भरड धान्य

लहान बीज असलेले तृण धान्य

भरड धान्य किंवा कदन्न (IPAc-en: ˈmɪlɪts; उच्चार:मिलेट्स)[१] हा लहान-बीज असलेल्या तृण वर्गीय पिकांचा एक अत्यंत वैविध्यपूर्ण गट आहे, जो जगभरात जनावरांचा चारा आणि मानवी अन्नासाठी धान्य म्हणून मोठ्या प्रमाणावर पिकवला जातो. साधारणतः भरड धान्ये ही आकाराने बारीक, गोलाकार तसेच खाण्यासाठी जशीच्या तशी वापरता येतात. त्याला विशेष प्रकारची शुद्धता किंवा कोणतीही विशेष प्रक्रिया करण्याची गरजच नाही. सामान्यतः भरड धान्य किंवा मिलेट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बहुतेक प्रजाती Paniceae या जमातीच्या आहेत, परंतु काही इतर विविध जमातीच्या देखील आहेत.[२]

बाजरीचे कणीस
नाचणीच्या ओंब्या
वरी चे कणीस

भरड धान्यास श्रीअन्न देखील म्हटले जाते. पूर्वीच्या काळी उखळ आणि मुसळ वापरून या धण्यावरील साल/साळ किंवा कवच भरडून काढले जात असे. त्या नंतर याचे गरजेनुसार जात्यावर दळून पीठ देखील केले जात असे. यामुळे या धान्याला भरड धान्य असे म्हटले जात असे. देश स्तरावरील बहुतेक शेतकरी खाण्यासाठी ही धान्ये विशेष करून पिकवत असे.[३] ज्वारी आणि बाजरी ही साधारणतः आकाराने मोठी असलेली धान्ये असून त्यांना ‘ग्रेटर मिलेट’ म्हणतात. तर आकाराने बारीक असलेली नाचणी, वरी, राळा, कोदो, बर्टी, प्रोसो व ब्राऊनटौप ही सर्व ‘मायनर मिलेट’ किंवा ‘बारीक धान्ये’ म्हणून ओळखली जातात. तर राजगिरा आणि बकव्हीट (कुट्टू) यांना 'स्यूडो मिलेट्स' किंवा 'छद्म भरड धान्य' असे म्हणतात.[४][५]

भरड धान्य ही आशिया आणि आफ्रिकेच्या अर्ध- उष्ण कटिबंधातील; विशेषतः भारत, माली, नायजेरिया आणि नायजर मधील महत्त्वाची पिके आहेत. ज्यात विकसनशील देशांचा जागतिक उत्पादनाच्या ९७% वाटा आहे. [६] कोरड्या, उच्च-तापमानाच्या प्रतिकूल परिस्थितीत त्याची उत्पादकता आणि वाढीसाठीचा छोटा हंगाम यामुळे हे पीक फायदेशीर आहे.

जगाच्या अनेक भागांमध्ये भरड धान्य हे स्थानिक पीक आहे.[७] ज्वारी आणि बाजरी ही भारत आणि आफ्रिकेच्या काही भागातील महत्त्वाची पिके असून, सर्वात मोठ्या प्रमाणावर उत्पादित केली जातात.[८] त्याव्यतिरिक्त नाचणी, वरी आणि राळे याही भरड धान्याच्या काही महत्त्वाच्या प्रजाती आहेत.

भरड धान्ये सुमारे ७,००० वर्षांपासून मनुष्य प्राण्याच्या आहारातील एक मुख्य धान्य असावे आणि संभाव्यतः बहु-पिक शेती आणि स्थिर शेती सोसायटीच्या वाढीमध्ये त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती.[९]

सामान्यतः, भरड धान्य हे तृणवर्गीय कुटुंबातील लहान-दाणेदार, वार्षिक, उबदार हवामानातील तृणधान्ये असतात. ते दुष्काळ, रोग आणि इतर अत्यंत विपरीत परिस्थितीला उत्तम सहनशील असतात. याशिवाय इतर प्रमुख तृणधान्यांइतकेच यात पोषक घटक असतात.[१०]

