अमेरिकन यादवी युद्ध

एक अश्रुत वास्तव

अमेरिकन यादवी युद्ध (इ.स. १८६१-इ.स. १८६५) हे उत्तर अमेरिका खंडामध्ये अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमध्ये मुख्यत्वेकरून उत्तर व दक्षिणेतील राज्यांमध्ये लढले गेले. यात एका बाजूस संयुक्त संस्थानातील, मुख्यतः उत्तरेकडील चोवीस राज्ये व दुसऱ्या बाजूस दक्षिणेतील अकरा राज्यांनी एकत्र येउन नव्यानेच स्थापन केलेले अमेरिकन राज्यांचे संघटन होते. हे संघटन दक्षिणेतील अकरा राज्यांनी इ.स. १८६०-इ.स. १८६१ मध्ये संयुक्त संस्थानांमधून बाहेर पडून स्थापन केले होते. या युद्धामध्ये अंदाजे ५,६०,३०० (लोकसंख्येच्या १.७८%) लोक मरण पावले. मृत व जखमी मिळून ही संख्या अंदाजे ९,७०,००० (लोकसंख्येच्या ३.०९%) आहे. संयुक्त संस्थानांच्या इतिहासात इतर कुठल्याही युद्धात इतकी जीवितहानी झाली नाही. या युद्धाची कारणे, इतकेच नव्हे तर या युद्धाचे नाव देखिल अजूनही एक वादाचा विषय आहे.

देशाची विभागणी

अतिदक्षिण

दक्षिणेकडील सात राज्यांनी अब्राहम लिंकनच्या निवडणुकीनंतर लगेचच, तो सत्तेवर येण्यापूर्वीच, संघराज्य सोडण्याचा निर्णय घेतला. ती राज्ये याप्रमाणे:

या अतिदक्षिणेतील राज्यांमध्ये गुलामगिरी व कापूसशेती मोठ्या प्रमाणात चालत असे. या राज्यांनी मिळून संघटित अमेरिकन राज्यांची स्थापना केली (फेब्रुवारी ४, इ.स. १८६१). जेफरसन डेव्हिस यांना दक्षिणेचे अध्यक्ष निवडण्यात आले. दक्षिणेची राज्यघटना सामान्यतः उत्तरेच्या राज्यघटनेवरच आधारित होती. यानंतर दक्षिण कॅरोलिना मधील फोर्ट सम्टरच्या लढाईनंतर जेव्हा लिंकन यांनी इतर सर्व राज्यांकडे सैन्य जमा करण्याची मागणी केली तेव्हा आणखी चार राज्यांनी संघराज्य सोडण्याचा निर्णय घेतला:

सीमेवरील राज्ये

व्हर्जिनियाचा वायव्येकडील काही भाग (येथील लोकांना संघराज्य सोडावयाचे नव्हते त्यामुळे त्यांनी पुढे वेस्ट व्हर्जिनिया या नावाने राज्य बनवून संघराज्यामध्ये प्रवेश मिळवला(इ.स. १८६३) व उत्तरेकडील चार गुलामगिरी असलेली राज्ये (मेरीलॅंड, डेलावेर, मिसूरी, व केंटकी) संघराज्यामध्येच राहिली. या राज्यांना सीमेवरील राज्ये असे म्हणतात.

इ.स. १८६०च्या राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीमध्ये डेलावेरने जॉन बेकिन्रिज यांना निवडून दिले होते. ह्या राज्यात गुलामांची संख्यादेखील कमी होती. त्यामुळे ह्या राज्याने संघराज्य सोडण्याचा विचारही केला नाही. मेरीलॅंड राज्याने देखिल जॉन बेकेनरिज यांनाच निवडून दिले होते. बाल्टिमोर शहरात दंगली झाल्यामुळे लष्करी अंमल लागू करण्यात आला होता. तेथील विधिमंडळाने संघराज्य सोडण्याचा प्रस्ताव नाकारला (एप्रिल २७, इ.स. १८६१). मिसूरी व केंटकी ही दोन्ही राज्ये जरी संघराज्यात राहिली तरी तेथेदखील काही बंडखोर गटांनी एकत्र येउन संघराज्य सोडण्याचे प्रस्ताव मान्य केले. या प्रस्तावांची दक्षिणेने दखल घेतली.

