इंतर्नास्योनाल

इंतर्नास्योनाल (फ्रेंच: L'Internationale) हे जगभरातल्या डाव्या विचारधारेशी जोडलेल्या लोकांसाठी १९व्या शतकाच्या शेवटच्या काळापासूनचे एक प्रेरक गीत आहे. फ्रेंच भाषेत 'इंतर्नास्योनाल' ह्या शब्दाचा अर्थ 'आंतरराष्ट्रीय' असा होतो. (ह्याचा इंग्रजीमध्ये 'इंटरनॅश्नाले' असा अपभ्रंश झाला आहे.) ह्या गाण्याचा केंद्रीय संदेश असा आहे की जगभरातले लोक एक सारखेच आहेत आणि म्हणून त्यांनी एकत्र येऊन अत्याचाराविरोधात संघर्ष केला पाहिजे.

हे गीत मूळ रूपात इ.स. १८७१ मध्ये युझैन पोतिये (Eugène Pottier) द्वारा फ्रेंच भाषेत लिहिले गेले होते. पण त्यानंर ह्याचा अनेक भाषांमध्ये अनुवाद करण्यात आला आहे.[१] हे गाणे बरेचदा उजव्या किंवा डाव्या हाताची वळलेली मूठ सलामीच्या रूपात उंचावून गायले जाते.[२]

मूळ गाण्याचे ध्रुवपद

मूळ गाण्याच्या प्रत्येक कडव्याच्या शेवटी येणारे ध्रुवपद खालील प्रमाणे आहे:

मूळ फ्रेंच बोलशब्दशः भाषांतर

C'est la lutte finale
Groupons-nous et demain
L'Internationale
Sera le genre humain

हा अंतिम संघर्ष आहे
चला संघटित होऊया आणि उद्या
आंतरराष्ट्रीय
मानव जाती उदयास येईल

ह्याचा भावार्थ असा आहे की अंतिम लढ्यामध्ये सर्व मानवांना राष्ट्रीय सीमा तोडून व सर्व भेद-भाव विसरून एकसंध मानव जाती घडवायला पाहिजे.

मराठी अनुवाद

महाराष्ट्रातील चळवळीच्या काही कार्यकर्त्यांनी ह्या गाण्याचा मराठी अनुवाद खालील प्रमाणे केला आहे.

जागे व्हा गरीब शोषितांनो
खितपत पडलेल्यांनो उठा
कितपत सहन करणार आता
शोषकांचा अत्याचार
चला आपण गुलामी आपली तोडूया
संघटित आणि मुक्त होऊया
बदलू हे सारे जग बदलूया
नको छळ आणि नको विषमता
अंतिम लढा आहे आपला
नवे जग घडविण्याचा
साऱ्या जगाच्या कष्टकऱ्यांनो
उठा, आता काळ आला

संदर्भ