आंबेडकरवाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तत्त्वज्ञान व विचारप्रणाली

आंबेडकरवाद (इंग्रजी: Ambedkarism) हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर किंवा सिद्धातांवर आधारित एक भारतीय तत्त्वज्ञान किंवा विचारप्रणाली आहे. आंबेडकरवाद हे एक राजकीय, सामाजिक, धार्मिक तसेच राष्ट्रवादी तत्त्वज्ञान आहे. आंबेडकरवादाचे सर्वात प्रमुख तत्त्व "समानता" आहे.[१][२][३] ही विचारप्रणाली क्रांतिकारी, मानवतावादी व विज्ञानवादी असून भारत देशासह जगभरातील अनेक लोकांवर त्याचा प्रभाव आहे, ज्यात शोषित-पीडित लोक, शेतकरी, श्रमिक, महिलाधिकारी, राजकारणी, समाजिक कार्यकर्त्ये, दलित व बौद्ध चळवळीतील कार्यकर्ते यांचा समावेश होतो. भारताच्या दलित समाज व धर्मांतरित बौद्ध समाज यांच्यावर या विचारधारेचा सर्वाधिक प्रभाव असून ते या विचारधारेचा प्रसार-प्रचार करण्याचे कार्य देखील करत असतात. जाती निर्मूलनासाठी आंबेडकरवाद तत्तवप्रणाली वापरली जाते. आंबेडकरवाद ही एक मानवाच्या मन, विचार आणि वृत्तीमधील परिवर्तनाची जननी असल्याचे मानले जाते. आंबेडकरवादाला अनुसरणाऱ्यांना 'आंबेडकरवादी' किंवा 'आंबेडकरी' (Ambedkarite) म्हणतात.[४][५][६][७][८]

समता, स्वातंत्र्य, बंधुभाव, न्याय, धम्म, लोकशाही, महिलाधिकार, अहिंसा, सत्य, मानवता, विज्ञानवाद, संविधान ही आंबेडकरवादाची तत्त्वे आहेत.[९][१०][११][१२][१३]

आंबेडकरवादाचा भारतीय समाजावरील प्रभाव

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भारतीय समाजजीवनावर खूप प्रभाव पडलेला आहे. भारत देशातील लोकसंख्येचा तिसऱ्याहून अधिक हिस्सा (एक तृतीयांश) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रभावित झालेला आहे. बाबासाहेबांचे कोट्यवधी अनुयायी आहेत. बाबासाहेब हे देशातील शोषित, पीडित, गरीब, दबलेल्या, पिचलेल्या लोकांचे उद्धारक होते. भारत देशातील विशेषतः ८५% मागास जनतेकरिता बाबासाहेबांनी कार्य केले आहे, त्यांच्या हक्कांसाठी लढून त्यांना त्यांचे हक्क मिळवून दिलेले आहेत. उर्वरित १५% जनता ही अतिश्रीमंत व सत्ताधारी होती.[१४]

जातिव्यवस्थेचे उच्चाटन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यापक कार्यामुळे भारतीय समाजात सुमारे ५००० वर्षापासून प्रचलित असलेल्या हिंदू धर्मातील जातिव्यवस्थेस खिंडार पडले; तिचे उच्चाटन होण्यास चालना मिळाली. विषमतेवर आधारलेल्या जातिव्यवस्थेच्या जागी समतेवर आधारलेली लोकशाही व्यवस्था प्रस्थापित होण्यास चालना मिळाली.[१५]

अस्पृश्यांची उन्नती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक श्रेष्ठ समाजसुधारक व क्रांतिकारक होते. त्यांच्या अथक क्रांतिकारी कार्यामुळे हजारों वर्षापासून उच्च जातीच्या गुलामगिरीत अडकून पडलेल्या कोट्यवधी अस्पृश्यांमध्ये एकता व जागृती निर्माण झाली. अस्पृश्यांना त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची जाणीव झाली. परिणामी त्याच्यांत आत्मविश्वास व आत्माविष्कार निर्माण झाला. आपणच आपल्या विकासासाठी लढा दिला पाहिजे, याची त्यांना जाणीव झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी भारतीय राज्यघटनेत ज्या विशेष तरतुदी केल्या, त्यामुळे अस्पृश्यांच्या हक्कांना घटनात्मक वैधता प्राप्त झाली. आज सरकार समाजकल्याणाच्या विविध योजना राबविते. त्याचे मोठे श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यात जाते. बाबासाहेबांच्या प्रयत्नांमुळेच अस्पृश्यांना अधिकार, मालमत्ता व उच्च सामाजिक दर्जा मिळविणे शक्य झाले. याचा परिणाम म्हणून अस्पृश्यांमध्ये ऊर्ध्वगामी सामाजिक गतिशीलतेस चालना मिळाली.[१५]