युद्धाची प्रगती

इ.स. १८६० साली राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीतील लिंकनच्या विजयाने दक्षिणेतील राज्यांनी संघराज्य सोडण्यास सुरुवात केली. दक्षिणेतील नऊ राज्यांमध्ये लिंकनचे नावदेखील मतपत्रांवर नव्हते. संघराज्य सोडणाऱ्या सात राज्यांनी मिळून फेब्रुवारी ७, इ.स. १८६१ रोजी आपले वेगळे संघटन बनवले. अलाबामा राज्यातील मॉंटगोमेरीला या संघटनाची राजधानी घोषित करण्यात आली. वॉशिंग्टन, डी. सी. येथे दक्षिण व उत्तरेमध्ये इ.स. १८६१ची शांतता चर्चाही झाली. दक्षिणेतील बऱ्याच राज्यांनी आपापल्या क्षेत्रातले संघराज्याचे किल्लेदेखील ताब्यात घेतले. तरीही, तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जेम्स बुकानन यांनी याबद्दल कोणतीही लष्करी कारवाई केली नाही. मार्च ४, इ.स. १८६१ रोजी लिंकनने राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. आपल्या पहिल्याच भाषणात संघराज्य सोडण्याची कृती अवैध असल्याचे सांगितले व बंडखोर राज्यांना पुन्हा संघराज्यामध्ये येण्यास आमंत्रण दिले.

दक्षिणेने आपले दूत पाठवून संघराज्याचे किल्ले व जी इतर मालमत्ता दक्षिणेमध्ये होती त्यांच्यासाठी नुकसानभरपाई देण्याची तयारी दर्शवली परंतु उत्तरेस ही कल्पना मान्य नव्हती. अखेर एप्रिल १२ रोजी दक्षिणेने चार्लस्टन बंदरातील फोर्ट सम्टर या किल्ल्यावर तोफा डागल्या व किल्ल्यामधील उत्तरेच्या सैनिकांना शरणागती पत्करावी लागली. लिंकनने संघराज्यातील सर्व राज्यांना सैन्य गोळा करण्याच्या आज्ञा दिल्या. यामुळे आणखी चार राज्यांनी संघराज्य सोडण्याचा निर्णय घेतला. व्हर्जिनिया राज्याने संघराज्य सोडून दक्षिणी सघटनेत भाग घेताच दक्षिणेची राजधानी रिचमंड येथे हलविण्यात आली.

पूर्व आघाडी इ.स. १८६१-इ.स. १८६३

मेजर जनरल आयर्विन मॅक्डॉवेलच्या हाताखालील उत्तरेच्या सैन्याने दक्षिणेच्या सैन्यावर केलेला हल्ला दक्षिणेने बुल रनच्या पहिल्या लढाईमध्ये परतवून लावला. या लढाईस मन्सासची पहिली लढाई असेही म्हणतात. या सैन्यास यानंतर वॉशिंग्टन डी. सी. पर्यंत माघार घ्यावी लागली. जनरल जोसेफ जॉन्स्टन व पी. गी. टी. बीरगार्द हे दक्षिणेचे या युद्धातले सेनानी होते. या युद्धामुळेच जनरल थॉमस जॅक्सन याला स्टोनवॉल (दगडी भिंत) म्हणून ओळखू लागले. या पराजयानंतर आणखी राज्ये (खास करून गुलामगिरी असलेली) सोडून जातील या भीतीने उत्तरेच्या विधिमंडळाने एक ठराव बनवून असे स्पष्ट केले की ह्या युद्धाचा उद्देश गुलामगिरी नाहीशी करणे नसून केवळ संघराज्य वाचवणे हा आहे.

जुलै २६ रोजी मेजर जनरल जॉर्ज बी. मॅक्लेलान याला पोटोमॅकच्या सैन्याची सूत्रे देण्यात आली व इ.स. १८६२मध्ये युद्ध वेगाने सुरू झाले.