भारतातून संयुक्त अरब अमिराती, नेपाळ, सौदी अरेबिया, लिबिया, ओमान, इजिप्त, ट्युनिशिया, येमेन, यु.के. आणि अमेरिका या प्रमुख देशांमध्ये भरड धान्ये निर्यात होतात. यात बाजरी, नाचणी, कांगणी, राळे, वरी, राजगिरा ज्वारी आणि कुट्टू (बकव्हीट) हे भारतामधून निर्यात होणाऱ्या भरड धान्यांचे विविध प्रकार आहेत.तर इंडोनेशिया, बेल्जियम, जपान, जर्मनी, मेक्सिको, इटली, यू.एस.ए., युनायटेड किंग्डम, ब्राझील आणि नेदरलँड्स हे प्रमुख देश इतर विविध देशातून भरड धान्ये आयात करतात.

भारत सरकार द्वारा निर्मित भारतीय भरड धान्ये संशोधन संस्था (ICAR-IIMR) ही राजेंद्रनगर (हैदराबाद, तेलंगणा, भारत) येथे ज्वारी आणि इतर भरड धान्यावरील मूलभूत आणि धोरणात्मक संशोधन करणारी एक कृषी संशोधन संस्था आहे. ही संस्था भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (ICAR) अंतर्गत कार्यरत आहे.[११] भरड धान्याचे प्रजनन, सुधारणा, पॅथॉलॉजी आणि मूल्यवर्धन यावर ही संस्था कृषी संशोधन करते. या संस्थेची स्थापना १९५८ मध्ये प्रथम कापूस, तेलबिया आणि भरड धान्य (PIRCOM) वरील गहन संशोधन प्रकल्पांतर्गत करण्यात आली. २०१४ मध्ये ही संस्था 'भा कृ स प - भा भ धा सं सं' म्हणून श्रेणीसुधारित करण्यात आली आहे.[१२]

आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष २०२३

जागतिक कृषी महोत्सव २०२३ मधील भरड धान्याचे एक दुकान

भरड धान्य किंवा मिलेट्स हे कमी पाण्यात आणि हलक्या जमिनीत येणारे पौष्टिक पीक आहेत. भारतात हे मोठ्या प्रमाणात पिकते आणि निर्यात होते. भरड धान्याच्या जगातील एकूण उत्पादनापैकी ४०% पेक्षा जास्त भरड धान्य हे भारतात पिकवले जाते. याला फारशी निगा राखण्याची गरज नाही, यावर रोग कमी पडतात. तसेच याची खते आणि पाण्याची गरज देखील कमी असते. आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष साजरे केले जावे यासाठी भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये दिलेल्या प्रस्तावाला ७२ देशांनी पाठींबा दिल्यानंतर युनायटेड नेशन ने २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. भारतीय भरड धान्यांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने १६ आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शने तसेच खरेदीदार-विक्रेता भेटींच्या माध्यमातून निर्यातदार, शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा सहभाग वाढविण्याची विविध योजना आखल्या आहेत.[१३][१४] भरड धान्ये ही पौष्टिक तृणधान्य (न्यूट्री-सिरियल्स)’ म्हणून देखील ओळखली जातात. तसेच ही पचायला देखील हलकी असतात. भरड धान्य नियमित पेरल्यामुळे जमिनीतील नत्राचे प्रमाण वाढून मातीचा पोत बऱ्यापैकी सुधारतो. ही धान्ये पाळीव तसेच मुक्त पशु-पक्ष्यांचे आवडते खाद्य असून या कारणाने जैवविविधता वाढते.[१५]

भरड धान्याचे प्रकार

भरड धान्याच्या विविध प्रजातींचा एकमेकांशी जवळचा संबंध असेलच असे नाही. हे सर्व Poaceae (गवत वर्गीय तृणधान्य) कुटुंबाचे सदस्य आहेत परंतु ते वेगवेगळ्या जमाती किंवा अगदी उपकुटुंबातील असू शकतात.[८]