बौद्ध धर्माचा प्रसार

एकेकाळी भारतात जन्मलेल्या, भारताचा राजधर्म असलेल्या आणि भारताबाहेरही अनेक देशांत पसरलेल्या पसरलेल्या बौद्ध धर्माचा ११व्या शतकानंतर भारतात ऱ्हास घडून आला. बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २०व्या शतकात स्वतः बौद्ध धम्म स्वीकारून, त्यांच्या कोट्यवधी अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा दिल्याने भारतात बौद्ध धर्माच्या प्रचारास चालना मिळाली. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेश, गुजरात व इतरही अनेक राज्यांत लाखो लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि ६० वर्षापासून दरवर्षी अखंडपणे हजारों-लाखोंच्या संख्येने स्वीकारतही आहेत. इतरही अनेक उच्चशिक्षित लोक बौद्ध धर्माकडे आकर्षित झाले व त्यांनी बौद्ध तत्त्वज्ञान, साहित्यपाली भाषा यांच्या अभ्यासाची सुरुवात केली. २०११ च्या जनगणनेनुसार भारतीय बौद्धांपैकी सुमारे ८३% बौद्ध हे आंबेडकरांपासून प्रेरीत होऊन बौद्ध (१९५६ नंतरचे धर्मांतरीत बौद्ध) बनलेले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारल्याने भारतात बौद्ध धर्माचे पुनरूज्जीवन झाले. यातूनच मोठ्या प्रमाणावर बौद्ध धर्म प्रचारास चालना मिळाली.[१६]

आमूलाग्र परिवर्तनास चालना

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यामुळे भारतीय समाजात आमूलाग्र परिवर्तन घडून आले. जातिव्यवस्थेत परिवर्तन होण्यास सुरुवात झाली. शिवाय विवाह, धर्म, अर्थ, शिक्षण राज्य या सामाजिक संस्थांतही परिवर्तन सुरू झाले. नवबौद्धांनी हिंदू विवाह पद्धती नाकारली व बौद्ध विवाहपद्धती स्वीकारली. बाबासाहेबांच्या पुरोगामी विचारांमुळे दलितांनी बलुता पद्धतीचा त्याग केला. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा चेहरामोहरा बदलला. जे लोक शिक्षणापासून वंचित होते त्यांनी शिक्षण घेणे सुरू केल्याने शिक्षणाचे सर्वत्रीकरण घडून आले. आरक्षणाच्या धोरणामुळे अनुसूचित जातीजमातींना राजकीय व प्रशासकीय सत्ता मिळाली. परिणामी समाजातील सर्व घटकांना राजकीय सहभाग मिळणे शक्य झाले.[१६]आधुनिक आंबेडकरी चळवळीला नवीन लेखक तथा राजकीय शास्त्रज्ञ आणि विचारकांचे खुप मोठे योगदान आहे. यात नवीन राजकीय विचारवंत प्रमोद भीमराव ठाकरे यांचा समावेश होते.[ संदर्भ हवा ]

दलित-आंबेडकरवादी चळवळीचा उदय

मानवाधिकारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नांमुळे दलित चळवळीचा उदय झाला. सुरुवातीस केवळ महार लोकच या चळवळीत सहभागी झाले होते. शिक्षणप्रसाराबरोबरच इतर मागास जातीही बाबासाहेबांच्या तत्त्वज्ञानाने प्रभावित झाल्या व त्यांनी त्यांच्या हक्कांसाठी चळवळी सुरू केल्या. परिणामी, आज दलित चळवळीचा विस्तार झाला आहे. दलित चळवळीला आज प्रामुख्याने "आंबेडकरवादी चळवळ" म्हटले जाते.[१६]

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

संदर्भ