गुंज

गुंज ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. हिचा वेल असतो. गुंजेची पाने गोडसर असतात व विड्यात वापरतात. पूर्वीच्या काळी, सोन्याचे वजन करावयाचे भारतात वापरले जाणारे हे एक परिमाण होते. (एक गुंज=तोळ्याचा ९६वा भाग).गुंजेत दोन जाती आहेत. एक पांढरी व दुसरी लाल. पांढऱ्या गुंजेची मुळे व पाला औषधात वापरतात.

" | गुंज

" | शास्त्रीय वर्गीकरण

ही वेलवर्गीय वनस्पती आहे. ही बहूवर्षायू वनस्पती आहे. उष्णकटीबंधात ही वेल सामान्यपणे उगवलेली आढळते. तसेच विरळ दमट जंगलांत सापडते. गुंज ही दुसऱ्या वनस्पतीच्या आधाराने साधारण पाच ते सहा मीटर पर्यंत वाढते. पाने संयुक्त व समदली असतात. फुले लहान व गुलाबी असून पावसळ्यात येतात. वाटाण्याच्या शेंगासारख्या शेंगा येतात. त्या तडकल्या म्हणजे त्यात चार ते सहा बिया निघतात. त्यांनाच गुंजा म्हणतात. यामध्ये लाल व सफेद अशा दोन प्रकारच्या असतात.लाल गुंजेवर काळ्या रंगाचा ठिपका असतो. तो कधी-कधी संपूर्ण गुंजेवर असतो. गुंजा थोड्या लांबट, वाटोळ्या, गुळगुळीत व चमकदार असतात. मुळे व पाने मधूर असतात परंतु बिया विषारी असतात. कच्च्या बियांच्या सेवनाने जनावरांना विषबाधा होऊ शकते. आयुर्वेदानुसार वनस्पतींमधील सात उपविषांमध्ये गुंजेचा समावेश होतो.पूर्वी सोनारांच्या दुकानांत वजनांसाठी गुंजेचा वापर करत असे. गुंजेच्या वजनात नेहमी सातत्य असते.धर्म- गुंजेच्या मुळाची क्रिया जेष्ठमधासारखी होते.पाल्याचे धर्म मुळासारखे आहेत. मधुर, स्नेहन,कफशामक, मूत्रजनन आणि व्रणरोपण.गुंजेमध्ये कटु, तिक्त, शीत, कफ, पित्त, ग्रहपीडानाशक, कृमिघ्न, व्रणनाशक, कुष्ठनाशक, वाजीकर, रेचक इ. गुणधर्म असतात.

औषधी उपयोग:-

जेष्ठमधा ऐवजी गुंजेची मुळी वापरतात.

उपदंशावर सफेद गुंजेचे मुळ व सफेद जास्वंदीचे मुळ पाण्यात उगाळून पोटातून घ्यावे व व्रणावरही लावावे.

मुखपाक झाल्यावर पाने चावून खावी.

खोकला व मूत्ररोगात प्रयोजक औषधांबरोबर गुंजेचे मुळ द्यावे.

पाला वाटून व्रणशोधावर व व्रणावर बांधल्याने थंडावा मिळून सूज कमी होऊन व्रण रोपन होते.

गुंजेच्या बिया खाल्याने विषबाधा होऊन उलटी, जुलाब, मळमळ, धाप लागणे, यकृताचे कार्य बिघडणे इ. लक्षणे दिसतात. उपचार न मिळाल्यास मृत्यू होऊ शकतो.

केसांसाठी बाह्य उपचारामध्ये गुंजेचा उपयोग करतात.

मानसिक स्वास्थ मिळावे म्हणून बहूतेक लोक सफेद गुंजाची माळ गळ्यात घालतात.


  • संस्कृत- काकाणन्तिका, काकणन्ती, काकादनी, गुंजा, चिरिहिण्टिका, रक्तिका
  • हिंदी- गुंज, गुंजा, घुंगची, घुंघची, चिरमिटी, माषा, रति
  • बंगाली- कुंच
  • कानडी- गुंजा, मधुका, हागा,गुळगंती
  • गुजराती- चनोरी, गुंज
  • मलयाळम-कुन्नि
  • मराठी- गुंज, रती
  • तामिळ-
  • तेलगू-गुरिगिंज
  • नेपाळी- मस्वतः
  • उर्दू- खाक्शी
  • इंग्रजी- Crab's Eye, Indian Liquorice/Indian Licorice
  • लॅटिन- Abrus precatorius L.

चित्रदालन

🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन