जीएन-झेड११ (GN-z11)

जीएन-झेड११ (GN-z11) ही सप्तर्षी या तारकासमूहातील एक उच्च-रेडशिफ्ट दीर्घिका आहे. ती सध्या (२०१६ साली) जगाला माहीत असलेली दृश्य विश्वातील सर्वात दूर अंतरावरील दीर्घिका आहे.[३] तिचा रेडशिफ्ट (z) ११.०९ इतका आहे, याचा अर्थ ही दीर्घिका पृथ्वीपासून ३२ अब्ज प्रकाशवर्ष अंतरावर आहे.[४][टीप १] GN-z11 या दीर्घिकेला ती १३.४ अब्ज वर्षांपूर्वी म्हणजे महास्फोटानंतर फक्त ४० कोटी वर्षांनंतर जशी अस्तित्वात होती तशी पाहण्यात आली आहे.[२]

जीएन-झेड११ (GN-z11)
GOODS-उत्तर सर्व्हेच्या छायाचित्रावर अध्यारोपित केलेले GN-z11 दीर्घिकेचे छायाचित्र
निरीक्षण डेटा (J2000[१] युग)
तारकासमूहसप्तर्षी
राईट असेंशन१२h ३६m २५.४६s[१]
डेक्लिनेशन+६२° १४′ ३१.४″[१]
रेडशिफ्ट११.०९[२]
अंतर (प्रकाशवर्ष)~३.२×१०१० प्रकाशवर्ष
प्रकारदीर्घिका
वस्तुमान~१०×१० M
संदर्भ: [१]
हेही पहा: दीर्घिका

शोध

या दीर्घिकेचा शोध हबल दुर्बिणीचा CANDELS सर्व्हे आणि स्पिट्झर अवकाश दुर्बिणीचा GOODS-उत्तर सर्व्हे यांच्या डेटांच्या अभ्यासातून लागला.[५][६] संशोधन गटाने हबलच्या वाइड फील्ड कॅमेरा ३चा वापर करून पंक्तिदर्शन तंत्र वापरून, म्हणजे प्रकाशातील घटक रंग वेगळे करून त्यापासून विश्वाच्या प्रसरणामुळे निर्माण होणारा रेडशिफ्ट मोजून GN-z11 पर्यंतचे अंतर मोजले.[७]

ही दीर्घिका आपल्या आकाशगंगेपेक्षा २५ पटीने लहान आहे. तिचे वस्तुमान आकाशगंगेच्या वस्तुमानाच्या १ टक्का असूनही ती नवीन ताऱ्यांची निर्मिती आकाशगंगेच्या २० पट वेगाने करत आहे.[७] विश्वातील सर्वात पहिले तारे निर्माण होण्याच्या काळात एवढ्या वस्तुमानाची ही दीर्घिका अस्तित्वात होती ही गोष्ट दीर्घिका निर्मितीच्या सैद्धान्तिक मॉडेलांसाठी एक आव्हान आहे.[७]

टीप

संदर्भ