपासना करण्याचा प्रकार आहे.[२७] देवीचा कुलधर्म म्हणूनही जोगवा मागितला जातो. मंगळवारी, शुक्रवारी, पौर्णिमेला किंवा नवरात्रात जोगवा मागितला जातो.[२८] परडीमध्ये देवी ठेवून किमान पाच घरी जाऊन मूठभर तांदूळ किंवा पीठ मागणे याला जोगवा मागणे असे म्हणतात. हे उपासक गळ्यात कवड्यांची माळ घालतात. अहंकाराचे विसर्जन करावे असा यामागचा हेतू असावा असे वाटते. एकनाथ महाराजांनी या जोगव्यावर एक भारूड रचले आहे. ते असे-
अनादी निर्गुण प्रगटली भवानी ।
मोह महिषासुर मर्दना लागुनी ॥
त्रिविध तापांची कराया झाडणी ।
भक्तांलागुनी पावसी निर्वाणी ॥
आईचा जोगवा जोगवा मागेन ।
द्वैत सारुनी माळ मी घालीन ॥
हाती बोधाचा झेंडा घेईन ।
भेदरहित वारिसी जाईन ॥
नवविधा भक्तीच्या करीन नवरात्रा ।
करूनी पीटी मागेन ज्ञानपुत्रा ॥
या भारुडात जोगवा मागण्याच्या विधीचे स्वरूप आणि तो मागण्यामागचे हेतू अप्रत्यक्षपणे व्यक्त झाले आहेत.[२९]

नवरात्रीतल्या पाचव्या दिवसाला ललिता पंचमी (महालय), आठव्या दिवसाला महाअष्टमी (दुर्गाष्टमी), आणि नवव्या दिवसाला महानवमी म्हणतात.[३०]

देवीचा गोंधळ

शारदीय नवरात्र काळात नऊ दिवस देवीचा गोंधळ घालण्याची पद्धती विविध समाज जगतात प्रचलित आहे.[३१] देवीचे उपासक ज्यांना गोंधळी असे म्हटले जाते ते गोंधळी संबळ या वाड्याच्या साथीने देवीची स्तुती असणारी कवने देवीसमोर सादर करतात. या क्लाप्रकाराला गोंधळ घालणे असे म्हटले जाते. भगवान परशुराम यांनी बेटासुर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि त्याचे शीर धडापासून वेगळे केले. त्याच्या शिराच्या तंतूंना ओवून त्यापासून एक वाद्य तयार केले आणि आपली माता रेणुका हिच्यासमोर हे वाद्य वाजवून त्यांनी आपल्या आईला वंदन केले. त्यावेळेपासून गोंधळ परंपरा सुरू झाली असे मानले जाते.[३२]

ललिता पंचमी

आश्विन शुद्ध पंचमीच्या दिवशी हे व्रत करतात.[३३] हे काम्य व्रत असून स्त्री पुरुषांना हे करता येते. ललिता देवी ही या व्रताची देवता आहे. या व्रतात एखाद्या करंडकाचे झाकण देवीचे प्रतीक म्हणून पूजेला घेतात.

दुर्गानवमी:- आश्विन शुद्ध नवमीसच हे नाव आहे. शक्ती व संपत्ती यांच्या प्राप्तीसाठी हे व्रत करतात. सकाळी आघाड्याच्या काडीने दंतधावन करतात. केळीचे खांब व पुष्पमाला यांनी देवीसाठी मखर तयार करतात. या पूजा विधानात पुष्पांजली अर्पण झाल्यावर गंधाक्षतायुक्त व साग्र अशा ४८ दुर्वा ललितेला वाहतात. नैवेद्यासाठी लाडू, घारगे, वडे वगैरे पदार्थ करतात. पूजेच्या अंती घारग्यांचे वायन देतात. रात्रौ जागरण व कथाश्रवण करतात. दुसऱ्या दिवशी देवीचे विसर्जन करतात.[३४]

