नाट्यसंकेत

माणसांच्या जीवनव्यवहारांच्या बाबतीत संकेत म्हणजे स्थापित रीत. संगीत, चित्रकला,शिल्पकला, नृत्यकला यांत जसे स्वतंत्र संकेत असतात, तसे साहित्यात आणि नाटकांतही असतात. भरताच्या नाट्यशास्त्रात, नाटकांमध्ये पाळायच्या संकेतांची एक भलीमोठी यादी दिलेली आहे. रंगमंचावर निद्रा, दात कोरणे, नखे कुरतडणे, चुंबन-आलिंगन-मैथुनक्रिया आदी गोष्टी दाखवणे त्याज्य मानल्या गेल्या होत्या. याचे भरताने दिलेले कारण असे की, नाटक हे पिता, पुत्र-पुत्री, सुना आणि सासूसासऱ्यांसह बघायची वस्तू आहे.(पितापुत्रस्नुषाश्वश्रूदृश्यम्‌ --भरताचे नाट्यशास्त्र अध्याय २२वा). नाट्यसंकेतांच्या या सूचीत कुठल्या प्रकारच्या नाटकात किती अंक असावेत, नायक-नायिका कशा असाव्यात, कुठल्या पात्राने कोणती भाषा बोलावी, रंगमंचावर कोणी गावे, एका पात्राने दुसऱ्या पात्राला कसे संबोधावे, मंचाची विविध दालनांमध्ये कशी विभागणी करावी इत्यादी इत्यादी गोष्टी आहेत. या नाट्यसंकेतांमध्ये, स्वगत भाषण कसे करावे, जनान्तिक(म्हणजे शेजारच्या पात्राशी बोलताना ते तिसऱ्याला ऐकू येत नाही आहे हे) कसे दाखवावे वगैरे गोष्टींचा समावेश आहे. नाटकाच्या सुरुवातीला नांदी आणि शेवटी भरतवाक्य असावे हाही भरताने घालून दिलेला एक संकेत आहे. आधुनिक नाटकांतही, प्रेक्षकांना शक्यतो पाठ दाखवू नये, नाट्यकार्याखेरीज इतर (थुंकणे, नाक शिंकरणे, खोकणे, तंबाखू चोळणे यांसारखे)लौकिक व्यवहार रंगमंचावर करू नयेत, एकाच वेळी एकाहून अधिक पात्रांनी बोलू नये वगैरे संकेत आवर्जून पाळले जातात.

नाट्यगृहाचा आकार कसा असावा, आसन व्यवस्था कशी असावी याचेही रूढ संकेत होते आणि आजही आहेत. वेशभूषा, रंगभूषा, केशरचना, नेपथ्य आदी गोष्टींचे संकेत ठरलेले आहेत. नाटक शक्यतो शोकपर्यवसावी नसावे असाही एक जुना संकेत होता. तमाशात पात्राने एक फेरी मारली की स्थळ बदलले असे समजले जाते. फिकट निळा प्रकाश म्हणजे स्वप्नातले दृश्य, लालप्रकाश म्हणजे क्रांती, भय किंवा अत्याचार, एकाच व्यक्तीवर टाकलेला प्रकाशाचा झोत म्हणजे स्वगत, सारंगीचे सूर म्हणजे शोक, बासरीचे सूर किंवा पक्ष्यांची किलबिल म्हणजे पहाट ह्या संकेतांचा अर्थ प्रेक्षकांना सहज समजतो.

पारंपरिक नाटकांत न आढळणारे अनेक नवेनवे संकेत, समांतर नाटकांमधून निर्माण होऊन रूढ होत चालले आहेत.

🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन