मित्र (तारा)

मित्र ही सूर्यमालेपासून सर्वात जवळील ताऱ्यांची प्रणाली आहे. तिचे पृथ्वीपासूनचे अंतर ४.३७ प्रकाशवर्षे (१.३४ पार्सेक) इतके आहे.[१]. तिचे बायर नाव अल्फा सेन्टॉरी (Alpha Centauri; α Cen) आहे व तिला इंग्रजीमध्ये रायजेल केंट (Rigil Kent) असेही म्हणतात. पृथ्वीवरून एकच तारा दिसत असला तरी त्यामध्ये एक द्वैती ताऱ्यांची जोडी आहे. या ताऱ्यांना मित्र "अ" आणि मित्र "ब" म्हटले जाते आणि एक तिसरा तारादेखील आहे जो यांपासून काही अंतरावर असून त्याला मित्र "क" किंवा प्रॉक्झिमा सेन्टॉरी असे नाव दिले गेले आहे. त्यातील द्वैती तारे उघड्या डोळ्यांनी -०.२७ आभासी दृश्यप्रतीचा एकच तारा असल्यासारखे दिसतात. हा ताऱा नरतुरंग या तारकासमूहातील सर्वात तेजस्वी आणि पृथ्वीवरून दिसणाऱ्या ताऱ्यांपैकी (सूर्य वगळता) व्याध आणि अगस्ती ताऱ्यांपाठोपाठ तिसरा सर्वात तेजस्वी आहे. सूर्य वगळता प्रॉक्झिमा सेंटॉरी हा पृथ्वीपासून ४.२४ प्रकाशवर्षे अंतरावरील सर्वात जवळचा तारा आहे. पण तो अतिशय लहान असल्याने दुर्बिणीशिवाय दिसू शकत नाही.

मित्र अ आणि मित्र ब तारे आणि वर्तुळात प्रॉक्झिमा सेंटॉरी तारा

गुणधर्म आणि घटक

मित्र अ (अल्फा सेन्टॉरी ए) हा द्वैती ताऱ्यांमधील मुख्य तारा आहे. मित्र अ हा जी२ व्ही श्रेणीचा सूर्यासारख्या पांढऱ्या-पिवळ्या रंगाचा मुख्य अनुक्रम तारा आहे. त्याचे वस्तुमान सूर्याच्या १.१ पट आहे आणि त्रिज्या सूर्याच्या १.२३ पट आहे. हा तारा सूर्य वगळता आकाशातील चौथा सर्वात तेजस्वी तारा आहे. त्याची आभासी दृश्यप्रत ०.०१ आहे. त्याची तेजस्विता सूर्याच्या १.५१९ पट आहे. याचे वय ४.८५ अब्ज वर्षे आहे असा अंदाज आहे जे सूर्यापेक्षा २५ कोटी वर्षे जास्त आहे.[२] मित्र अ ताऱ्याचे राईट असेंशन १४h ३९m ३६.४९४००s आणि डेक्लिनेशन –६०° ५०′ ०२.३७३७″ आहे.[३]

मित्र ब (अल्फा सेन्टॉरी बी) हा द्वैती ताऱ्यांमधील दुसरा तारा आहे. हा के१ व्ही या श्रेणीचा नारंगी-पिवळ्या रंगाचा मुख्य अनुक्रम तारा आहे. त्याचे वस्तुमान सूर्यापेक्षा थोडेसे कमी म्हणजे सूर्याच्या वस्तुमानाच्या ०.९१ पट आहे, तर तेजस्विता सूर्याच्या आर्धी म्हणजे ०.५ पट आहे. त्याची त्रिज्या सूर्याच्या ०.८७ पट आहे. त्याची आभासी दृश्यप्रत १.३३ आहे. मित्र अ प्रमाणे या ताऱ्याचे वय सुद्धा ४.८५ अब्ज वर्षे आहे असा अंदाज आहे.[२] मित्र ब ताऱ्याचे राईट असेंशन १४h ३९m ३५.०६३११s आणि डेक्लिनेशन –६०° ५०′ १५.०९९२″ आहे.[३]

मित्र क (अल्फा सेन्टॉरी सी किंवा प्रॉक्सिमा सेन्टॉरी) एम६व्हीई श्रेणीचा एक लहान मुख्य अनुक्रम तारा आहे. त्याचे वस्तुमान सूर्याच्या फक्त ०.१२३ पट आणि व्यास सूर्याच्या ०.१४ पट आहे.[२]

ग्रह

१९९० पर्यंत सूर्यमालेच्या बाहेरील ग्रह शोधण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले नव्हते. पुढे तंत्रज्ञानात प्रगती होत गेली व आता पृथ्वीएवढ्या वस्तूमानाचे परग्रह शोधता येऊ शकतात.

अल्फा सेन्टॉरी बीबी

इ.स. २०१२ मध्ये मित्र ब (अल्फा सेन्टॉरी बी) ताऱ्याभोवती ग्रह (Alpha Centauri Bb) असल्याचे जाहीर झाले होते. पण २०१५ मध्ये डेटाच्या विश्लेषणामधील एका बनावट आर्टिफॅक्टमुळे असे झाले असून हा ग्रह जवळजवळ अस्तित्वात नाही असे नवीन अभ्यासात समोर आले.[४][५]

अल्फा सेन्टॉरी बीसी

२५ मार्च २०१५ रोजी शास्त्रज्ञांच्या एक गटाने एक शोधनिबंध प्रसिद्ध केला ज्यामध्ये मित्र ब ताऱ्याभोवती एक नवा ग्रह असण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यांनी हबल दुर्बिणीच्या सहाय्याने ४० तास मित्र ब ताऱ्याचे निरीक्षण केले. त्यामध्ये त्यांनी निरीक्षणाच्या काळामद्ये संक्रमणाची घटना घडल्याचे म्हटले आहे जी शक्यतो ग्रहामुळे घडले आहे.[६] या शोधावर शिक्कामोर्तब झाल्यास हा पृथ्वीपासूनचा आपल्या सौरमालेच्या बाहेरील सर्वात जवळचा ग्रह असेल व त्याला अल्फा सेन्टॉरी बीसी असे नाव देण्यात येईल.[७]

शोधमोहीम

मित्र ताऱ्यांची प्रणाली मानवासहीत किंवा मानवरहीत आंतरतारकीय शोध मोहीमांसाठी पहिली प्रणाली असण्याची शक्यता आहे. एवढे प्रचंड अंतर मानवी आयुष्याच्या कालावधीत पार करण्याएवढे चांगले तंत्रज्ञान सध्या उपलब्ध नाही. पण अलीकडे प्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग, रशियन अब्जाधीश उद्योगपती युरी मिलनर यांनी हे अंतर २० वर्षांच्या कालावधीत पार करण्यासाठीचे तंत्रज्ञान विकसित करून या ताऱ्यांच्या प्रणालीच्या दिशेने मानवरहीत याने पाठवण्यासाठी "ब्रेकथ्रू स्टारशॉट" नावाच्या प्रकल्पाची घोषणा केली आहे. या प्रकल्पाला फेसबुकचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनीदेखील पाठिंबा दर्शवला आहे.[८][९]

पहा

संदर्भ