महाअष्टमी

महालक्ष्मीव्रत हे एक काम्य व्रत आश्विन शुद्ध अष्टमीला करतात. व्रतकर्त्याने चंदनाने लक्ष्मीची प्रतिमा काढावी. तिच्या शेजारी सोळा दोरे एकत्र केलेला आणि सोळा गाठी मारलेला दोरक ठेवावा. मग महालक्ष्मीची षोडषोपचारे पूजा करावी. देवीला सोळा प्रकारच्या पत्री व फुले वहावीत. सोळा घारग्यांचा नैवेद्य दाखवावा. पिठाचे सोळा दिवे करून आरती करावी. मग दोरकाची पूजा करून तो डाव्या मनगटात बांधावा. मग सोळा दुर्वा आणि सोळा अक्षता हातात घेऊन महालक्ष्मीची कथा ऐकावी, अशी या व्रतातली पूजा आहे.[३५]

  • तांदुळाच्या पिठाचा मुखवटा :- दुपारचे हे पूजाविधान झाल्यावर त्याच दिवशी प्रदोषकाली महालक्ष्मीची दुसरी पूजा करतात. नवरात्रीतील अष्टमीला तांदुळाच्या पिठाचा मुखवटा असलेली देवीची उभी मूर्ती करून तिचे पूजन करतात. त्यासाठी तांदुळाच्या पिठाची उकड करून तिचा महालक्ष्मीचा मुखवटा करतात.[३६]तो काजल कुंकवाने रेखाटतात.हे काम कडक सोवळ्याने चालते.मग तो मुखवटा सुशोभित मंडपीखाली एका भांड्याच्या उतरंडीवर घट्ट बसवतात . चित्पावन कुटुंबातील नववधू विवाहानंतर पाच वर्षे अष्टमीला खडे व दोराकाची पूजा करतात व संध्याकाळी या देवीपुढे ते अर्पण करून ओटी भरतात अशी प्रथा प्रचलित असल्याचे अनुभवास येते.उतरंडीवर भरजरी लुगडे नेसवतात.मग कापडाच्या पिशव्यांचे मुद्दाम तयार केलेलं हात देवीला जोडतात.मंगलागौरीप्रमाणेच या पूजेसाठीही अनेक वसोळ्या बोलावतात.त्या सर्व मिळून देवीची पूजा करतात.आरती झाल्यावर रात्री घागरी फुंकणे हा विशेष कार्यक्रम असतो.[३७]
  • घागरी फुंकणे :-नवरात्रीतील अष्टमीला देवीसमोर घागरी फुंकतात. घागर उदाच्या धूपाने भरून घेतात आणि ती घागर पाच वेळा फुंकतात. यामुळे श्वसन मार्ग शुद्ध होतो असे मानले जाते. कोकणस्थ ब्राह्मण समाजातील महिलांमध्ये घागर फुंकणे या प्रकाराला विशेष महत्त्व आहे.
महालक्ष्मी अष्टमी पूजन (नवरात्र)

महानवमी

एक तिथीव्रत. आश्विन शुद्ध नवमीला दुर्गानवमी किंवा महानवमी म्हणतात. दुर्गा ही या व्रताची देवता आहे. प्रत्येक मासात भिन्न उपचारांनी देवीची पूजा करणे व उद्यापनाचे वेळी कुमारिकांना भोजन घालणे ही या व्रताचा विधी आहे.[३७]

