मकर (तारकासमूह)

मकर हे आधुनिक ८८ तारकासमूहातील एक तारकासमूह आहे. दुसऱ्या शतकातील खगोलशास्त्रज्ञ टॉलेमी यांनी बनवलेल्या ४८ तारकासमूहांच्या यादीमध्ये ह्या तारकासमूहाचे नाव होते. ‘मकर’ला इंग्रजीमध्ये Capricornus (कॅप्रिकॉर्नस) म्हणतात. या शब्दाचा लॅटिन भाषेतील अर्थ शिंग असलेली शेळी किंवा शेळीची शिंगे असा होतो. याचे चिन्ह पुढीलप्रमाणे आहे (युनिकोड ♑). याला माशाचे शेपूट असलेल्या बोकडाच्या रूपामध्ये दर्शवले जाते. पॅन देवतेचे माशाचे शेपूट असलेल्या बोकडात रूपांतर होऊन या तारकासमूहाची आकृती बनली आहे, अशी पौराणिक समजूत आहे.[२]

मकर
तारकासमूह
मकर मधील ताऱ्यांची नावे
लघुरुपCap
प्रतीकशेळी
विषुवांश२०h ०६m ४६.४८७१s
२१h ५९m ०४.८६९३s[१]
क्रांती−८.४०४३९९९°–
−२७.६९१४१४४°[१]
क्षेत्रफळ४१४ चौ. अंश. (४०वा)
मुख्य तारे२३
बायर/फ्लॅमस्टीड
तारे
४९
ग्रह असणारे तारे
३.००m पेक्षा तेजस्वी तारे
१०.०० pc (३२.६२ ly) च्या आतील तारे
सर्वात तेजस्वी ताराδ Cap (देनेब अलजीदी) (२.८५m)
सर्वात जवळील ताराएलपी ८१६-६०
(१७.९१ ly, ५.४९ pc)
मेसिए वस्तू
उल्का वर्षावअल्फा कॅप्रिकॉर्निड्स
काय कॅप्रिकॉर्निड्स
सिग्मा कॅप्रिकॉर्निड्स
टाऊ कॅप्रिकॉर्निड्स
कॅप्रिकॉर्निडेन-सॅजिटॅरिड्स
शेजारील
तारकासमूह
कुंभ
गरूड
धनू
सूक्ष्मदर्शी
दक्षिण मस्त्य
+६०° आणि −९०° या अक्षांशामध्ये दिसतो.
सप्टेंबर महिन्यात रात्री ९:०० वाजता सर्वोत्तम दिसतो.

मकर क्रांतिवृत्तावर आहे. मकर तारकासमूहाची सीमा गरुड, धनु, सूक्ष्मदर्शी, दक्षिण मस्त्य, आणि कुंभ या इतर तारकासमूहांना लागून आहे. याचा १० बाजूंचा बहुभुजाकृती आकार विषुवांश २० ता ०६ मि ते २२ ता आणि क्रांति -१०° ते -२०° या मर्यादेत येतो. याचे खगोलावरील क्षेत्रफळ ४१४ चौरस अंश आहे. हा क्रांतिवृत्तावरील सर्वात लहान तारकासमूह आहे. हा तारकासमूह सप्टेंबरच्या उत्तरार्धात रात्री ९ च्या सुमारास मध्यमंडलावर येतो.

वैशिष्ट्ये

नुसत्या डोळ्यांनी दिसणारा मकर तारकासमूह.[३]

तारे

मकर एक अंधुक तारकासमूह आहे. यातील फक्त एक तारा ३ऱ्या दृश्यप्रतीपेक्षा अधिक तेजस्वी आहे.

मकर मधील सर्वात तेजस्वी तारा डेल्टा कॅप्रिकॉर्नी किंवा देनेब अलजीदी आहे. तो पृथ्वीपासून ३९ प्रकाश-वर्षे अंतरावर असून त्याची दृश्यप्रत २.९ आहे. देनेब हे नाव अरबी भाषेतून आले असून त्याचा अर्थ "शेपटी" असा होतो, परंपरेनुसार त्याचा अर्थ "बोकडाची शेपटी" असा होतो. देनेब एक चलतारा आहे. त्याची दृश्यप्रत दर २४.५ तासांनी ०.२ ने कमीजास्त होते.[४]

मकर मधील इतर ताऱ्यांची दृश्यप्रत ३.१ ते ५.३ यादरम्यान आहे. अलजीदी म्हणून ओळखला जाणारा अल्फा कॅप्रिकॉर्नीमध्ये दोन वेगळे तारे आहेत. मुख्य तारा (α2 कॅप) ३.६ दृश्यप्रतीचा पिवळा राक्षसी तारा आहे. त्याचे पृथ्वीपासूनचे अंतर १०९ प्रकाशवर्षे आहे. दुय्यम ताराही (α1 कॅप) ४.३ दृश्यप्रतीचा पिवळा महाराक्षसी तारा असून तो पृथ्वीपासून ६९० प्रकाशवर्षे अंतरावर आहे. अलजीदी हे पारंपरिक नाव अरबी भाषेतल्या "लहान मूल" या अर्थाच्या शब्दापासून आले आहे. या तारकासमूहाच्या अरबी पुराणकथांमध्ये याचा संदर्भ आढळतो.[४]

बीटा कॅप्रिकॉर्नी या ताऱ्याला दबीह असेही म्हणतात. यामध्ये दोन वेगवेगळे तारे आहेत. ते एकमेकांच्या अतिशय जवळ असल्याने एकच तारा असल्याचा भास होतो. त्यातील एक तारा ३.१ दृश्यप्रतीचा पिवळा राक्षसी तारा असून तो पृथ्वीपासून ३४० प्रकाशवर्षे अंतरावर आहे. दुसरा तारा ६.१ दृश्यप्रतीचा निळा-पिवळा तारा आहे. बीटा कॅप्रिकॉर्नीचे पारंपरिक नाव अरबी भाषेतील "कसायाचे भाग्यवान तारे" या अर्थाच्या वाक्यांशावरून आले आहे. हा पुरातन काळातील अरब लोकांच्या मकर राशीच्या उदयाच्या दिवशी बळी देण्याच्या प्रथेचा एक संदर्भ आहे.[५] गॅमा कॅप्रिकॉर्नि हा आणखी एक नुसत्या डोळ्यांनी दिसू शकणारा तारा आहे. हा एक पांढरा राक्षसी तारा असून त्याची दृश्यप्रत ३.७ आहे. तो पृथ्वीपासून १३९ प्रकाशवर्षे अंतरावर आहे.[४]

हबल अवकाश दुर्बिणीने घेतलेले मेसिए ३० या गोलाकार तारकागुच्छाचे छायाचित्र.

दूर अंतराळातील वस्तू

मकरमध्ये अनेक दीर्घिका आणि ताऱ्यांचे समूह आहेत. एनजीसी ७१०३ या दीर्घिकांच्या समूहापासून एक अंश दक्षिणेला मेसिए ३० (एनजीसी ७०९९) हा गोलाकार तारकागुच्छ आहे. याची दृश्यप्रत ७.५ आहे. हा पृथ्वीपासून ३०,००० प्रकाशवर्षे अंतरावर आहे.

संदर्भ