मेरिल स्ट्रीप

ऑस्कर पुरस्कार विजेती अभिनेत्री.


मेरी लुईझ मेरिल स्ट्रीप (जून २२, इ.स. १९४९ - ) ही ऑस्कर विजेती नाट्य, दूरचित्रवाणी आणि चित्रपट अमेरिकन अभिनेत्री आहे. त्यांना त्यांच्या पिढीतील एक उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. त्यांना २१ वेळा अकॅडमी पुरस्कारांसाठी नामांकने मिळाली आहेत. त्यापैकी ३ वेळा त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे.[१] गोल्डन ग्लोब पुरस्कारांसाठी त्यांना सर्वात जास्त ३२ नामांकने मिळाली आहेत. त्यापैकी ८ वेळा त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे.[२]

मेरिल स्ट्रीप
मेरिल स्ट्रीप
जन्ममेरिल स्ट्रीप
२२ जून १९४९
समिट, न्यू जर्सी, अमेरिका
राष्ट्रीयत्वअमेरिकन
कार्यक्षेत्रअभिनय
कारकीर्दीचा काळ१९६९ पासून आत्तापर्यंत
भाषाइंग्रजी
पुरस्कारऑस्कर
अधिकृत संकेतस्थळmerylstreeponline.net
स्वाक्षरी

बालपण

‘मेरील' ह्यांचा जन्म २२ जून १९४९ साली समिट,न्यू जर्सी येथे झाला. त्या एक व्यावसायिक कलाकार, मेरी विल्किन्सन स्ट्रीप (मेरी वूल्फ स्ट्रीप) आणि हॅरी विल्यम स्ट्रीप ज्युनियर, ह्यांच्या कन्या आहेत. त्यांना दोन धाकटे बंधू आहेत: हॅरी विलियम स्ट्रीप III आणि डॅना डेव्हिड स्ट्रीप, हे दोघेही अभिनेते आहेत.

स्ट्रीप ह्यांचे वडील जर्मन आणि स्वीस वंशाचे आहेत. [३]त्यांची आई इंग्लिश,जर्मन आणि आयरिश वंशाची आहे.[४] स्ट्रीप यांच्या आईचे हावभाव आणि दिसणे ज्युडी डेंच या अभिनेत्रीसारखे आहे, असे त्यांनी म्हटले आहे. आईने स्ट्रीप ह्यांना खूप प्रोत्साहन दिले आणि लहान वयातच त्यांच्यात आत्मविश्वास रूजवला. स्ट्रीप म्हणतात:  “ती माझी गुरू होती कारण ती नेहमी मला म्हणायची ‘तू हे करू शकतेस, मेरील. तुला हे जमते.’ त्या असेही म्हणायच्या ‘तू जे काही ठरवशील ते तू करू शकतेस. पण आपण जर आळशी राहिलो तर त्या गोष्टी होणार नाहीत. पण जर आपण ठरवले असेल तर आपल्याकडून काहीही होऊ शकते.’ आणि मी तिच्यावर विश्वास ठेवला.”[५]

शिक्षण

स्ट्रीप ह्यांनी न्यू जर्सी येथे सीदार हील एलीमेंटरी स्कूल आणि ओक स्ट्रीट स्कूलमध्ये शिक्षण घेतले. त्यांनी लहान वयात ‘द फॅमिली अपस्टेअर्स’ ह्या नाटकातून ल्युईस हेलरच्या भूमिकेतून पदार्पण केले.१९६३ मध्ये त्यांचे कुटुंब बर्नाड्सव्हिल, न्यू जर्सीला रहायला आले, येथे त्यांनी बर्नाड्स हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले. लेखिका करीना लॉंगवर्थ ह्यांनी स्ट्रीप यांचे ‘कुरळ्या केसांची आणि चष्मा असलेली मुलगी’ म्हणून वर्णन केले आहे आणि असे म्हटले आहे की ‘मेरीलला लहान वयात कॅमेऱ्यासमोर भाव खायला खूप आवडायचे.’[६]

कारकीर्द

स्ट्रीप ह्यांनी ‘ट्रेलॉनी ऑफ द वेल्स’ या नाटकाद्वारे नाट्यभूमीवर १९७५ साली पदार्पण केले. १९७६ साली त्यांना ‘ट्वेंटी सेव्हन वॅगन्स फुल ऑफ कॉटन’ आणि ‘अ मेमरी ऑफ टू मंडेज’  ह्या नाटकांमधील भूमिकांसाठी उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून टॉनी पुरस्कार मिळाला. १९७७ साली त्यांनी टी.व्ही. वरील चित्रपटामध्ये ‘द डेडलीएस्ट सीझन’ ह्या चित्रपटातून पदार्पण केले आणि पहिला चित्रपट ‘जुलीया’ देखील केला.

१९७८ साली त्यांना त्यांच्या ‘होलोकॉस्ट’मधील भूमिकेसाठी उत्कृष्ट अभिनेत्रीसाठी ‘एमी पुरस्कार’ आणि ‘द डीयर हंटर’साठी ऑस्करचे पहिले नामांकन मिळाले. त्यानंतर त्यांना क्रॅमर व्हर्सेस क्रॅमरसाठी (१९७९) उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री म्हणून अकॅडमी पुरस्कार[७] आणि ‘सोफीज चॉईस’(१९८२) [८] आणि ‘द आयर्न  लेडी’साठी (२०११) उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून  अकॅडेमी पुरस्कार मिळाला.[९]

त्यांना ‘द फ्रेंच लेफ्टनन्ट वूमन’(१९८१), सिल्कवूड(१९८३), आऊट ऑफ आफ्रिका (१९८५), आयर्नवीड(१९८७), एव्हिल एंजल्स(१९८८), पोस्टकार्ड्स फ्रॉम द एज(१९९०), द ब्रिजेस ऑफ मॅडीसन काउंटी(१९९५),वन ट्रू थिंग(१९९८),म्युझिक ऑफ द हार्ट(१९९९), ॲडाप्टेशन(२००२), द डेव्हिल वेअर्स प्राडा(२००६), डाऊट(२००८), जुली&जुलिया(२००९), ऑगस्ट : ऑसेज काउंटी(२०१३), इनटू द वूड्स(२०१४), फ्लोरेन्स फोस्टर जेनकिन्स(२०१६) आणि द पोस्ट(२०१७) या चित्रपटातील भूमिकांसाठी त्यांना ऑस्करचे नामांकन मिळाले. त्यांच्या बिग लिटल लाईज(२०१९) मधील भूमिकेसाठी त्यांना एमी पुरस्कार मिळाला आहे.

संदर्भ आणि नोंदी