गोलाकार तारकागुच्छ

दीर्घिकेच्या केंद्रकाभोवती उपग्रहाप्रमाणे फिरणाऱ्या ताऱ्यांचा गोलाकार समूह म्हणजे गोलाकार तारकागुच्छ(Globular Cluster). गोलाकार तारकागुच्छ हे गुरुत्वीय बलाने घट्ट बांधलेले असतात, त्यामुळे त्यांना त्यांचा गोल आकार मिळतो. त्यांतील ताऱ्यांची घनता केंद्राकडे वाढत गेलेली असते.

मेसिए ८० या सूर्यापासून ३०,००० प्रकाशवर्ष अंतरावरील वृश्चिक तारकासमूहातील गोलाकार तारकागुच्छामध्ये लाखो तारे आहेत.[१]

दीर्घिकेच्या तेजोमंडलात आढळणाऱ्या गोलाकार तारकागुच्छांमध्ये दीर्घिकेच्या तबकडीमध्ये आढळणाऱ्या खुल्या तारकागुच्छांपेक्षा बरेच जास्त आणि जुने तारे असतात. आकाशगंगेमध्ये सध्या माहीत असलेले १५०[२] ते १५८[३] आणि अद्याप शोध न लागलेले आणखी १० ते २० गोलाकार तारकागुच्छ असण्याची शक्यता आहे.[४] हे तारकागुच्छ दीर्घिकेभोवती ४० किलोपार्सेक (१,३०,००० प्रकाशवर्षे) किंवा त्यापेक्षा जास्त त्रिज्येच्या कक्षेमध्ये फिरतात.[५] देवयानी सारख्या मोठ्या दीर्घिकेमध्ये आणखी जास्त म्हणजे ५०० गोलाकार तारकागुच्छ असू शकतात.[६] एम८७ सारख्या काही मोठ्या लंबवर्तुळाकार दीर्घिकांमध्ये १३,००० गोलाकार तारकागुच्छ आहेत.[७]

स्थानिक समूहातील पुरेशा वस्तुमानाच्या प्रत्येक दीर्घिकेमध्ये आणि जवळपास प्रत्येक मोठ्या दीर्घिकेमध्ये गोलाकार तारकागुच्छ आढळले आहेत.[८] धनू बटू दीर्घिका आणि बृहललुब्धक बटू दीर्घिका त्यांचे गोलाकार तारकागुच्छ आकाशगंगेला देण्याच्या प्रक्रियेत आहेत.[९] यावरून असे सूचित होते की आकाशगंगेने यापूर्वीही काही गोलाकार तारकागुच्छ या दीर्घिकांकडून मिळवले असावेत.

गोलाकार तारकागुच्छांमध्ये दीर्घिकांमध्ये तयार होणारे सर्वात पहिले तारे असतात असे मानले जाते. असे असले तरी त्यांची निर्मिती आणि त्यांचे दीर्घिकांच्या उत्क्रांतीमधील भूमिका अस्पष्ट आहे.

एनजीसी ७००६, पहिल्या श्रेणीचे गोलाकार तारकागुच्छ.

निर्मिती

एनजीसी २८०८ मध्ये तीन वेगवेगळ्या पिढ्यांचे तारे आहेत.[१०] नासा छायाचित्र

गोलाकार तारकागुच्छांची निर्मिती नेमकी कशी होते हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. त्याचप्रमाणे यांमधील तारे सर्व एकाच पिढीचे असतात की त्यांच्यामध्ये करोडो वर्षात निर्माण झालेले दोन तीन पिढ्यांमधील तारे असतात हेदेखील अस्पष्ट आहे.[११] ताऱ्यांच्या निर्मितीचा इतिहास वेगवेगळ्या तारकागुच्छांमध्ये वेगवेगळा आढळतो. काही तारकागुच्छांमध्ये वेगवेगळ्या पिढीतले तारे आढळतात, तर काहींमध्ये एकाच पिढीतील तारे आढळतात. याचे कारण गतिक प्रक्रिया असू शकतात असे एक मत आहे.

मेसिए ५४ गोलाकार तारकागुच्छ.[१२]

घटक

गोलाकार तारकागुच्छांमध्ये लाखो जुने तारे असतात. त्यातील आढळणारे तारे सर्पिलाकार दीर्घिकांच्या तेजोगोलामध्ये आढळणाऱ्या ताऱ्यांसारखे असतात. या तारकागुच्छांमध्ये धूळ आणि वायू नसते. त्यामुळे यांमधील धूळ आणि वायूंपासून अनेक वर्षांपूर्वी ताऱ्यांची निर्मिती झाली असे मानले जाते.

गोलाकार तारकागुच्छांमध्ये ताऱ्यांची घनता ०.४ तारे प्रति घन पार्सेक एवढी असू शकते व ती त्याच्या केंद्रामध्ये १०० ते १००० तारे प्रति घन पार्सेक एवढी जास्त असू शकते.[१३] गोलाकार तारकागुच्छांमधील ताऱ्यांमधील सर्वसाधारण अंतर १ प्रकाशवर्ष असते,[१४] पण त्याच्या केंद्रामध्ये हे अंतर फक्त सूर्यमालेच्या आकाराएवढे असू शकते (सूर्यमालेच्या जवळील ताऱ्यांपेक्षा १०० ते १००० पट कमी).[१५]

संरचना

गोलाकार तारकागुच्छांची विवृत्तता
दीर्घिकाविवृत्तता[१६]
आकाशगंगा०.०७±०.०४
एलएमसी०.१६±०.०५
एसएमसी०.१९±०.०६
एम३१०.०९±०.०४
एनजीसी ४११ एक खुला तारकागुच्छ आहे.[१७]

जरी गोलाकार तारकागुच्छ साधारणतः गोलाकार असले तरी काही लंबगोलाकार देखील असतात. आकाशगंगा आणि देवयानीतील तारकागुच्छ गोलाकार आहेत तर, मोठ्या मॅजेलॅनिक मेघातील बहुतेक तारकागुच्छ लंबगोलाकार आहेत.[१८]

कक्षा

अनेक गोलाकार तारकागुच्छ आकाशगंगेभोवती पुच्छगामी कक्षेमध्ये (रेट्रोग्रेड ऑर्बिट) फिरतात.[१९] २०१४ मध्ये एम८७ दीर्घिकेभोवती उच्च गतीच्या गोलाकार तारकागुच्छाचा शोध लागला. त्याची गती एम८७ च्या मुक्तिवेगापेक्षा जास्त आहे.[२०]

चित्र दालन

जोर्गोव्स्की १ मधील ताऱ्यांमध्ये हायड्रोजन आणि हेलियम आहे, त्याशिवाय इतर मुलद्रव्ये जवळपास नाहीत. खगोलशास्त्रामध्ये अशा ताऱ्यांना मेटल पूअर म्हणजे धातूंची कमतरता असलेले तारे म्हणतात.[२१]
जोर्गोव्स्की १ मधील ताऱ्यांमध्ये हायड्रोजन आणि हेलियम आहे, त्याशिवाय इतर मुलद्रव्ये जवळपास नाहीत. खगोलशास्त्रामध्ये अशा ताऱ्यांना मेटल पूअर म्हणजे धातूंची कमतरता असलेले तारे म्हणतात.[२१] 
मेसिए ५३ मधील ब्ल्यू स्ट्रॅगलर्स प्रकारच्या ताऱ्यांच्या असाधारण संख्येने खगोलशास्त्रज्ञांना आश्चर्यचकित केले आहे.
मेसिए ५३ मधील ब्ल्यू स्ट्रॅगलर्स प्रकारच्या ताऱ्यांच्या असाधारण संख्येने खगोलशास्त्रज्ञांना आश्चर्यचकित केले आहे. 
एम१५ या गोलाकार तारकागुच्छाच्या केंद्रस्थानी मध्यम वस्तूमानाचे कृष्णविवर असू शकते. नासा छायाचित्र.
एम१५ या गोलाकार तारकागुच्छाच्या केंद्रस्थानी मध्यम वस्तूमानाचे कृष्णविवर असू शकते. नासा छायाचित्र
मेसिए ५ गोलाकार तारकासमूहामध्ये लाखो तारे त्यांच्या एकत्रित गुरूत्वाकर्षण बलाने बांधलेले आहेत.
मेसिए ५ गोलाकार तारकासमूहामध्ये लाखो तारे त्यांच्या एकत्रित गुरूत्वाकर्षण बलाने बांधलेले आहेत. 
४७ ट्युकने - ओमेगा सेन्टॉरी खालोखाल आकाशगंगेतील सर्वात तेजस्वी गोलाकार तारकागुच्छ.
४७ ट्युकने - ओमेगा सेन्टॉरी खालोखाल आकाशगंगेतील सर्वात तेजस्वी गोलाकार तारकागुच्छ. 
मेसिए १० - भुजंगधारी तारकासमूहातील १५०००० प्रकाशवर्ष अंतरावरील गोलाकार तारकागुच्छ.[२२]
मेसिए १० - भुजंगधारी तारकासमूहातील १५०००० प्रकाशवर्ष अंतरावरील गोलाकार तारकागुच्छ.[२२] 

 

हे सुद्धा पहा

संदर्भ