गूढवाद

वास्तवाच्या विविध पैलूंचे किंवा जाणिवेच्या अवस्थांचे किंवा अस्तित्वाच्या स्तरांचे सामान्य मानवी संवेदनेपलीकडील ज्ञान आणि प्रामुख्याने व्यक्तिगत अनुभव म्हणजे गूढवाद किंवा रहस्यवाद होय. गूढवादात काही वेळा सर्वोच्च सत्तेचा अनुभव किंवा तिच्याशी संवाद यांचाही समावेश होतो.

पर्सेफनी ही देवता, अथेन्सच्या नॅशनल आर्किऑलॉजिकल म्युझिअममधील द ग्रेट इल्युसिनिअन उठावचित्रामधून
आय ऑफ प्रॉविडंस : आचेन कॅथेड्रलच्या कळसावरील सर्व-दर्शी डोळा
अविलाच्या संत तेरेसासमोर प्रकट झालेली पवित्र चेतना, पीटर पॉल रुबेन्स

अभिजात उद्गम

"मिस्टिकोज" ही गूढ धर्माची दीक्षा घेतलेली व्यक्ती असे. इल्युसिनिअन मिस्टरीज ( ग्रीक : Ἐλευσίνια Μυστήρια) हे डिमिटरपर्सेफनी या देवतांच्या पंथातील वार्षिक दीक्षासमारंभ होते. ते प्राचीन ग्रीसमधील अथेन्स नगराजवळ असलेल्या इल्युसिस इथे होत असत.[१] ख्रिस्तपूर्व सुमारे १६०० वर्षांपूर्वी सुरू झालेल्या ह्या मिस्टरीज्‌ दोन हजार वर्षे सुरू राहिल्या.

आधुनिक आकलन

गूढवादाचा आधुनिक अर्थ प्लेटोमत व नवप्लेटोमतामार्फत आलेला आहे. या मतांनी इल्युसिनिअन दीक्षांकडे आध्यात्मिक सत्यांची व अनुभवांची 'दीक्षा' म्हणून पाहिले. गूढवादाचा आधुनिक अर्थ "थेट अनुभव, अंतःप्रज्ञा, अंतःस्फूर्ती किंवा अंतर्दृष्टी यांच्यामार्फत अंतिम सत्य, दिव्यत्व, आध्यात्मिक सत्य किंवा ईश्वराशी संवाद साधण्याचा, एकरूप होण्याचा प्रयत्न" असा आहे. अशा अनुभवांना पोषक ठरणाऱ्या गोष्टींवर गूढवाद भर देतो. गूढवाद द्वैती अर्थात स्व आणि दिव्य यांच्यात भेद असतो असे मानणारा किंवा अद्वैती असू शकतो.

जगातील सगळेच नसले तरी अनेक धर्म गूढवाद्यांच्या शिकवणीवर (बुद्ध, येशू, लाओ त्सेश्रीकृष्ण यांच्यासहित) आधारलेले आहेत आणि बहुतेक सर्व धार्मिक परंपरा मूलभूत गूढ अनुभवांचे किमान गुप्तपणाने वर्णन करतात. ज्ञानोदय किंवा उद्बोधन ह्या अशा अनुभवांसाठीच्या जातिगत संज्ञा आहेत. त्या लॅटिन इल्युमिनॅशिओ पासून व्युत्पन्न झालेल्या आहेत आणि बुद्धासंबंधित ग्रंथ इंग्रजीत भाषांतरित करताना वापरल्या गेलेल्या आहेत.

पारंपरिक धर्मांची संस्थात्मक रचना मजबूत असते, तिच्यात औपचारिक उच्चनीचभेद असतात, पवित्र ग्रंथ आणि/किंवा श्रद्धा असतात. त्या धर्मातील व्यक्तींनी या श्रद्धा पाळणे आवश्यक असते, म्हणून गूढवाद बऱ्याचदा टाळला जातो किंवा त्याला पाखंड मानले जाते.[२]

पुढील तालिकेत जगातील प्रमुख धर्मांमधील गूढवादाची रूपे आणि त्यांच्या मूलभूत कल्पना दिलेल्या आहेत.

प्रमुख धर्मांमधील गूढवाद
यजमान धर्मगूढवादाचे रूपमूलभूत कल्पनामाहितीचे स्रोत
बौद्धशिंगॉन, वज्रयान, झेननिर्वाण, सतोरी, बोधी मिळविणे, महामुद्रा वा झॉग्चेनशी ऐक्य साधणे[३][४]
ख्रिश्चनकॅथलिक अध्यात्म, क्वेकर परंपरा, ख्रिश्चन गूढवाद, ज्ञेयवादआध्यात्मिक ज्ञानोदय, आध्यात्मिक दर्शन, ईश्वरी प्रेम, ईश्वराशी ऐक्य (थिऑसिस)[५][६][७]
फ्रीमेसन्री-उद्बोधन[८]
हिंदूवेदान्त, योग, भक्ती, काश्मिरी शैव संप्रदायकर्मचक्रातून मुक्ती (मोक्ष), आत्म-ज्ञान, कैवल्य, अंतिम सत्याचा अनुभव (समाधी), सहज व स्वभाव[९][१०]
इस्लामसुन्नी, शिया, सुफी मतईश्वरावर आंतरिक विश्वास (फित्र); फना (सुफी मत); बक़ा.[११]
जैनमोक्ष (जैन धर्मकर्मचक्रातून मुक्ती[१२]
यहुदीकब्बाला, हसिदी मतअहंकाराचा परित्याग, ऐन सोफ[१३]
रोसिक्रुशिअन--[१४]
शीख-कर्मचक्रातून मुक्ती[१५][१६][१७]
ताओ-ते: अंतिम सत्याशी संपर्क[१८]

आध्यात्मिक गुरूंनी वापरलेले साहित्यप्रकार

व्याख्येप्रमाणे गूढ ज्ञान हे थेट लिहिले किंवा बोलले जाऊ शकत नसल्याने (ती अनुभवण्याची गोष्ट असल्याने) असे ज्ञान ध्वनित करणारे अनेक साहित्यप्रकार - बऱ्याचदा विरोधाभासांचा किंवा अगदी विनोदांचाही आधार घेत - बनलेले आहेत. नमुन्यादाखल :

सूत्र, काव्य

सूत्र व काव्यामध्ये गूढ अनुभवाचा एखादा पैलू शब्दांमध्ये स्पष्ट करण्याचा कलात्म प्रयत्न केलेला असतो :

  • प्रेम (हाच) ईश्वर आहे (विशेषतः ख्रिश्चन व सुफी)
  • आत्मा (हाच) ब्रह्म आहे, नेती नेती, “हेही नाही तेही नाही” (अद्वैत)
  • ईश्वर व मी, मी व ईश्वर, एकच आहोत (कुंडलिनी योग, शीख)
  • झेन हायकू
  • अन’ल हक, ”मी सत्य आहे”, मन्सूर अल-हलाज. रुमीच्या प्रेमकविता (सुफी मत)[१९]

कोअन, कोडी, विरोधाभास

झेन कोअन, कोडी आणि ज्ञानमीमांसीय विरोधाभास हे मुद्दामहून उकलता न येण्यासाठी बनविलेले असतात. त्यांचा उद्देश विचार व बुद्धीपासून व्यक्तीला दूर नेऊन थेट अनुभवासाठी प्रयत्न करण्यास लावणे हा असतो.[२०]

या कोड्यांकडे विनोदाने किंवा लक्षणीय गूढ उत्तरे असणारे गंभीर प्रश्न म्हणून पाहिले जाऊ शकते. उत्तर ‘मिळविण्याचा’ प्रयत्न सोडून फक्त ‘असण्याचाच’ अनुभव घेण्याकडे हे प्रश्न नेतात.

  • पीक कापणे म्हणजे अख्खे जपून ठेवणे, वाकणे म्हणजे सरळ होणे, मोकळे असणे म्हणजे भरणे, थोडेसेच असणे म्हणजे मालकी असणे[२१] ही ताओ कल्पना शिक्षित आत्म्याला रिकामे करण्याच्या मार्गातील एक ज्ञानमीमांसीय विरोधाभास दाखवून देते.

विनोद

विनोद व विनोदी कथांच्या माध्यमातूनही आध्यात्मिक शिकवण प्रभावीपणे दिली जाऊ शकते :

  • मुल्ला नसरुद्दीनच्या कथा हे उत्तम उदाहरण.[२२] नमुन्यादाखल : नदीकाठी बसलेल्या नसरुद्दीनला एक जण ओरडून विचारतो, “मी पलीकडे कसा येऊ?” यावर तो उत्तर देतो, “तू पलीकडेच आहेस.”
  • सुफी मतातील बेक्ताशी विनोद
  • अमेरिकेचे मूलनिवासी, ऑस्ट्रेलियाचे आदिनिवासी आणि आफ्रिकेतील लोकसमूहांच्या पारंपरिक कथा

संदर्भ व नोंदी