लिंकनच्या आग्रहामुळे मॅक्लेलानने अखेर इ.स. १८६२च्या वसंतात व्हर्जिनियावर चढाई केली. ही चढाई त्याने रिचमंडच्या आग्नेयेकडून यॉर्क व जेम्स नद्यांच्यामधील चिंचोळ्या पट्टीमधून केली. त्याच्या सैन्याने रिचमंडच्या वेशीपर्यंत मजल मारली. परंतु जोसेफ जॉन्स्टनने त्याच्या सैन्याला सेव्हन पाईन्सच्या लढाईमध्ये थोपवले. नंतर रॉबर्ट ई. लीने त्याचा सात दिवसाच्या लढाईमध्ये पराभव केला व त्याला माघार घेण्यास भाग पाडले. पुढे मॅक्लेलानचे बरेच सैन्य जॉन पोप याच्या सैन्याखाली हलविण्यात आले. ऑगस्टमध्ये लीने पोपचाही बुल रनच्या दुसऱ्या लढाईमध्ये दारुण पराभव केला.

बुल रनच्या दुसऱ्या लढाईमधील विजयानंतर आलेल्या आत्मविश्वासामुळे दक्षिणेने उत्तरेवरील पहिले आक्रमण सुरू केले. सप्टेंबर ५ रोजी जनरल लीच्या हाताखालील ५५,००० सैन्याने पोटोमॅक नदी ओलांडून मेरीलॅंड राज्यात प्रवेश केला. लिंकनने पोपकडील सैन्य पुन्हा मॅक्लेलानखाली हलविले. मॅक्लेलान आणि ली यांच्यामध्ये सप्टेंबर १७ इ.स. १८६२ रोजी मेरीलॅंडमधील शार्प्सबर्गनजीक ऍंटीटमची लढाई झाली. यामुळे रोखले गेलेले लीचे सैन्य माघार घेउन व्हर्जिनीयामध्ये परतले. या लढाईनंतर लिंकनने गुलाममुक्तीचे घोषणापत्र जारी केले.

ऍंटिटमच्या विजयाचा मॅक्लेलानने सावध धोरणामुळे पाठपुरावा केला नाही. यामुळे त्याच्या जागी जनरल ऍम्ब्रॉस बर्नसाईडची नेमणूक करण्यात आली. डिसेंबर १३, इ.स. १८६२मध्ये फ्रेडरिक्सबर्गच्या लढाईमध्ये बर्नसाईडला पराभव पत्करावा लागला. या लढाईमध्ये उत्तरेचे दहा हजाराहून जास्त सैनिक मृत्युमुखी पडले वा जखमी झाले. या पराभवानंतर बर्नसाईडच्या जागी मेजर जनरल जोसेफ हूकरची नेमणूक झाली. त्यालादेखील लीचा पराभव करण्यात यश आले नाही. दक्षिणेच्या दुप्पट सैन्य असूनही त्याचा चॅन्सेलरव्हिलच्या लढाईत मे इ.स. १८६३मध्ये पराभव झाला. यानंतर लीने पुन्हा उत्तरेवर आक्रमण केले. यावेळेला हूकरच्या जागी मेजर जनरल जॉर्ज जी. मीडची नियुक्ती करण्यात आली. जुलै १-, इ.स. १८६३ला मीडने अखेर लीचा गेटिसबर्गच्या लढाईमध्ये पराभव केला. उत्तर अमेरिकेच्या इतिहासातील ही सर्वात मोठी लढाई समजली जाते. या लढाईपासून युद्धाचे चित्र बदलण्यास सुरुवात झाली असेही मानण्यत येते. लीच्या सैन्यातले २८,००० तर मीडच्या सैन्यातले २३,००० सैनीक मृत अथवा जखमी झाले. लीच्या सैन्याला व्हर्जिनियाध्ये माघार घ्यवी लागली. यानंतर लीने पुन्हा उत्तरेवर मोठे आक्रमण केले नाही.

पश्चिम आघाडी इ.स. १८६१-इ.स. १८६३

दक्षिणेच्या सैन्यांना पुर्वेमध्ये जरी यश मिळाले असले तरी त्यांना पश्चिमेमध्ये महत्त्वाची अपयशे भोगावी लागली. पी रिजच्या लढाईमुळे त्यांना मिसूरीमधुन माघार घ्यावी लागली. केंटकी राज्यातील नागरिकांनी या युद्धात आपली तटस्थता दर्शविली होती, पण लिओनिडास पोल्कच्या दक्षिणी सैन्याने या राज्यावर हल्ला केला त्यामुळे या राज्यातील लोकमत दक्षिणेच्या विरुद्ध गेले.

१८६२ च्या सुरुवातीस उत्तरेच्या सैन्याने नॅशव्हिल (टेनेसी) जिंकले. पुढे १० क्रमांकाचे बेट, न्यू माद्रिद (मिसूरी), व मेंफिस (टेनेसी) जिकल्यामुळे मिसिसिपी नदीचा बहुतेक भाग उत्तरेच्या वाहतूकीला मोकळा झाला. मे १८६२मध्ये उत्तरेने न्यू ऑर्लिन्स (लुईजियाना) जिंकले. यामुळे उत्तरेच्या आरमारास मिसिसिपी नदीत शिरण्याचा मार्ग खुला झाला. व्हिक्सबर्ग किल्ला (मिसिसिपी) तरीही दक्षिणेकडे असल्याने उत्तरेस मिसिसिपी नदीचा पूर्ण ताबा मिळाला नव्हता.

यानंतर ब्रॅक्स्टन ब्रॅगच्या दक्षिणी सैन्याने पुन्हा एकदा केंटकीवर हल्ला केला पण त्याला डॉन कार्लोस ब्यूलने पेरीव्हिलच्या लढाईत परतवून लावले. पुढे त्याचा विल्यम एस. रोजिक्रॅनने टेनेसीमध्ये स्टोन्स नदीच्या लढाईत निसटता पराभव केला.

ब्रॅगच्या नेतृत्वाखालील दक्षिणेच्या सैन्याला चिकामौगाच्या लढाईमध्ये विजय मिळाला. या लढाईमध्ये ब्रॅगने जेम्स लॉंगस्ट्रीटच्या सैन्याच्या मदतीने रोजिक्रॅनच्या हाताखालिल उत्तरेच्या सैन्याचा पराभव केला. यानंतर उत्तरेच्या सैन्याला चट्टानुगापर्यंत माघार घ्यावी लागली. चट्टानुगाला मग ब्रॅगने वेढा घातला.

युलिसिस एस. ग्रांट हा उत्तरेच्या सैन्याचा पश्चिम आघाडीवरिल सर्वात महत्त्वाचा व दूरदर्शी सेनानी होता. त्याने फोर्ट हेन्री व फोर्ट डोनेल्सन या किल्ल्यांच्या लढायांमध्ये विजय मिळवला व टेनेसी आणि कंबरलॅंड नद्यांचा ताबा मिळवला. पुढे त्याने शिलोहची लढाई जिंकली व त्यानंतर मिसिसिपी नदीवरील व्हिक्सबर्ग जिंकून त्या नदीचाही ताबा मिळवला. शेवटी त्याने चट्टानूगा जिंकून तेथील दक्षिणेच्या सैन्यास पिटाळून लावले. यामुळे उत्तरेचा ऍटलांटावर चढाई करण्याचा मार्ग मोकळा झाला.

मिसिसिपीपलिकडील लढाया

मिसिसिपीपलिकडील प्रदेश हा भौगोलिकदृष्ट्या पुर्वेपासुन विभक्त होता. परंतु या भागातही बऱ्याच लढाया झाल्या. १८६१ साली दक्षिणेने सध्याच्या अ‍ॅरिझोनान्यू मेक्सिको या राज्यांच्या प्रदेशावर हल्ला केला. या प्रदेशांच्या दक्षिण भागातील रहिवाश्यांनी संघराज्य सोडण्याचा ठराव बनविला व जवळच्याच टेक्सासमधील दक्षिणेच्या सैन्याची मदत मागितली. मेसिलाच्या लढाईमध्ये कर्नल जॉन बेलरने विजय मिळवला व बऱ्याच उत्तरेच्या सैनिकांना युद्धबंदी केले. यानंतर दक्षिणेने अ‍ॅरिझोनाला दक्षिणेचा प्रदेश म्हणून घोषित केले. परंतु आणखी उत्तरेकडे जाण्यास दक्षिणेचे सैन्य अपयशी ठरले व जेव्हा उत्तरेच्या बाजुने लढण्यास कॅलिफोर्नियामधुन आणखी सैन्य आले तेव्हा दक्षिणेने अ‍ॅरिझोनामधुन पूर्ण माघार घेतली.

उत्तरेच्या सैन्याने मग टेक्सास व लुईझियानाचे मिसिसिपीपलिकडील प्रदेश घेण्याचा प्रयत्न केला. दक्षिणेची इतर बहुतेक बंदरांची उत्तरेने नाकेबंदी केल्यामुळे टेक्सास हा नाकेबंदी मोडणाऱ्यांसाठी स्वर्ग बनला होता. टेक्सास व लुईझियानामध्ये कापुस शेती केली जाई व हा कापुस मग खुश्कीच्या मार्गाने मेक्सिकोला नेऊन तेथून युरोपला पाठवला जाई. यामुळे या भागाला दक्षिणेचे मागिल दार असेही म्हटले जात असे. हा मार्ग बंद करण्यासाठी उत्तरेने टेक्सासवर बरेच हल्ले केले परंतु ते सर्व अपयशी ठरले. टेक्सासमधिल गॅल्व्हेस्टनध्ये व सबिन पासच्या लढाईमध्ये उत्तरेचा पराभव झाला. उत्तरेने यानंतर या भागात फार प्रयत्न केले नाही.

युद्धाचा शेवट इ.स. १८६४-इ.स. १८६५

१८६४ च्या सुरुवातीस ग्रांटला लेफ्टनंट जनरल अशी बढती मिळाली व त्याला उत्तरेच्या सर्व सैन्याचा सरसेनापती बनविण्यात आले. त्याने पोटोमॅकच्या सैन्याबरोबर आपले मुख्यालय बनविले. पश्चिमेकडिल बहुतेक सैन्य त्याने मेजर जनरल विल्यम टेकुमेश शेरमन याच्या हाताखाली दिले. ग्रांटचा संपूर्ण युद्धाच्या कल्पनेवर विश्वास होता. तो, लिंकन, व शेरमन यांचा ठाम विश्वास होता की दक्षिणेच्या सैन्यांचा पूर्ण पाडाव व दक्षिणेच्या आर्थिक क्षमतेचा पूर्ण नाश केल्याखेरीज युद्ध संपणार नाही. यामुळे त्यांनी काही भागांमध्ये दग्धभू पद्धत अवलंबण्याचा निर्णय घेतला. त्यांनी दक्षिणेच्या अंतर्भागांमध्ये विविध दिशांनी शिरण्याचा व्युह रचला. या रचनेचे मुख्य भाग असे होते:

  • ग्रांट, मीड, व बेंजामिन बट्लर यांनी लीच्या रिचमंडजवळील सैन्यावर हल्ला करावा,
  • फ्रांझ सीगलने शेनांडोआहच्या खोऱ्यावर चढाई करावी,
  • शेरमनने जॉर्जियावर हल्ला करून जोसेफ जॉनस्टनचा पराभव करावा व अटलांटा घ्यावे,
  • जॉर्ज क्रूक व विल्यम डब्लू. ऍव्हरेल यांनी लोहमार्गांची नासधूस करून दक्षिणेची रसद तोडावी, व
  • नथानियल बँक्सने अलाबामामधील मोबिल जिंकावे.

पूर्व आघाडीवर उत्तरेच्या सैन्याने लीच्या सैन्यास ओलांडून जाण्याचे बरेच प्रयत्न केले. या काळात ग्रांटच्या सैन्याने पूर्व आघाडीवर बऱ्याच लढाया लढल्या. परंतु ग्रांटने चिकाटीने प्रयत्न चालू ठेवले व त्याने लीचे सैन्य पीटर्सबर्गच्या वेढ्यामध्ये अडकवून ठेवले. या वेढ्यामध्ये दोन्ही बाजूंनी खंदक खणले व हे युद्ध नऊ महिने चालू राहिले.

शेनांदोहच्या खोऱ्यामधील महत्त्वाची ठिकाणे जिंकण्याचे उत्तरेचे सीगल व डेव्हिड हंटर या दोघांच्या हाताखालिल सैन्याचे प्रयत्न निष्फळ ठरले. यानंतर ग्रांटने या कामगिरीवर फिलिप शेरिडनची नेमणूक केली. शेरिडनच्या नेमणूकीचे एक कारण दक्षणेच्या वतीने ज्युबल अर्लीने केलेल्या चढाया हे होते. त्याच्या सैन्याने वॉशिंग्टन डी. सी.च्या वेशीपर्यंत मजल मारली होती. शेरिडनच्या रूपाने अर्लीला शेरास सव्वाशेर भेटला. शेरिडनने अर्लीचा बऱ्याच लढयांमध्ये पराभव केला. सेदार क्रीकच्या लढाईमध्ये त्याचा अखेरचा परभव करून मग शेरिडनने खोऱ्यामधील सर्व शेती व उद्योगांची नासधूस करण्यास सुरुवात केली.

इकडे शेरमनने चट्टानूगाहून निघून ऍटलांटावर चढाई केली. त्याने जनरल जोसेफ जॉन्स्टन व जॉन बी. हूड यांचा पराभव केला व सप्टेंबर २, इ.स. १८६४ला ऍटलांटा घेतले. ऍटलांटाचा पाडाव हे लिंकनच्या पुनर्निवडणूकीचे एक कारण मानले जाते. यानंतर शेरमनच्या सैन्याने ऍटलांटा सोडले व जॉर्जियामधून समुद्रकिनाऱ्याच्या दिशेने मजल मारण्यास सुरुवात केली. या सैन्याने दग्धभू धोरण अवलंबून उर्वरीत जॉर्जियाचा जमेल तेवढा नाश केला. त्यांनी शहरांना व कापसांच्या पिकांना आगी लावल्या व इतर पिके कापून नेली तसेच जनावरेही ठार केली. या मार्गाने दक्षिणेच्या आर्थिक ताकदीचा नाश करण्याचे ग्रांटचे धोरण त्यांनी अवलंबले. या रीतीने मजल मारून अखेर डिसेंबर महिन्यात शेरमनचे सैन्य सवाना येथे समुद्रकिनाऱ्याला पोहोचले. यानंतर शेरमन दक्षिण व उत्तर कॅरोलिनाच्या मार्गे व्हर्जिनियाकडे निघाला. तेथील लीच्या सैन्यास दक्षिणेकडून गाठण्याचा त्याचा विचार होता.

लीने पीटर्सबर्गच्या वेढ्यातून निसटून उत्तर कॅरोलिनामध्ये जॉन्स्टनच्या सैन्याबरोबर एकत्र येण्याचा प्रयत्न केला. पण या प्रयत्नात अखेर ग्रांटने त्याला गाठले. शेवटी एप्रिल ९, इ.स. १८६५ला लीने आपल्या सैन्यासह ऍपॉमेटॉक्स कोर्ट हाऊस येथे शरणागती पत्करली. पुढे जॉन्स्टनने त्याच्या सैन्यासह शेरमनसमोर उत्तर कॅरोलिनामध्ये ड्युरॅम येथे शरणागती पत्करली. जमीनीवरील शेवटची लढाई दूर टेक्सासमध्ये पाल्मिटो रांचयेथे मे १३, इ.स. १८६५ला लढली गेली. दक्षिणेच्या सर्व सैन्याने जून १८६५पर्यंत शरणागती पत्करली. बातमी न पोहोचल्यामुळे दक्षिणेच्या आरमारातील काही तुकड्यांना शरणागती पत्करण्यास नोव्हेंबर १८६५पर्यंत वेळ लागला.

युद्धावर टिप्पणी

या युद्धात उत्तरेने दक्षिणेवर विजय मिळविण्याच्या कारणांवर बरीच टिप्पणी व चर्चा झाली आहे. उत्तरेच्या विजयाची काही महत्त्वाची कारणे खालील समजली जातात:

  • उत्तरेचे उद्योगीकरण जास्त प्रमाणात झाले होते त्यामुळे त्यांना शस्त्रे, दारुगोळा, व रसद निर्माण करणे अधिक सोपे गेले.
  • उत्तरेची लोकसंख्या व त्यामुळे सैन्य उभे करण्याची ताकद दक्षिणेपेक्षा जास्त होती.
  • उत्तरेतील शहरे एकाच रुंदीच्या लोहमार्गाने जोडली होती, यामुळे मालाची व सैन्याची वाहतूक करणे त्यांना सुकर झाले.
  • संयुक्त संस्थानांचे आरमार व व्यापारी नौका उत्तरेच्या ताब्यात राहिल्या. यामुळे उत्तरेला दक्षिणेच्या बंदरांची नाकेबंदी करणे शक्य झाले.
  • उत्तरेचे सरकार अधिक सुरळीत चालत असल्याने उत्तरेला युद्धाचे काम पहाणे सोपे झाले.
  • दक्षिणेला इतर कोणत्याही देशाकडून लश्करी मदत मिळाली नाही.
  • दक्षिणेने अशी समजुत करून घेतली की ब्रिटन व फ्रांसचे त्यांच्या कापसाशिवाय चालणार नाही व ते युद्धात दक्षिणेला मदत करतील. यामुळे सुरुवातीला दक्षिणेने कापसाचे उत्पन्न कमी केले. पण याचा उलटाच परिणाम झाला व ब्रिटिशांनी ईजिप्त व भारताकडून कापुस मिळविण्यास सुरुवात केली.