भरड धान्याचे अनेक प्रकार असून अंदाजे सोळा प्रमुख प्रकारची भरड धान्ये ही भारतात पिकवली आणि निर्यात केली जातात. ज्यात ज्वारी(सोर्घम), बाजरी(पर्ल मिलेट), नाचणी किंवा नागली (फिंगर मिलेट), कांगणी किंवा राळे (फॉक्स टेल मिलेट/ मायनर मिलेट), भगर किंवा वरी किंवा वरई (बार्नयार्ड मिलेट), चेना/पुनर्वा (प्रोसो मिलेट), कोद्रा (कोदा/कोदो मिलेट), सावा/साणवा/झांगोरा (लिटल मिलेट), कुटकी (कोराळे/पॅनिकम मिलेट), बकव्हीट/कुट्टू (टू स्युडो मिलेट), राजगिरा (अमेरॅन्थस) आणि ब्राऊन टॉप मिलेट आदी भरड धान्यांचा समावेश आहे.[१६][१७]

  • जव : हे फार पुरातन काळापासून लागवडीत असलेले तृणधान्य आहे. ते सर्वांत पुरातन तृणधान्य आहे असे काहींचे मत असून ५,००० ते १०,००० वर्षांपूर्वीपासून ते लागवडीत असावे असे मानतात. ऋग्वेदात त्याचा उल्लेख यव असा केलेला आढळतो. भारतात उ. प्रदेश, बिहार, पंजाब, हरियाणा व राजस्थानात या पिकाची लागवड मनुष्याच्या खाद्यान्नासाठी करतात. सातूचे पीठ गव्हाच्या पिठात मिसळून त्याच्या रोट्या करतात. तसेच त्यापासून बिअर आणि व्हिस्की ही मद्ये तयार करतात.[१८]
  • ज्वारी : हे तृणधान्य ईजिप्तमध्ये इ. स. पू. २,००० वर्षे लागवडीत होते. याची लागवड आफ्रिका, भारत, चीन, मँचुरिया, अमेरिकेची संयुक्त संस्थाने आणि इतर अनेक देशांत केली जाते. भारतात भातानंतर मनुष्याचे अन्नधान्य म्हणून ज्वारीच्या क्रमांक लागतो. भारतातील ज्वारीच्या क्षेत्रापैकी ३४% क्षेत्र महाराष्ट्रात आहे.[१८]
  • बाजरी : हे बारीक तृणधान्य भारत, आफ्रिका आणि मध्यपूर्वेतील काही देशांत पिकते. भारतात ते ज्वारीच्या खालोखाल महत्त्वाचे असून त्याची लागवड विशेषेकरून महाराष्ट्र, राजस्थान, पंजाब आणि मध्य प्रदेशात होते. ज्वारीपेक्षा बाजरीमध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते.[१८]
  • नाचणी : (नागली). दुर्जल शेतीसाठी सर्वांत चिवट असे हे गरीब लोकांचे बारीक तृणधान्य आहे. ते सर्व प्रकारच्या जमिनींत येणारे त्याचप्रमाणे जिरायत आणि बागायत पीक आहे. कर्नाटक राज्यात हे महत्त्वाचे पीक असून जवळजवळ भाताइतके क्षेत्र तेथे या पिकाखाली आहे. तमिळनाडू, आंध्र प्रदेश व महाराष्ट्रातही बऱ्याच मोठ्या प्रमाणावर या पिकाची लागवड होते. ते पौष्टिक आणि शक्तिदायक समजले जाते आणि त्यात प्रथिने व कॅल्शियम पुष्कळ प्रमाणात असतात. मधुमेही लोकांना ते उपयुक्त समजले जाते. या धान्याचा विशेष म्हणजे साठवणीमध्ये ते इतर तृणधान्यांपेक्षा अनेक वर्षे न किडता टिकते.[१८]
  • वरी किंवा भगर : हे लवकर पिकणारे व रुक्षताविरोधक (अवर्षणाला तोंड देऊ शकणारे) पीक असून दुष्काळी भागात अगर अवर्षणाच्या काळात लागवडीसाठी योग्य आहे. पंजाब, उ. प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यांत हे पीक लागवडीत आहे.[१८]
  • राळा : हे बारीक दाण्याचे रुक्षताविरोधक पीक मुख्यत्वेकरून आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रात लागवडीत आहे. २,००० मी. उंचीपर्यंतच्या प्रदेशांत या पिकाची लागवड होऊ शकते.[१८]
  • बंटी/मोरबंटी : हे लवकर पिकणारे, जाडजूड, तुरा असलेले, गवतासारखे वाढणारे पीक असून ते भारताच्या निरनिराळ्या भागांत आढळते. २.००० मी. उंचीपर्यंत हिमालयातही ते वाढते. ते रुक्षताविरोधक आहे परंतु त्याचबरोबर ते पाणथळ जमिनीतही वाढते.[१८]
  • कोद्रा : चिवट आणि अतिशय रुक्षताविरोधक बारीक तृणधान्य. ते तमिळनाडू व उ. कर्नाटक या दोन राज्यांत बऱ्याच मोठ्या प्रमाणावर आणि महाराष्ट्र, मध्य प्रदेश व गुजरातच्या काही भागांत लागवडीत आहे.[१८]
  • सावा : हे गरीबांची धान्य असून रुक्षताविरोधक तसेच पाणथळ जमिनीत वाढणारे, बारीक तृणधान्य थोड्या प्रमाणावर लागवडीत आहे.[१८]
  • राजगिरा : उष्ण कटिबंधातील देशांमध्ये व भारतात शेतीमध्ये सहज आढळणारी वनस्पती तथा भरड धान्य आहे. साधारपणे दीड मीटर उंच वाढणारी वनस्पती आहे. हिच्या पानांची भाजी तसेच बिया पौष्टिक आहार म्हणून व उपवासाचा पदार्थ म्हणून देखील वापरला जातो.

पौष्टिक गुणधर्म

भरड धान्य ही अत्यंत पौष्टिक, फायटोकेमिकल्स युक्त, ग्लूटेन मुक्त, बहुतांश आम्ल (ॲसिड) निर्माण न करणारी आणि ॲलर्जीविरहित असतात. खासकरून ग्लूटेन असहिष्णु असलेल्या लोकांसाठी भरड धान्य ही उपकारक ठरतात. त्यात भरपूर आहेत व ग्लुटेन नाही. मिलेटमुळे ॲलर्जी होत नाही, असे निरीक्षण आहे. भरड धान्याचे सेवन केल्यास रक्तातील शर्करा ट्रायग्लिसराइड्स आणि सी-रिॲक्टिव्ह प्रोटीनचे प्रमाणात घट होते, ज्यामुळे हृदयविकार आणि रक्तवाहिन्यासंबंधी रोग टळतात. ही धान्य तंतुमय (फायबर युक्त) असतात. आहारातील तंतूमध्ये पाणी शोषून घेऊन फुग्ण्याची क्षमता असते, ज्यामुळे अन्न आतड्यात हळू हळू पुढे सरकते. यामुळे पचनाचा कालावधी वाढतो. पर्यायाने आतड्याची दाहकता कमी होते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकण्यास मदत होते. ही धान्ये आपल्या पचनसंस्थेतील उपयुक्त जिवाणूंसाठी प्रोबायोटिक खाद्य म्हणून कार्य करतात. ही धान्ये आपल्या मोठ्या आतड्यात ओलावा निर्माण करतात. यामुळे बद्धकोष्ठता होण्यापासून आपली सुटका होते. ही धान्ये नियासिन कोलेस्ट्रॉल कमी करण्यास देखील मदत करतात. हे पदार्थ खाल्यास आपल्या शरीरातील अन्नाचा ट्रान्झिट टाइम वा पचनाचा काळ वाढवण्यात मदत होते. तसेच यातील शर्करा हळूहळू प्रसारित होते, ज्यामुळे यात साखर असूनदेखील मधुमेहाचा त्रास होत नाही. यामुळे टाईप टू प्रकारच्या मधुमेहात भरड धान्य खाणे आरोग्यास लाभदायक ठरते.[५] याशिवाय त्यात भरपूर अँटिऑक्सिडंट आहेत. इतर क्षार व जीवनसत्त्वेसुद्धा मुबलक आहेत. म्हणून भरड धान्ये पचायला हलकी आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी तर ही फारच उत्तम.[१९]

भरड धान्यात पोषक तत्व आणि आहारातील फायबर जास्त असतात. ते प्रथिने, सूक्ष्म पोषकतत्व आणि फायटोकेमिकल्सचा चांगला स्रोत म्हणून काम करतात. भरड धान्यात ७-१२% प्रथिने, २-५% मेद, ६५-७५% कर्बोदके आणि १५-२०% आहारातील फायबर असतात. तृणधान्यातील प्रथिनांप्रमाणेच, भरड धान्याचे प्रथिने हे लाइसिनचे अल्प स्रोत आहेत, परंतु ते लाइसिन - समृद्ध भाज्या (शेंगायुक्त) आणि मांसाहारी प्रथिने यांच्याशी उत्तम प्रकारे पूरक आहेत जे उच्च जैविक मूल्यांचे पौष्टिकदृष्ट्या संतुलित संमिश्र तयार करतात. तसेच काही भरड धान्ये ही फॉस्फरस आणि लोहाचा चांगला स्रोत आहेत. तसेच ही धान्य फायटेट्स, पॉलीफेनॉल्स, टॅनिन, अँथोसायनिन्स, फायटोस्टेरॉल आणि पिनाकोसॅनॉलसह अँटिऑक्सिडंट क्रियाकलापांमध्ये योगदान देतात. ज्यामुळे वृद्धत्व आणि चयापचयाच्या आजारात यांची भूमिका महत्त्वाची ठरते. सर्व प्रकारची भरड धान्ये ही उच्च अँटिऑक्सिडेंट ने परिपूर्ण असतात.[५]

ज्वारी [५]

  • ज्वारीच्या प्रथिनांचा मुख्य भाग हा प्रोलामिन (कॅफिरिन) आहे ज्यामध्ये स्वयंपाक करताना पचनक्षमता कमी करण्याचे वैशिष्ट्य आहे जे विशिष्ट आहार गटांसाठी आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
  • शिजलेल्या ज्वारीतील प्रथिने इतर तृणधान्य प्रथिनांपेक्षा पचण्यास हलकी असतात.
  • ज्वारीत प्रथिने, फायबर, थायामिन, रिबोफ्लेविन, फॉलिक ॲसिड आणि कॅरोटीन भरपूर प्रमाणात असते.
  • यात भरपूर प्रमाणात लोह, जस्त आणि सोडियमसह पोटॅशियम, फॉस्फरस आणि कॅल्शियम असते.

बाजरी [५]

  • बाजरीमध्ये प्रथिने (१२-१६%) तसेच लिपिड्स (४-६%) मोठ्या प्रमाणात असतात.
  • त्यात ११.५% आहारातील फायबर असते. हे आतड्यात अन्नाचा संक्रमण वेळ वाढवते. म्हणून, दाहक आतड्यांसंबंधी रोगाचा धोका कमी होतो.
  • बाजरीत नियासिनचे प्रमाण इतर सर्व तृणधान्यांपेक्षा जास्त असते. त्यात फॉलीकेट, मॅग्नेशियम, लोह, तांबे, जस्त आणि जीवनसत्त्वे ई आणि बी- कॉम्प्लेक्स देखील असतात.
  • इतर भरड धान्याच्या तुलनेत यात उच्च ऊर्जा सामग्री आहे.
  • त्यात कॅल्शियम आणि असंतृप्त चरबी देखील भरपूर असतात जे आरोग्यासाठी चांगले असतात.

नाचणी [५]

  • नाचणी हा कॅल्शियमचा सर्वात मोठा स्रोत आहे (३००-३५० मि.ग्रॅ./१००ग्रॅ.)
  • नाचणीमध्ये सर्वाधिक खनिजे असतात. त्यात प्रथिने (६-८%) आणि चरबी (१.५-२%) कमी असतात.
  • नाचणीतील प्रथिने ही सल्फर समृद्ध अमीनो ऍसिड सामग्रीमुळे अद्वितीय आहेत.
  • यात उत्कृष्ट माल्टिंग गुणधर्म आहेत आणि ते दुग्धजन्य पदार्थ म्हणून वापरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर फायदेशीर आहेत.
  • नाचणीत उच्च अँटिऑक्सिडेंट क्रियाकलाप आहे. ज्यामुळे वृद्धत्व उशिरा येते.

राळे [५]

  • राळ्यात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते.
  • यामध्ये तांदळाच्या तुलनेत दुप्पट प्रथिने असतात.
  • तांबे आणि लोहासारखी खनिजे विपुल आहेत.
  • हे पोषक तत्वांचा एक उत्तम पुरवठा प्रदान करते. गोड व स्वादिष्टपणा आणि सर्वात पचण्याजोगे आणि गैर-एलर्जीक धान्यांपैकी एक मानले जाते.

कोद्रा [५]

  • कोद्रात उच्च प्रथिने सामग्री (११%), कमी चरबी (४.२%) आणि खूप उच्च फायबर सामग्री (१४.३%) आहे.
  • कोद्रात ब जीवनसत्त्वे विशेषतः नियासिन, पायरीडॉक्सिन आणि फॉलिक अॅसिड तसेच कॅल्शियम, लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि जस्त यांसारखी खनिजे भरपूर असतात.
  • कोद्रात लेसिथिनची उच्च मात्रा असते आणि मज्जासंस्था मजबूत करण्यासाठी उत्कृष्ट आहे.

सावा [५]

  • हा क्रूड फायबर आणि लोहाचा सर्वात मोठा स्रोत आहे.
  • याच्या धान्यांमध्ये पुढील उपयुक्त घटक आहेत, गॅमा एमिनो ब्युटीरिक ऍसिड (GABA) आणि बीटा-ग्लुकॅन, जे की अँटिऑक्सिडंट्स म्हणून आणि रक्तातील लिपिड पातळी कमी करण्यासाठी वापरले जातात.

कुटकी/शावन [५]

  • कुटकी धान्य हे इतर भरड धान्याच्या तुलनेत आकाराने लहान असते.
  • यामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते.
  • यात उच्च अँटिऑक्सिडेंट क्रियाकलाप आहेत.
  • यात सुमारे ३८% आहारातील फायबर असते.

चेना/बॅरी [५]

  • यात सर्वाधिक प्रमाणात (१२.५%) प्रथिने असतात.
  • चेनात कार्बोहायड्रेट आणि फॅटी ऍसिडचे प्रमाण लक्षणीय आहे.
  • मसाले आणि काजू यांसारख्या इतर पारंपारिक स्रोतांच्या तुलनेत हा मॅंगनीजचा स्वस्त स्रोत आहे.
  • यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते जे हाडांच्या वाढीसाठी आणि देखभालीसाठी आवश्यक असते.
  • यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते आणि हृदयविकाराचा धोकाही कमी होतो.

राजगिरा [५]

  • उच्च प्रथिने सामग्री (१३-१४%) आणि लाइसिनचे वाहक, एक अमोनो आम्ल; जे इतर अनेक धान्यांमध्ये उपलब्ध नसते किंवा याचे प्रमाण नगण्य असते.
  • राजगिऱ्यात ६ ते ९% मेद असते जे इतर तृणधान्यांपेक्षा जास्त असते. राजगिरा तेलामध्ये अंदाजे ७७% असंतृप्त फॅटी ऍसिड असते आणि त्यात लिनोलिक ऍसिडचे प्रमाण जास्त असते.
  • यामध्ये आहारातील फायबरचे प्रमाण जास्त आहे.
  • लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि कॅल्शियमचे प्रमाण जास्त आहे.
  • अल्प कोलेस्टेरॉल असून राजगिरा फायटोस्टेरियोल्सचा समृद्ध आहार स्रोत आहे.
  • यामध्ये लुनासिन, जसे की पेप्टाइड आणि इतर बायोएक्टिव्ह पेप्टाइड्स असते. कर्करोग आणि उच्च रक्तदाब अशा दोन आजारांना जे प्रतिबंध करते.

