भीमबेटका

भारताच्या आदिम संस्कृतीचे अवशेष येथे बघावयास मिळतात.

भीमबेटका ही एक पुरातन जागा व जागतिक वारसा स्थान असून, हे ठिकाण भारताच्या मध्य प्रदेश राज्याच्या रायसेन जिल्ह्यात आहे भोपाळ पासून ४५ किमी अंतरावर आहे. भारताच्या आदिम संस्कृतीचे अवशेष येथे बघावयास मिळतात. भीमबेटकाचे नाव हे अतिबलवानभीम या महाभारतातील पात्राबरोबर जोडले जाते.[१] हे नाव भीमाची बैठक -भीमबैठक-भिमबेटका असे अपभ्रंश होऊन बनलेले असावे असे काही मानतात. मध्य प्रदेशामध्ये ह्या ठिकाणाला भीमबैठक याच नावाने ओळखतात.[१]सुमारे एक लाख वर्षांपूर्वीची मानवाच्या राहण्याची ही जागा असावी असे अनेकांचा तर्क आहे.[२][३] येथे मध्य अश्मयुगापासून ऐतिहासिक कालापर्यंतचे  पुरातत्वीय अवशेष आढळतात.  यातील सर्वात पुरातन चित्रे दहा हजार वर्षांपूर्वीची असून त्यांच्यात वेगवेगळे पशु आणि शिकार दर्शवली गेली आहे सगळ्यात अलीकडच्या अवशेषांत  ऐतिहासिक कालातील घोडदळाचे चित्र आहे.  या अवशेषांची साहजिकच  स्थानिक आदिवासी समाजाला माहिती होती. ह्या माहितीच्या आधारावर किंकेड नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याने 1888 साली शोध निबंध प्रकाशित करून हे बौद्धांचे स्थळ आहे असा उल्लेख केला होता. परंतु या अवशेषांचा व्यवस्थित अभ्यास करण्याचे श्रेय श्री वाकणकर या पुरातत्व तज्ञाला आहे.

भीमबेटका येथील खडकांवरील चित्रे

शोध

श्रीधर विष्णू वाकणकर ह्या मराठी पुरातत्त्वशास्त्रज्ञाने या गुहांचा शोध लावला. इ.स. १९५७ मध्ये वाकणकर आगगाडीने दिल्लीहून भोपाळला जात असताना त्यांना डोंगरात काही खोदलेले दिसले. स्थानिक प्रवाशांकडे चौकशी करता त्या गुहा आहेत आणि आत जनावरे असतात असे कळले. जवळच्याच स्थानकावर रेल्वेगाडीचा वेग कमी झाला असता वाकणकरांनी बाहेर उडी मारली आणि त्या गुहांच्या शोधार्थ ते निघाले. एकटेच काटयाकुटयांमधून वर डोंगरावर चालत गेल्यावर त्यांना या गुहांचा शोध लागला.

त्यानंतर ते सतत तिथे जात राहिले आणि त्यांनी या चित्रांचा सखोल अभ्यास केला. सोबत बटाटे घेऊन जायचे आणि तिथे वाळूत ते पुरायचे. दुपारी ते बटाटे उकडलेले असत, तेच जेवण म्हणून जेवायचे असे व्रतस्थ राहून त्यांनी गुहांचा अभ्यास केला. भीमबेटकामध्ये विविध प्राणी, पक्षी, झाडे, शिकारीची दृश्ये अशी आदिमानवाने त्याच्या आयुष्यात आलेल्या प्रसंगांची रंगीत चित्रे काढलेली दिसतात. कित्येक हजार वर्षांपूर्वी चितारलेली ही नैसर्गिक रंगातली चित्रे बघण्यासारखी आहेत. २००३ मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थानांमध्ये भीमबेटकाचा समावेश केला.

स्वरूप

या भित्तिचित्रांमध्ये एका लहान मुलाच्या हाताचा ठसा आहे. येथील वेगवेगळ्या चित्रांचा काळजीपूर्वक अभ्यास श्री यशोधर मठपाल यांनी केला आहे. त्यांनी या चित्रांतील प्राण्यांच्या ऐंशी जातीओळखल्या आहेत. यांमध्ये अस्वल, लांडगा,तरस , गेंडा, हत्ती, रानडुक्कर, रानटी बैल, हरीण, काळवीट, ससा. माकडे मुंगीखाऊ (anteater),  उंदीर, मासे, कासवे, मोर, उडणारे पण काही तपशील नसलेले पक्षी या वन्यपशूंचा व कुत्रा या पाळीव पशूचा समावेश आहे. हरणे व काळवीट हे सर्वात जास्त संख्येने चित्र केलेले आहेत. माणसांच्या शिकारी टोळ्या दाखवलेल्या आहेत. यातील एक टोळी गेंड्यापासून दूर पळत आहे. इतर टोळ्या हरिण इत्यादी पशूंची शिकार करत आहेत. शिकारीसाठी भाले व धनुष्यबाण ही आयुधे वापरात आहेत. मासे व कासवे जाळ्यात पकडली आहेत तर उंदरांना त्यांच्या बिळातून हुसकून बाहेर काढून पकडले आहे. तसेच एका गुहेमध्ये एक मिरवणूक चितारलेली आहे. यात घोडयावर बसलेली काही माणसे आहेत, त्यांच्या हातात तलवारी आणि भाले आहेत असे दिसते. बरोबर वाद्ये वाजवणारे दोन वाजंत्री आहेत आणि राजदंड घेऊन चालणारा एक माणूस आहे. तसेच एका गुहेत एक पुढचा एक पाय उंचावलेला पांढराशुभ्र घोडा असे देखणे चित्र दिसते.

पुरावा

या चित्रामुळे घोडा हे जनावर भारतात अस्तित्वात असल्याचा हा सगळयात पुरातन पुरावा उपलब्ध झाला आहे. आणि अरबांनी घोडे भारतात आणले हा आधुनिक समज खोटा पडला आहे.

पद्मश्री

भीमबेटकाचा शोध आणि त्यावरील संशोधनासाठी डॉ. विष्णू श्रीधर वाकणकर उर्फ हरीभारू या पुरातत्त्ववेत्त्याला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मध्य प्रदेशातील उज्जैन येथे त्‍यांच्या नावाची संशोधन संस्था उभारली आहे. तसेच यावर पुढे सखोल संशोधन करणारे यशोधर मठपाल यांनाही पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

चित्र दीर्घा

संदर्भ

बाह्य दुवे