जमिनीवरील महत्त्वाच्या लढाया

जमिनीवरील दहा सर्वात किमती (हानीप्रमाणे मोजलेल्या, हानीमध्ये मृत, जखमी, व बेपत्ता यांचा समावेश आहे) खालीलप्रमाणे:

लढाई (राज्य)तारखादक्षिणेचा सेनानीउत्तरेचा सेनानीदक्षिणेचे सैन्यउत्तरेचे सैन्यविजेताहानी
गेटिसबर्गची लढाई

(पेनसिल्वेनिया)

जुलै १, इ.स. १८६३रॉबर्ट ई. लीजॉर्ज जी. मीड७५,०००८२,२८९उत्तर५१,११२
उः २३,०४९
द: २८,०६३
चिकामौगाची लढाई

(जॉर्जिया)

सप्टेंबर १९२०, इ.स. १८६३ब्रॅक्स्टन ब्रॅगविल्यम रोझिक्रॅन्स६६,३२६५८,२२२दक्षिण३४,६२४
उः १६,१७०
द: १८,४५४
चॅन्सेलरव्हिलची लढाई

(व्हर्जिनीया)

मे १, इ.स. १८६३रॉबर्ट ई. लीजोसेफ हूकर६०,८९२१३३,८६८दक्षिण३०,०९९
उः १७,२७८
द: १२,८२१
स्पॉटसिल्वेनिया कोर्टहाउसची लढाई

(व्हर्जिनीया)

मे ८१९, इ.स. १८६४रॉबर्ट ई. लीयुलिसिस एस. ग्रांट५०,०००८३,०००नाही२७,३९९
उः १८,३९९
द: ९,०००
ऍंटीटमची लढाई

(मेरीलॅंड)

सप्टेंबर १७, इ.स. १८६२रॉबर्ट ई. लीजॉर्ज बी. मॅक्लेलान५१,८४४७५,३१६नाही२६,१३४
उः १२,४१०
द: १३,७२४
विल्डरनेसची लढाई

(व्हर्जिनीया)

मे ५, इ.स. १८६४रॉबर्ट ई. लीयुलिसिस एस. ग्रांट६१,०२५१०१,८९५नाही२५,४१६
उः १७,६६६
द: ७,७५०
बुल रनची दुसरी लढाई

(व्हर्जिनीया)

ऑगस्ट २९३०, इ.स. १८६२रॉबर्ट ई. लीजॉन पोप४८,५२७७५,६९६दक्षिण२५,२५१
उः १६,०५४
द: ९,१९७
स्टोन्स नदीची लढाई

(टेनेसी)

डिसेंबर ३१, इ.स. १८६२ब्रॅक्स्टन ब्रॅगविल्यम रोझिक्रॅन्स३७,७३९४१,४००उत्तर२४,६४५
उः १२,९०६
द: ११,७३९
शिलोहची लढाई

(टेनेसी)

एप्रिल ६, इ.स. १८६२अल्बर्ट जॉन्स्टन

पी. गी. टी. बीरगार्द

युलिसिस एस. ग्रांट४०,३३५६२,६८२उत्तर२३,७४१
उः १३,०४७
द: १०,६९४
फोर्ट डोनेल्सनची लढाई

(टेनेसी)

फेब्रुवारी १३१६, इ.स. १८६२जॉन बी. फ्लॉईड

सायमन बकनर

युलिसिस एस. ग्रांट२१,०००२७,०००उत्तर१९,४५५
उः २,८३२
द: १६,६२३

चित्रपटात

सन २००३ मध्ये प्रदर्शित झालेला गॉड्स अँड जनरल्स हा चित्रपट अमेरिकन गृहयुद्धावर आधारित आहे. २००३ मध्येच ज्युड लॉ व निकोल किडमन यांचा अभिनय असलेला कोल्ड माउंटन हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा गृहयुद्धाच्या काळातील एका प्रेमकथेवर आधारित आहे.