बकव्हीट (कुट्टू) [५]

  • त्यात १३-१५% प्रथिने असून अमीनो ऍसिड लायसिनने हे समृद्ध आहे.
  • यात भरपूर प्रमाणात कर्बोदकांमधे (प्रामुख्याने स्टार्च) आहेत.
  • यात ब १, स आणि इ जीवनसत्त्वे आढळून येतात.
  • पॉलिअनसॅच्युरेटेड अत्यावश्यक फॅटी ऍसिड (लिनोलिक ऍसिड) ने समृद्ध आहे.
  • इतर तृणधान्यांपेक्षा झिंक, तांबे आणि मॅंगनीजची मोठ्या प्रमाणावर असून या खनिजांची जैवउपलब्धता देखील खूप जास्त आहे.
  • यात विरघळणारे फायबर जास्त आहे.
  • हे पॉलिफेनॉल यौगिकांचा समृद्ध स्रोत आहे.
  • यात बायोफ्लाव्होनॉइड असून हा, दाह विरोधी, रक्तदाब नियंत्रित करण्यात मदत करणारा आणि कर्करोगविरोधी गुणधर्म असलेला पदार्थ आहे.

भरड धान्य आणि इतर धान्यातील पौष्टिक गुणधर्माचा तुलनात्मक तक्ता

तक्ता १[२०]

घटक
(प्रति 100 ग्रॅम (कच्चे धान्य))
गहूतांदूळमकाज्वारीचेनाकोद्रा[२१]
पाणी (g)१३.१12७६९.२८.७
ऊर्जा (kJ)१३६८१५२७३६०१४१८१५८२१४६२
प्रथिने (ग्रॅ)१२.६११.३११९.९४
चरबी (ग्रॅ)१.५३.३४.२३.०३
कर्बोदके (ग्रॅ)७१.२७९१९७५७३६३.८२
फायबर (ग्रॅ)१.२६.३८.५८.२
साखर (ग्रॅ)०.४>०.११.९
लोह (मिग्रॅ)३.२०.८०.५४.४३.१७
मॅंगनीज (मिग्रॅ)३.९१.१०.२<०.११.६
कॅल्शियम (मिग्रॅ)२९२८२८३२.३३
मॅग्नेशियम (मिग्रॅ)१२६२५३७<१२०११४
फॉस्फरस (मिग्रॅ)२८८११५८९२८७२८५३००
पोटॅशियम (मिग्रॅ)३६३११५२७०३५०१९५
जस्त (मिग्रॅ)२.६१.१०.५<११.७३२.७
पॅन्टोथेनिक ऍसिड (मिग्रॅ)०.९१.००.७<०.९०.८
जीवनसत्व ब६ (mg)०.३0.2०.१<०.३०.४
फोलेट (µg)३८४२<२५८५
थायामिन (मिग्रॅ)०.३८०.१0.20.2०.४०.१५
रिबोफ्लेविन (मिग्रॅ)०.१>०.१०.१०.१०.३२.०
नियासिन (मिग्रॅ)५.५१.६१.८२.९०.०९

तक्ता २[२२]

पीक / पोषकप्रथिने (ग्रॅ)फायबर (ग्रॅ)खनिजे (ग्रॅ)लोह (मिग्रॅ)कॅल्शियम (मिग्रॅ)
ज्वारी१०१.६२.६५४
बाजरी१०.६१.३२.३१६.९३८
नाचणी७.३३.६२.७३.९३४४
राळे१२.३३.३२.८३१
चेना१२.५२.२१.९०.८१४
कोद्रा८.३२.६०.५२७
सावा७.७७.६१.५९.३१७
भगर११.२१०.१४.४१५.२११
हिरवी कांग११.५१२.५४.२०.६५०.०१
क्विन्वा१४.१*४.६४७
टेफ१३०.८५७.६१८०
फोनियो११११.३५.३१८४.८१८
तांदूळ६.८०.२०.६०.७१०
गहू११.८१.२१.५५.३४१

संदर्भ

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत