पंचहौद

पंचहौद हे पुण्यातील पहिले मराठी चर्च आहे. पवित्र नाम देवालय असे नामकरण असलेल्या या वास्तूची रचना ७ ऑगस्ट, इ.स. १८८५ रोजी झाली. तीस २०१० मध्ये १२५ वर्षे पूर्ण झाली. गुरुवार पेठेतील ही वास्तू पंचहौद मिशन या नावानेही ओळखली जाते.

पंचहौद चर्च, पुणे

रूपराम चौधरी यांनी कोंढव्याहून पुण्यात पाणी आणले होते. त्याचे पाच हौद तत्कालीन वेताळ पेठेत म्हणजे या परिसरात होते. त्यावरून यास "पंचहौद मिशन' असे नाव पडले. इ.स. १८७७ या वर्षी मुंबईच्या बिशप यांनी येथील एक बंगला विकत घेतला व आचार्य नेमून मिशनचे काम सुरू केले. कालांतराने जागा कमी पडू लागल्याने नवीन इमारत बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. चर्चच्या वास्तूची पायाभरणी १८८३ या वर्षी झाली. लाल विटांनी बांधण्यात आलेल्या वास्तूसाठी देश-विदेशातून मोठी देणगी जमली होती व हे काम १८८५ या वर्षी पूर्ण झाले. याचा आराखडा "बेल' नावाच्या आर्किटेक्‍टने केला होता; तर सार्वजनिक बांधकाम विभागाने याचे बांधकाम केले आहे. पूर्वापार चर्चची ओळख ठरलेला उंच मनोरा बांधण्यास मात्र १८९३ साली सुरुवात करण्यात आली व १८९८ या वर्षी हे काम पूर्ण झाले. मनोरा १३० फूट उंच असून, त्यावर एकूण आठ भव्य घंटा आहेत. सात सुरांच्या सात व आठवी खालच्या "सा'ची अशा त्या सुरेल घंटा इंग्लंडमधून आणून येथे बसविण्यात आल्या. त्या आजही उत्तम स्थितीत आहेत. पंचधातूंच्या या घंटा मुंबईहून पुण्यात पोहोचण्यास २८ दिवस लागले होते. या घंटांची उंची अडीच फूट ते पाच फुटांपर्यंतअसून, खाली तोंडाशी व्यास सुमारे ६ फूट आहे. या घंटांवर ""होली नेम ऑफ जीझस असे कोरलेले आहे. १५ ऑगस्ट व २६ जानेवारीला या घंटांद्वारे आजही "राष्ट्रगीत' वाजवले जाते. १९०५ या वर्षी जागा कमी पडू लागल्याने इमारतीचा पुढील भाग वाढविण्यात आला. १८९१ या वर्षी येथे लोकमान्य टिळक, न्या. रानडे व पुण्यातील इतर मान्यवर आले होते. येथे रोज सकाळी प्रार्थना व सहभागितेचा विधी असतो. त्यात मध्यस्थीची प्रार्थना असते. या प्रार्थनेत ""राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री व सर्व नोकरशहा यांना जनतेच्या भल्यासाठी काम करण्याची बुद्धी दे आपत्ती निवारण कर, अशी ईश्‍वराकडे विनंती करण्यात येते. चर्चची ही वास्तू वैशिष्ट्यपूर्ण व सुरेख असून, आवर्जून पाहावी अशी आहे. चर्चच्या आठ घंटा असलेला मनोरा आशिया खंडात अजून फक्त एकच ठिकाणी असल्याने पुण्याच्या वास्तुवैभवात या वास्तूचे मोठे महत्त्व आहे.

🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन