मिडवेची लढाई

मिडवेची लढाई
दुसरे महायुद्ध ह्या युद्धाचा भाग
जपानच्या क्रुझर मिकुमावर हल्ला चढविणारे अमेरिकेचे डग्लस एसबीडी-३ डॉन्टलेस विमान
जपानच्या क्रुझर मिकुमावर हल्ला चढविणारे अमेरिकेचे डग्लस एसबीडी-३ डॉन्टलेस विमान
दिनांकजून ४-७, इ.स. १९४२
स्थानमिडवे अटॉल
परिणतीअमेरिकेचा निर्णायक विजय
युद्धमान पक्ष
अमेरिकाजपान
सेनापती
चेस्टर निमित्झ, फ्रॅंक जे. फ्लेचर, रेमंड ए. स्प्रुआन्सइसोरोकु यामामोतो, नोबुताके कोंदो, चुइची नागुमो, तामोन यामागुची, यानागीमोतो रायुसाकु
सैन्यबळ
३ विमानवाहू नौका, २५ सहायक नौका, २३३ विमाने, १२७ भू-स्थित विमाने४ विमानवाहू नौका, १५ सहायक नौका, २ युद्धनौका, २४८ विमाने, १६ समुद्री विमाने. याशिवाय राखीव २ छोट्या विमानवाहू नौका, ५ युद्धनौका, ४१ सहायक नौका[१]
बळी आणि नुकसान
१ विमानवाहू नौका, १ विनाशिका, १५० विमाने, ३०७ सैनिक व खलाशी[२]चार विमानवाहू नौका, १ क्रुझर, २४८ विमाने, ३,०५७ सैनिक व खलाशी,[३][४]

मिडवेची लढाई (जपानी:ミッドウェー海戦) ही दुसऱ्या महायुद्धांतर्गत प्रशांत महासागराच्या रणांगणावरील सगळ्यात महत्त्वाची लढाई होती.[५][६][७] जून ४ ते जून ७ १९४२ दरम्यान लढल्या गेलेल्या या लढाईत अमेरिकेच्या आरमाराने जपानी आरमाराचा निर्णायक पराभव केला. मिडवे अटॉलवरील जपानी हल्ला परतवून लावताना अमेरिकेच्या आरमाराने जपानच्या समुद्री शक्तीवर प्राणांतिक घाव घातला. याला समुद्री युद्धांतील सगळ्यात धक्कादायक आणि निर्णायक हल्ला समजले जाते.[८][९]

ही लढाई कॉरल समुद्राच्या लढाईनंतर साधारणपणे एका महिन्यात झाली. या सुमारास अमेरिकन आरमाराने प्रशांत महासागरात आपली पकड बसविणे सुरू केलेले होते. यातून सुटका करण्यासाठी व अमेरिकेला पर्ल हार्बरवरील हल्ल्याप्रमाणे अचानक गाठून त्याचे बल कमी करण्यासाठी जपानने सर्वशक्तिसह अमेरिकेच्या मिडवे अटॉलवरील आरमारावर हल्ला करण्याचे ठरवले. हा हल्ला सफल झाल्यास जपानला प्रशांत महासागरातून हालचाली करण्यास मुक्तहस्त मिळाला असता आणि कदाचित अमेरिकेने प्रशांत महासागरातून हार मानून काढता पायही घेतला असता.[१०]

मिडवेला नांगरलेल्या अमेरिकेच्या विमानवाहू नौकांना बाहेर खेचून नेस्तनाबूद करण्याचा व एकदा या विमानांचा धोका नष्ट झाला की मिडवेवर चढाई करून तेथे तळ उभारून प्रशांत महासागरात आपले हातपाय पसरण्याचा जपानचा कावा होता. मिडवे नंतर सामोआफिजीवरील जपानी हल्ल्यांची तयारीही सुरू होती.[११] परंतु अमेरिकेला याचा आधीच सुगावा लागला व त्यांनी जपानी आरमारालाच आपल्या जाळ्यात खेचण्याचा बेत रचला.[१२] हल्ला झाल्यावर अमेरिकेचे प्रत्युत्तर काय असेल याचा जपानी सेनापतींनी बांधलेला अंदाजही चुकला.

या लढाईत अमेरिकेते एक विमानवाहू नौका व एक विनाशिका गमावली तर जपानी आरमाराच्या चार विमानवाहू नौका व एक जड क्रुझर नष्ट झाल्या. या लढाईमुळे तसेच सोलोमन द्वीपांतील लांबलेल्या लढाईमुळे जपानी जहाजबांधणीचा वेग व जपानी आरमाराचा जहाजे गमावण्याचा वेग यांत बरेच अंतर पडले व जपानी आरमार दुबळे होऊ लागले. दुसरीकडे अमेरिकेने आपल्या आरमाराचे बल वाढवण्यास सुरुवात केली व प्रशांत महासागरात वर्चस्व स्थापले.[१३]

संदर्भ आणि नोंदी