विजयादशमी

आश्विन शुद्ध दशमीला विजयादशमी असे म्हणतात. चामुंडा देवीने महिषासुराशी युद्ध करून दसऱ्याच्या दिवशी त्याचा वध केला अशी कथा आहे[३८].दसऱ्याला पौराणिक व ऐतिहासिक महत्त्वही आहे.[३९] म्हणून त्याला नवरात्राच्या समाप्तीचा दिवस असेही म्हणतात. साडेतीन मुहूर्तातील तो एक मुहूर्त समजला जातो.[४०] या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजिता पूजा व शस्त्रपूजा ही चार कृत्ये करावयाची असतात. दसरा हा सण विजयाचे प्रतीक म्हणून त्याला विजयादशमी असेही म्हणतात. रामाने नऊ दिवस उपवास करून शक्तीची म्हणजे देवीची उपासना केली आणि त्या देवीच्या उपासनेने शक्ती निर्माण झाली म्हणून रामाने रावणाचा वध केला. रामाला विजय मिळाला म्हणून या सणाला विजयादशमी असे म्हणतात. या दिवशी भारतात ठिकठिकाणी रावण प्रतिमेचे दहन करण्याची प्रथा आहे.[४१]१८ व्या शतकात दसरा हा सण पेशव्यांच्या आणि त्यांच्या सरदारांच्या कुटुंबात मोठ्या थाटाने साजरा केला जाई. दसरा सण साजरा झाल्यावर मराठे सरदार महाराष्ट्राबाहेरील प्रदेशात लष्करी मोहिमा काढण्याची तयारी करीत असत.[४२]

नवरात्रातील नऊ माळा

नवरात्रीतल्या नऊ दिवसांपैकी प्रत्येक दिवशी देवीला वेगवेगळ्या फुलांच्या माळा घालायची प्रथा काही समाजगटांत आहे.[४३]

पहिली माळ

शेवंती आणि सोनचाफ्यासारख्या पिवळ्या फुलांची माळ

दुसरी माळ

अनंत, मोगरा, चमेली, किंवा तगर यांसारख्या पांढऱ्या फुलांची माळ.

तिसरी माळ

निळी फुले. गोकर्णीच्या किंवा कृष्णकमळ|कृष्णकमळाच्या. फुलांच्या माळा.

चौथी माळ

केशरी अथवा भगवी फुले. अबोली, तेरडा, अशोक किंवा तिळाची फुले.

पाचवी माळ

बेल किंवा कुंकवाची वाहतात..

सहावी माळ

कर्दळीच्या फुलांची माळ.

सातवी माळ

झेंडू किंवा नारिंगीची फुले.

आठवी माळ

तांबडी फुले. कमळ, जास्वंद, कण्हेर किंवा गुलाबाच्या फुलांची माळ.

नववी माळ

कुंकुमार्चन करतात.[४४]

नवरात्रातील नऊ रंग

नवरात्र उत्सवातील साड्यांचे रंग ही एक नवी सामाजिक संकल्पना नवरात्र उत्सवाशी अलीकडील काही वर्षात जोडली गेल्याचे दिसून येते. नवरात्रातील प्रत्येक दिवशी येणाऱ्या वारानुसार भारतीय ज्योतिष्यांनी प्रत्येक दिवसाचा रंग ठरवलेला आहे देवीला त्या त्या दिवशी त्या विशिष्ट रंगाची साडी नेसवली जाते. महाराष्ट्रातील अनेक शहरांतील स्त्रियाही अशाच प्रकारे नवरात्रातल्या दिवसांत त्या ठरावीक रंगाच्या साड्या नेसतात. या संकल्पनेची सुरुवात २००४ सालापासून झाली.[४५]

नवरात्रातील प्रत्येक दिवशी येणाऱ्या वारानुसार भारतीय महिला साडी परिधान करतात व देवीला त्या त्या दिवशी त्या विशिष्ट रंगाची साडी नेसवली जाते.[४६]२००४ साली मुंबईच्या महालक्ष्मी मंदिरात देवीला नऊ दिवस नेसवल्या जाणाऱ्या साड्यांचे रंग 'महाराष्ट्र टाइम्स' या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झाले. मुंबईतील महिलांनी नऊ दिवस त्या त्या रंगांच्या साड्या नेसून त्याला प्रतिसाद दिला आणि त्यानंतर हे दरवर्षी घडत गेले. महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील प्रांतांतही ही संकल्पना महिलांनी स्वीकारलेली दिसते. उत्सव आणि सणाचे बदलते सामाजिक आयाम या संकल्पनेतून दिसून येतात.

ही नवरात्रीच्या दिवसांच्या नऊ रंगांची कल्पना महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्राने बहुसंख्य सामान्य आणि नोकरदार स्त्रीवर्गात जरी लोकप्रिय केली असली, तरी रंगांची कल्पना एकोणिसाव्या शतकात, अगदी पेशवाईच्या काळातही अस्तित्वात होती. (१८१८ सालचे पंचांग पहावे). उगवत्या सूर्याचा रंग केशरी म्हणून रविवारचा रंग केशरी, चंद्र पांढरा म्हणून सोमवारचा रंग पांढरा, मंगळ लाल म्हणून मंगळवारचा रंग लाल या रीतीने नवरात्रीच्या पहिल्या आठवड्यातल्या दिवसाचे रंग ठरवले आहेत. बुधवारचा निळा, गुरुवारचा पिवळा, शुक्रवारचा हिरवा आणि शनिवारचा रंग करडा असतो. आठवडा संपल्यानंतर नवरात्रातले शेवटचे दोन दिवस उरतात. त्यांच्यासाठी मोरपिशी, हिरवा, जांभळा, आकाशी आणि गुलाबी हे रंग राखून ठेवले आहेत.[४७]

महाराष्ट्रातील उत्सव

पेशव्यांचा नवरात्रोत्सव

मराठा राजवटीत दसरा सण साजरा करण्यापूर्वीच्या शेवटच्या नऊ दिवसात दुर्गा देवतेच्या पूजेचा व मानसन्मानाचा उत्सव म्हणून नवरात्रोत्सव साजरा होत असे. महाराष्ट्रातील भोसले घराण्याचे आद्य दैवत दुर्गा भवानी होते, त्यामुळे शाहू महाराजांच्या मृत्यूनंतरही सातारा येथील दरबारात दसरा सणापूर्वी दुर्गोत्सव आनंदाने साजरा होई. पेशव्यांनीही पुणे येथील पेशवे दरबारात दसरा सणापूर्वी हा वार्षिक दुर्गोत्सव मोठ्या थाटामाटात व भव्यपणे साजरा करण्याची प्रथा चालू ठेवली होती. या उत्सवासाठी लागणाऱ्या खर्चाची तरतूद पेशव्यांनी केली होती, हे तत्कालीन कागदपत्रांच्या नोंदीवरून स्पष्ट होते. या नऊही दिवसांत भवानी देवतेची आराधना करून तिच्यासमोर नंदादीप प्रज्वलित करून तिला नैवेद्य दाखवून पूजा केली जाई. देवीचे भक्त म्हणून ओळखले जाणारे भुते आणि गोंधळी हे गोंधळ घालून जागर करीत.[४८]

प्रतिपदा

या दिवशी खुद्द पेशव्यांच्या हस्ते अंबेची घटस्थापना होत असे. उपस्थित जनसमुदाय ’देवीचा उदो’ अशा घोषणांनी आसमंत दुमदुमून टाके.

द्वितीया

रेणुकादी चौसष्ट योगिनींची पूजा करून कस्तुरी मळवट भरून उदो करीत.

तृतीया

अंबा अष्टभुजा शिणगार करून विराजमान होत असे.

चतुर्थी

सरकारवाड्यातील व बाहेरील नागरिक निराहार उपवास करून विश्वव्यापक भवानीची सामुदायिक प्रार्थना करीत.

पंचमी

श्रद्धेने देवीची पूजा करून लोक रात्रीचे जागरण करीत.

षष्ठी

दिवट्यांचा गोंधळ घातला जाई. काही वेळा पेशवे स्वतः कवड्यांची माळ गळ्यात घालून जोगवा मागीत असत.

सप्‍तमी

सप्‍तशृंग गडावर पेशवे जातीने आदिमायेची पूजा बांधत असत.

अष्टमी

देवीपूजनाचे वेळी ’अष्टभुजा नारायणी देवी शेषाद्री पर्वतावर उभी देखिली’ असा देखावा डोळ्यासमोर उभा आहे अशी उपस्थित लोक कल्पना करीत.

नवमी

होमहवन, जपजाप्य, षोडश पक्वान्‍नांचा देवीला नैवेद्य, ब्राह्मण-सुवासिनी भोजन आणि विडा दक्षिणा देऊन त्यांची बोळवण.

दशमी

अंबा मिरवणुकीने शिलंगणास जाई. गावाबाहेर शमीपूजन होऊन नंतर सोने लुटण्याचा कार्यक्रम होऊन अंबा मिरवणुकीने परत येई.

पुण्यातील नवरात्र (२०२१ साल)

फार पूर्वीपासून, पुणे शहरात असलेल्या तांबडी जोगेश्वरी, पिवळी जोगेश्वरी आणि चतुःशृंगी या तीनच देवींच्या देवळात नवरात्राची खास पूजा होत आली आहे. या देवींना नवरात्राच्या प्रत्येक दिवशी वेगळ्या रंगाची साडी नेसून वेगळ्या वाहनावर बसविले जाते. देवीची सजावट पाहण्यासाठी पुणेकर या देवळांना भेट देत आले आहेत. या नऊ दिवसांत चतुःशृंगीची यात्राही असते. दसऱ्याच्या दिवशी त्या यात्रेची समाप्ती होते.

पुण्यातल्या आणखीही काही देवळांमध्ये अशाच प्रकारे नऊ दिवस वेगवेगळी आरास करून देवीला नटवण्याची प्रथा काही वर्षांपासून सुरू आहे. कसबा पेठेतील त्वष्टा कासार समाजाची कासारदेवी त्यांपैकी एक आहे. नवरात्र जिथे साजरा होतो अशी आणखी काही देवळे :-सप्तशृंगी महालक्ष्मी मंदिर, शिवदर्शन-सहकारनगरमधील महालक्ष्मी मंदिर, भवानी पेठेतील भवानी माता मंदिर, मुक्तांगण शाळेजवळील लक्ष्मीमाता मंदिर, वगैरे.

एके काळी पुण्यातील काही विशिष्ट देवळांमध्येच साजरे होणारे नवरात्र आता (२०१३ साली) २६८ देवळांत होऊ लागले आहे. असा नवरात्राचा उत्सव साजरा करणारी एकूण १२९२ मंडळे पुण्यात आहेत. त्यांपैकी १०२४ ठिकाणी सार्वजनिक उत्सव होतो. ३३१ मंडळे दुर्गापूजेच्या दिवशी मिरवणूक काढतात, तर २७२ मंडळे दसऱ्याच्या दिवशी आणि ३६४ मंडळे कोजागिरी पौर्णिमेला मिरवणूक काढतात.

भोंडला/हादगा

मुख्य पान: भोंडला
मुलींचा भोंडला

नवरात्रीच्या काळात महाराष्ट्रात मुली संध्याकाळी भोंडला खेळतात. गुजराथमध्ये या काळात रात्री गरबा खेळतात. भोंडला हा पश्चिम महाराष्ट्रातकोकणात प्रचलित असलेला स्त्रियांच्या सामुदायिक खेळाचा प्रकार आहे. नवरात्रीचे नऊ दिवस आणि दसऱ्याच्या दिवशी भोंडला खेळतात. नवरात्रीच्या नऊ दिवसात हस्त नक्षत्राचे प्रतीक असलेल्या हत्तीची प्रतिमा काढून मधोमध ठेवली जाते आणि तिच्याभोवती मुली फेर धरतात. पृथ्वीच्या सुफलीकरणाचा हा उत्सव मानला जातो म्हणून याचे महत्त्व विशेष आहे. भोंडला हा बहु उंडल याचा अपभ्रंश आहे असेही मानले जाते. हत्ती हा समृद्धीचे प्रतीक मानला जातो, तसेच वर्षन शक्तीचे प्रतीक म्हणूनही त्याकडे पाहिले जाते.[४९]

चित्रदालन

बाह्य दुवे

  • "नवरात्री संदर्भातील विशेष लेख". Archived from the original on 2015-02-02. 2018-09-24 रोजी पाहिले.

संदर्भ


चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता <ref>खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="lower-alpha"/> खूण मिळाली नाही.